चोवीस तासांत घाटघरमध्ये कोसळला तब्बल आठ इंच पाऊस! मुळा खोर्यातही पावसाचे धुमशान; मुळानदीचा प्रवाह पहिल्यांदाच सहा हजारांवर..

नायक वृत्तसेवा, अकोले
गेल्या दिड महिन्यापासून मोठ्या पावसाची प्रतीक्षा असलेल्या मुळा, भंडारदरा व निळवंडे या जिल्ह्यातील मोठ्या धरणांच्या पाणलोटात पावसाचे धुमशान सुरु झाले असून गेल्या चोवीस तासांत भंडारदर्याच्या पाणलोटातील घाटघरमध्ये तब्बल आठ इंच (195 मिलीमीटर) इतक्या विक्रमी पावसाची नोंद झाली आहे. पाणलोटात सर्वदूर आषाढसरींनी फेर धरला असून सह्याद्रीच्या घाटमाथ्यावरुन असंख्य जलप्रपातांचा धरणीच्या दिशेने प्रवास सुरु झाला आहे. रविवारी भंडारदर्यासह मुळा खोर्यातही तुफान जलधारा कोसळल्या असून हंगामात पहिल्यांदाच मुळानदी दुथडी भरुन वाहू लागली आहे. अकोले तालुक्याच्या पश्चिमभागात पावसाला जोर चढला असतांना आढळा व भोजापूर धरणांचे पाणलोट मात्र अजूनही तहाणलेलेच आहे. सध्या जिल्ह्यातील या तिनही धरणात पाणीसाठा वाढून तो आता 36 टक्क्यांवर गेला आहे. उशीराने का होईना जिल्ह्याच्या चेरापूंजीत मान्सूनला जोर चढल्याने आदिवासी पाड्यांसह लाभक्षेत्रातही आनंदाचे भरते आले आहे.

यंदाच्या वर्षी वेळेवर दाखल झालेल्या मान्सूनने सुरुवातीचा शिडकावा केल्यानंतर धरणांच्या पाणलोटालाच पाठ दाखवली होती. तुरळक प्रमाणात पडणार्या सरी आणि अधुनमधून होणारी एखादी सरसर वगळता चक्क तुफान पर्जन्याच्या जुलैतही या पसिरात लख्ख सूर्यप्रकाशाने चिंता वाढवल्या होत्या. मात्र स्वाती नक्षत्राच्या प्रारंभापासून रविवारी पहाटे मुळा, भंडारदरा आणि निळवंडे या तिनही मोठ्या धरणांच्या पाणलोटात मान्सूनच्या काळ्या नभांतून जलधारा कोसळायला सुरुवात झाली आणि सह्याद्रीच्या कडेकपारीतून पहिल्यांदाच असंख्य जलप्रपातांचा धरणीच्या दिशेने प्रवास सुरु झाला. त्यामुळे गेल्या महिन्याभरापासून भरपावसाच्या कालावधीतही उणे होत असलेल्या जलसाठ्यांमध्ये दिलासादायक भर पडण्यास सुरुवात झाली असून गेल्या चोवीस तासांत पाणलोटात सर्वदूर झालेला पाऊस हंगामातील पहिलाच मोठा पाऊस ठरला आहे.

भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघरला अहमदनगर जिल्ह्याची चेरापूंजी समजली जाते. मान्सूनच्या चार महिन्यात सहा हजार मिलीमीटरपेक्षा अधिक पाऊस होणार्या या परिसरातही शनिवारपर्यंत (ता.17) जेमतेम पाऊस होता. विशेष म्हणजे जुलै महिन्यातील तिसरा आठवडा उलटत येवून कोंदणी जलविद्युत प्रकल्पासाठी उभारण्यात आलेला घाटघर लघुप्रकल्प अद्यापही कोरडाच असल्याने आदिवासी बांधवांमध्ये चिंता दाटली होती. रविवारच्या पावसाने मात्र यासर्व चिंता दूर सारल्या असून घाटघरसह संपूर्ण पाणलोटात पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. घाटघर पाठोपाठ पांजरे, रतनवाडी व भंडारदर्यातही तुफान जलधारा कोसळल्या असून वातावरणात चैतन्य निर्माण झाले आहे. सध्या भंडारदरा धरणातून 826 क्युसेक्स वेगाने जलविद्युत प्रकल्पासाठी पाणी सोडले जात असून निळवंड्याची द्वारे बंद केल्याने सदरचे पाणी निळवंडे धरणात अडविले गेले आहे.

भंडारदर्यापाठोपाठ निळवंडे धरणाच्या पाणलोटातील कृष्णवंतीच्या खोर्यातही आषाढसरींनी फेर धरला असून महाराष्ट्राची शिखरस्वामीनी कळसूबाई धुक्यात हरवली आहे. कळसूबाईच्या डोंगररांगेवर कोसळणार्या जलधारांनी मरगळलेली कृष्णवंती पुन्हा आवेगाने वाहू लागली असून वाकी जलाशयाचा फुगवटा वाढू लागला आहे. जिल्ह्यातील सर्वात मोठ्या मुळा धरणाच्या पाणलोटातही सर्वदूर पावसाने जोर धरला आहे. हरिश्चंद्रगडाच्या माथ्यावर पावसाचा जोर अधिक असून गडावरुन उगम पावणारी मंगलगंगा आवेशात आल्याने गडावर जाणारा मार्ग बंद झाला आहे. त्यासोबतच कोथळे, पाचनई, आंबित, कुमशेत, खडकी, पेठेची वाडी अशा सगळ्याच ठिकाणी आषाढसरींचा जोर वाढल्याने खळाळणार्या ओढ्यांनी मुळानदीचे पात्र फुगवले आहे. त्यामुळे चालू हंगामात पहिल्यांदाच कोतुळनजीकच्या मुळा नदीपात्रातून तब्बल 5 हजार 990 क्युसेक्स वेगाने पाणी वाहत आहे. मुळानदीवरील आंबित पाठोपाठ पिंपळगाव खांड प्रकल्पही यापूर्वीच तुडूंब झाल्याने धरणातील पाणीसाठ्यात झपाट्याने वाढ होण्याचा मार्गही प्रशस्त झाला आहे.

एकीकडे अकोले तालुक्याच्या पश्चिम घाटमाथ्यावर आषाढ सरींनी जोर धरलेला असतांना तालुक्याच्या उत्तरेकडील आढळा व भोजापूर धरणांच्या पाणलोटाला मात्र अद्यापही मोठ्या पावसाची प्रतीक्षा आहे. गेल्या चोवीस तासांत आढळा धरणावर 25 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. मात्र त्यातून धरणात नवीन पाणी दाखल झालेले नाही. गेल्या दिड महिन्यात या धरणात अवघे सात दशलक्ष घनफूट पाणी दाखल आहे. आढळा खोर्यातील केळी व सांगवी प्रकल्प ओसंडल्यानंतर आढळा धरणात पाणी येण्याचा मार्ग प्रशस्त होत असतो. मात्र अद्याप ही दोन्ही जलाशये पावसाच्या प्रतिक्षेत आहेत.

मागील चोवीस तासांत (कंसात 1 जूनपासूनचा पाऊस) भंडारदरा धरणाच्या पाणलोटातील घाटघर येथे सर्वाधीक 195 मिलीमीटर (1367 मिलीमीटर), रतनवाडी 126 मिलीमीटर (898 मिलीमीटर), पांजरे 128 मिलीमीटर (476 मिलीमीटर), भंडारदरा 122 मिलीमीटर (632 मिलीमीटर), निळवंडे 112 मिलीमीटर (361 मिलीमीटर), वाकी 70 मिलीमीटर (506 मिलीमीटर), कोतुळ 21 मिलीमीटर (148 मिलीमीटर), मुळाधरण 05 मिलीमीटर (241 मिलीमीटर) व आढळा धरण 25 मिलीमीटर (178 मिलीमीटर). धरणांची क्षमता व आजच्या स्थितीतील पाणीसाठे : मुळाधरण क्षमता 26 हजार दशलक्ष घनफूट, आजचा साठा 9 हजार 867 दशलक्ष घनफूट (37.95 टक्के), भंडारदरा क्षमता 11 हजार 39 दशलक्ष घनफूट, पाणीसाठा 4 हजार 473 दशलक्ष घनफूट (44.14 टक्के), निळवंडे क्षमता 8 हजार 320 दशलक्ष घनफूट, पाणीसाठा 1 हजार 426 दशलक्ष घनफूट (17.14 टक्के), आढळा क्षमता 1 हजार 60 दशलक्ष घनफूट, पाणीसाठा 466 दशलक्ष घनफूट (43.96) व भोजापूर क्षमता 500 दशलक्ष घनफूट, पाणीसाठा 48 दशलक्ष घनफूट (13.30 टक्के). विसर्ग : भंडारदरा (विद्युतगृह) 826 क्युसेक्स, मुळानदी (कोतुळ) 5 हजार 990 क्युसेक्स वेगाने पाणी मुळा धरणाकडे झेपावत आहे.

गेल्या चोवीस तासांत अकोले तालुक्यात सर्वाधीक पाऊस :
धरणांच्या पाणलोटात पुनरागमन करणार्या पावसाने अकोले तालुक्याला सर्वदूर झोडूपन काढले. मागील चोवीस तासांत अकोले तालुक्यात जिल्ह्यातील सर्वाधीक 43.7 मि.मि. (एकूण 278.2 मि.मि) नोंद झाली. संगमनेर 8.2 मि.मि. (एकूण 183.3 मि.मि), पाथर्डी 6.1 मि.मि. (एकूण 148.5 मि.मि), अहमदनगर 4.8 मि.मि. (एकूण 234.4 मि.मि), जामखेड 0.9 मि.मि. (एकूण 253.3 मि.मि), पारनेर 0.8 मि.मि. (एकूण 202.2 मि.मि), शेवगाव 0.6 मि.मि. (एकूण 301.1 मि.मि), नेवासा 0.4 मि.मि. (एकूण 226.6 मि.मि) व श्रीरामपूर 0.1 मि.मि. (एकूण 270.6 मि.मि) पावसाची नोंद झाली आहे. संगमनेर तालुक्यातील दहापैकी सात महसूली मंडलातही रविवारी पाऊस नोंदविला गेला. त्यात सर्वाधीक घारगाव 37.5 मि.मि. (एकूण 242.5 मि.मि), धांदरफळ 21.5 मि.मि. (एकूण 139.8 मि.मि), साकूर 5.3 मि.मि. (एकूण 188.4 मि.मि), संगमनेर 5 मि.मि. (एकूण 229.4 मि.मि), डोळासणे 4.3 मि.मि. (एकूण 227.2 मि.मि), पिंपरणे 4.3 मि.मि. (एकूण 146.7 मि.मि) व समनापूर 4 मि.मि. (एकूण 169.7 मि.मि) याप्रमाणे पावसाची नोंद झाली आहे.

गेल्या दोन दिवसांपासून पश्चिम घाटावरील कोयना धरण ते नाशिक घोटी-इगतपुरी-त्र्यंबकेश्वरपर्यंत चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे पश्चिम घाटमाथ्यावर उगम पावणार्या नद्यांवरील धरणांमध्ये पाण्याची आवक सुरु झाली आहे. पावसाळा अजून किमान दीड महिना बाकी आहे. उर्वरित कालावधीमध्ये निश्चितपणे चांगला पाऊस पडून राज्यातील सर्व धरणे पूर्ण क्षमतेने भरतील अशी आशा करायला हरकत नाही. सद्यस्थितीत भंडारदरा धरण जवळपास पन्नास टक्के भरले असून जायकवाडी धरणातही सुमारे 35 ते 36 टक्के उपयुक्त पाणीसाठा झाला आहे. मुळा धरणातही बर्यापैकी पाण्याची आवक सुरु आहे. उशीराने का होईना मान्सूनचे पुनरागमन झाल्याने शेतकर्यांसह नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले असून पुढील काही दिवस पडणार्या पावसात सातत्य राहील अशी आशा आहे.
हरिश्चंद्र चकोर
निवृत्त अभियंता, पाटबंधारे विभाग

