राहाता व शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील वाहने लिलावाच्या प्रतीक्षेत! सुमारे तीनशे वाहने अनेक वर्षांपासून पडून; वाहनांचे मालकही फिरकेना
नायक वृत्तसेवा, राहाता
राहाता व शिर्डी पोलीस ठाणे हद्दीतील शेकडो महागडी दुचाकी वाहने अनेक वर्षांपासून राहाता पोलीस ठाण्याच्या आवारात लिलाव होण्याच्या प्रतीक्षेत आहेत. शिर्डी पोलीस ठाणे नवीन इमारतीचे बांधकाम करण्यास जागा उपलब्ध नसल्यामुळे या हद्दीत बेवारस आढळलेल्या, चोरीच्या गुन्ह्यातील वापरलेल्या व अपघात झालेल्या दुचाकी गाड्या गेल्या अनेक वर्षांपासून राहाता पोलीस ठाण्याच्या आवारात उभ्या आहेत. राहाता, शिर्डी या दोन्ही ठिकाणच्या जवळपास 300 महागड्या किंमतीच्या दुचाकी गाड्या अनेक वर्षांपासून ऊन, वारा, पाऊस हे तीनही ऋतू अंगावर घेत एकाच जागेवर उभे असल्याने गाड्यांच्या मशीन खराब होऊन गाड्यांना गंज चढला आहे. या गाड्यांचे साहित्य चोरी गेल्याची शक्यता नाकारता येत नाही.
शिर्डी व राहाता पोलीस ठाण्याच्या पोलीस निरीक्षकांनी गाड्यांचे चेसी क्रमांक घेऊन उपप्रादेशिक परिवहन अधिकार्यांना गाडी मालकाची माहिती मागून बेवारस असलेल्या दुचाकी मालकांना पत्रव्यवहार केला की नाही याबाबत प्रश्नचिन्ह आहे. चोरी झालेल्या दुचाकी वाहनांची माहिती घेण्यासाठी नागरिक पोलीस ठाण्याला येतात. परंतु अनेकदा पोलिसांकडून योग्य प्रकारे माहिती मिळत नसल्यामुळे दुचाकी सापडूनही त्या व्यक्तीला ती मिळत नाही.
याबाबत पोलीस अधिकारी म्हणाले, बहुतेक दुचाकी वाहने अपघातातील असल्यामुळे संबंधित मालकांना पत्रव्यवहार करूनही अपघातातील गाड्या घेऊन जाण्यासाठी नागरिक येत नाही. परिणामी या गाड्या अनेक वर्षांपासून याठिकाणी पडून राहतात. चोरी केल्यानंतर गुन्हेगार तिथून पसार होण्यासाठी दुचाकीचा वापर करतात व लांब अंतरावर चोरी केलेली दुचाकी सोडून पळून जातात. बर्याचदा चोरलेल्या दुचाकी नवीन असल्याने मालक नवीन गाडी मिळण्यासाठी विमा कंपनीकडे दावा करतात व अनेकांना नवीन गाड्या मिळाल्यामुळे चोरी झालेल्या गाड्यांचा शोध नागरिक घेत नाही. पत्रव्यवहार करूनही नवीन गाडी मिळाली असल्याने जुन्या गाडीकडे कोणी लक्ष देत नाही. त्यामुळे बेवारस, चोरीच्या गुन्ह्यात वापरलेल्या व अपघातातील गाड्या अनेक वर्षांपासून याठिकाणी पडून आहेत.
पोलीस अधीक्षकांच्या परवानगीने राहाता व शिर्डी पोलीस निरीक्षकांनी या गाड्यांचा लिलाव केला तर गरजू नागरिकांना याचा फायदा होऊ शकेल. दुचाकी वाहनाव्यतिरिक्त याठिकाणी ट्रॅक्टर, ट्रॉली, ट्रक, जेसीबी, जीप अशीही वाहने अनेक वर्षांपासून आहेत. एकाच जागेवर उभ्या असल्याने त्यांना गंज पकडून मशीन खराब होत आहे. तसेच वाहनांचे साहित्य चोरी जाण्याची शक्यता नाकारता येत नाही. संबंधित पोलीस अधिकार्यांनी या वाहनांचा तत्काळ लिलाव करणे गरजेचे आहे.