तनपुरे कारखान्याच्या गळीत हंगामाबाबत सभासद व कामगारांबाबत संभ्रमावस्था योग्य वेळी सुरू होवून हंगाम यशस्वी करण्याचा संचालक तांबे व म्हसेंना विश्वास

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्याची कामधेनू म्हणून ओळखल्या जाणार्या डॉ. बाबुराव बापूजी तनपुरे सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासाठी जिल्हा सहकारी बँकेने परवानगी दिली आहे. मात्र, तरीही कारखाना सुरू करण्याच्या दृष्टीने कोणतीही हालचाल दिसत नसल्याने या गळीत हंगामात कारखान्याचे धुराडे पेटेल की नाही? याबाबत सभासद व कामगार बांधवांच्या मनात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

डॉ. तनपुरे साखर कारखाना आर्थिक अरिष्टात सापडल्यानंतर प्रशासकाची नेमणूक केल्यानंतर दोन वर्षे कारखाना बंद राहिला. त्यानंतर झालेली निवडणूक, त्यामधील सत्तांतर व नव्या जोशात सुरू झालेला कारखाना व लोकसभा व विधानसभा निवडणुका झाल्यानंतर हळूहळू कारखान्याप्रति कमी झालेला जोश, कर्जाचे पुनर्गठण या सर्व गोष्टी सभासद व कामगारांना किंबहुना तालुक्याला माहीत आहे. मात्र, तालुक्याची कामधेनू म्हणून उसाची देयके थकीत असताना अथवा पुढील देयकांबाबत शंका-कुशंका असताना देखील आपला कारखाना चालू झाला पाहिजे, आपला कारखाना वाचला पाहिजे, या भावनेतून सच्चा सभासद आजही आपला ऊस येथे देण्यास तयार आहे. तर मिळेल त्यात समाधान मानून कामगारही परिश्रम करण्यास सज्ज आहेत.

जिल्ह्यातील इतर साखर कारखान्याचे रोलर पूजन किंबहुना गळीत हंगाम सुरू होण्यापूर्वी मशिनरीची दुरुस्ती, ऑईलिंग, ग्रीसिंग सुरू होऊन एकूणच हंगाम सुरू होण्याची चिन्हे दिसतात. मात्र, डॉ. तनपुरे साखर कारखान्यात सर्वत्र सामसूम दिसत आहे. 7 जूनला कामगारांना करोनाच्या पार्श्वभूमीवर घरी पाठविण्यात आले. आजही अर्धे कामगार घरी आहेत. या सर्व प्रकारामुळे कामगार व सभासद बांधवामध्ये संभ्रम निर्माण होत आहे. आधीच कोरोनाने लोकांचे कंबरडे मोडले. त्यात जर कारखान्याचे धुराडे पेटले नाही तर काय? या कल्पनेने कामगारांचे रक्तदाब वाढले आहेत.

दरम्यान सध्याच्या संचालक मंडळाची मुदत 30 जून रोजी संपलेली आहे. कोरोनाच्या कारणाने संचालक मंडळ पुढील आदेश येईपर्यंत कायम राहील, अशी शक्यता आहे. त्यामुळे या महिना अखेरपर्यंत वाट पाहून जर शासनाने प्रशासकाची नेमणूक करीत असेल तर आपण केलेल्या तयारीचा काय उपयोग? म्हणून संचालक मंडळ सावध पवित्रा घेत असेल, अशी शंका एका सभासदाने व्यक्त केली आहे. डॉ. तनपुरे कारखाना सुरू व्हावा, अशी भावना अनेक सभासद व कामगारांनी व्यक्त केली आहे. तर कारखान्याची आर्थिक व सर्वच स्थिती अत्यंत गंभीर असताना आम्ही तीन हंगाम कारखाना सुरू केला आहे. यावर्षी भरपूर ऊस कार्यक्षेत्रात उपलब्ध आहे. मात्र, आर्थिक संकट कायम आहे. आमचे नेते खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांचे नियोजनबद्ध कार्यक्रमातून यावर्षीही कारखाना योग्य वेळी सुरू होईल व गळीत हंगाम यशस्वी होईल, असा विश्वास कारखान्याचे संचालक मच्छिंद्र तांबे व रवींद्र म्हसे यांनी व्यक्त केला आहे.
