संगमनेर तालुक्याला संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेचा पुन्हा बसतोय फटका! सरासरीत झपाट्याने झाली वाढ; संक्रमणाच्या बाबतीतही जिल्ह्यात पुन्हा दुसर्‍यास्थानी..


श्याम तिवारी, नायक वृत्तसेवा
नागरिकांचा हलगर्जीपणा आणि प्रशासनाचे दुर्लक्ष यामुळे जिल्ह्यात आटोक्यात आलेली संक्रमणाची दुसरी लाट पुन्हा परतण्याची चिन्हे दिसू लागली आहेत. त्याचा सर्वाधीक फटका पारनेरसह संगमनेर, पाथर्डी, कर्जत आणि श्रीगोंदा तालुक्यांना बसत असल्याचे समोर आले असून आजच्या अहवालातून पारनेर आणि संगमनेर तालुक्यातील रुग्णसंख्या धक्कादायकरितीने वाढली आहे. तर संगमनेर तालुक्याच्या पठारभागात सुरु झालेला कोविडचा उद्रेक अजूनही कायम असून आज एकट्या साकूर परिसरातून तब्बल सतरा तर संपूर्ण पठारावरुन 47 रुग्ण समोर आले आहेत. आज तालुक्यातील 99 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह प्राप्त झाले असून त्यात शहरातील सहा जणांचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने तालुक्याची एकूण संख्या आता 23 हजार 808 झाली असून आत्तापर्यंत एकूण 387 रुग्णांचा मृत्यू झाल्याचे जिल्हा माहिती कार्यालयाकडून प्राप्त आकडेवारीतून समोर आले आहे.


पहिली लाट शमत असल्याचे दिलासादायक चित्र निर्माण झाल्यानंतर नागरिकांसह शासन आणि प्रशासनालाही कोविडचे विस्मरण झाले. त्यातूनच केंद्र व राज्य सरकारने निवडणूकांचे कार्यक्रम जाहीर करुन लोकांच्या मनातील कोविडची भिती दूर करण्याचे काम केले. हजारोंच्या उपस्थितीत होणारे राजकीय मेळावे, सभा आणि संमेलनातून सर्वसामान्य माणसांनाही आपले कार्यक्रम धुमधडाक्यात साजरे करण्याची जणू प्रेरणाच मिळाली. त्याचा परिणाम फेब्रुवारीच्या मध्यापासून देशभरात जंगी विवाह सोहळ्यांसह धार्मिक, सामाजिक, सार्वजनिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचे जणू भरतेच आले. विशेष म्हणजे इतक्या मो÷या उपस्थितीत होणार्‍या या कार्यक्रमांमध्ये कोविड नियमांचे सर्रास उल्लंघन झाल्याने परतलेला कोविड नागरिकांच्या आग्रहावरुनच जणू तातडीने परतला आणि राज्यासह त्याने संपूर्ण देशातच हाहाकार माजवला. देशात संक्रमणाची दुसरी लाट आणण्यात ज्या गोश्टी कारणीभूत होत्या त्यांची मिमांसाही झाली, मात्र शासन, प्रशासन आणि नागरिक त्यातून बोध घ्यायला जणू सपशेल विसरले.


त्याचाच परिणाम संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेतून जिल्हा अजूनही पूर्णतः बाहेर पडलेला नसतांना प्रशासनाकडूनच नियमांच्या अंमलबजावणीत दिरंगाई दिसू लागली. त्यामुळे सर्वसामान्य माणसांमधील हिंमत वाढीस लागून पुन्हा एकदा ‘येऽरे माझ्या मागल्याऽ..’ प्रमाणे ज्या चुका जानेवारी-फेब्रुवारीत केल्या त्याच पुन्हा घडू लागल्या आहेत. ग्रामीणभागातील नागरिकांना तर कोविड म्हणजे आपल्या ओळखीचा विषाणू वाटू लागल्याने शेकडोंच्या उपस्थितीत आणि नियमांची पायमल्ली करीत जंगी विवाह सोहळ्यांचे आयोजन होवू लागले आहे. अशा कार्यक्रमांवर नियंत्रण इेवण्याची जबाबदारी असलेल्या ग्रामपंचायती, सरपंच, ग्रामसेवक, तलाठी, कामगार पोलीस पाटील व ग्रामसुरक्षा समित्याही सध्या कोमात गेल्यासारख्या दिसत असून तालुक्यात अर्निबंधपणे विवाह सोहळ्यांचे बार उडू लागले असून त्यातून संक्रमणाच्या गतीला हातभार लागला आहे.


संगमनेर तालुक्याच्या रुग्णसंख्येत शुक्रवारच्या तुलनेत आज 30 टक्क्यांनी वाढ झाली असून संक्रमणाच्या बाबतीत तालुक्याने जिल्ह्यात चौथ्या स्थानावरुन थेट दुसर्‍या स्थानावर उसळी घेतली आहे. आज शासकीय प्रयोगशाळेच्या 11, खासगी प्रयोगशाळेच्या 57 आणि रॅपीड अँटीजेनच्या 31 निष्कर्षातून तालुक्यातील 99 जणांना कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे. आजच्या एकूण रुग्णसंख्येत शहरातील सहा जणांसह अन्य तालुक्यातील सहा जणांचा समावेश आहे तर दोघांची नावे दुबार आली आहेत. त्यामुळे प्रत्यक्षात तालुक्यातील 91 जणांना संक्रमण झाले असल्याचे समोर आले आहे. तालुक्याच्या पठारभागात संक्रमणाची गती वाढत असल्याचे चिंता निर्माण झाल्या असून आज तालुक्यातील एकूण 37 गावांमधून रुग्ण समोर आले आहेत. त्यातील बारा गावे एकट्या पठारावरील असून साकूर, कुरकूटवाडी, आंबी दुमाला व बिरेवाडीत अधिक प्रमाणात रुग्ण आएळले आहेत. आजच्या अहवालातून पठारावरील साकूर परिसरात कोविडचा उद्रेक कायम असल्याचे दिसून आले असून या भागातून तब्बल 17 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.


आज वाढलेल्या रुग्णसंख्येत शहरातूनही सहाजण समोर आले असून त्यात जोर्वे रोडवरील 73 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, मालदाड रोडवरील 40 वर्षीय तरुणासह 29 वर्षीय महिला आणि संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 65 वर्षीय महिलेसह 52 वर्षीय इसम व 20 वर्षीय तरुणाचा समावेश आहे. अन्य ठिकाणच्या रुग्णात राहाता तालुक्यातील साकूरी येथील 29 वर्षीय तरुण, एकरुखे येथील 45 वर्षीय महिला, कर्जत तालुक्यातील आंबी जळगाव येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 46 वर्षीय महिला व 21 वर्षीय तरुण आणि श्रीरामपूर तालुक्यातील वांगी येथील 54 वर्षीय इसमाचा समावेश आहे. तर पानोडी येथील 35 वर्षीय तरुण व धांदरफळ येथील 40 वर्षीय तरुणांनी आरटीपीसीआर आणि रॅपीड अँटीजेन अशा दोन्ही चाचण्या केल्याने त्यांची नावे दोन्ही अहवालात दुबार नोंदविली गेली आहेत.


आजच्या एकूण अहवालातून तालुक्याच्या पठारभागातील साकूर येथे कोविडचा उद्रेक झाला असून तेथून आज तब्बल सतरा रुग्ण समोर आले आहेत. त्यात 60, 52, 48, 45 व 40 वर्षीय दोन महिला, 18 वर्षीय दोन तरुणी, 27, 23, 22, 20 व 18 वर्षीय तरुण, 16 वर्षीय दोन, 14 वर्षीय व नऊ वर्षीय मुलांचा समावेश आहे. त्यासोबतच अकलापूर येथील 35 वर्षीय महिला, आंबी दुमाला येथील 75 व 70 वर्षीय महिलांसह 51 वर्षीय इसम, 38 वर्षीय तरुण व 18 वर्षीय तरुणी, हिवरगाव पठारावरील 40 वर्षीय तरुणासह 35 वर्षीय दोन महिला, सावरगाव घुले येथील 25 वर्षीय महिला, बिरेवाडीतील 72 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 70, 65, 43 व 36 वर्षीय महिला, कोठे बु. येथील 44 व 34 वर्षीय तरुण, कुरकूटवाडीतील 45 व 42 वर्षीय महिलांसह 38, 32, 30 व 17 वर्षीय तरुण, सहा व दोन वर्षीय बालिका, माळेवाडीतील 55 वर्षीय महिला, म्हसवंडीतील 70 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, आंबी खालसा येथील 36 वर्षीय महिला व घारगाव येथील 58 वर्षीय इसमाचा समावेश आहे.


उर्वरीत रुग्णांमध्ये निमगाव ताळी येथील 33 वर्षीय महिलेसह 15 वर्षीय मुलगी, लोहारे येथील 27 वर्षीय तरुण, चिंचपूर येथील 40 वर्षीय तरुण, आश्‍वी खुर्दमधील 59 वर्षीय महिला, कोळवाडा येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिकासह 50 वर्षीय इसम, हिवरगाव पावसा येथील 31 वर्षीय तरुणासह 28 वर्षीय महिला, वरवंडी येथील 80 वर्षीय वयोवृद्ध नागरिक, वाघापूर येथील 61 वर्षीय ज्येश्ठ नागरिक, सुकेवाडीतील 51 वर्षीय इसम, तळेगाव दिघे येथील 45 वर्षीय दोघी व 40 वर्षीय महिला, 22 वर्षीय तरुण व 13 वर्षीय मुलगा, पानोडी येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 35 व 23 वर्षीय तरुण आणि 35 वर्षीय महिला, खांजापूर येथील 36 वर्षीय तरुण, कोल्हेवाडीतील 26 वर्षीय तरुण, निमज येथील 76 वर्षीय महिला, चिंचोली गुरव येथील 50 वर्षीय इसम, जोर्वे येथील 60 वर्षीय महिला, सोनोशी येथील 75 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, वेल्हाळे येथील 34 वर्षीय तरुण, भोजदरीतील 38 वर्षीय तरुण, दाढ खुर्दमधील 15 वर्षीय मुलगा, धांदरफळ येथील 40 वर्षीय तरुण, गुंजाळवाडीतील 47 वर्षीय इसमासह 28 वर्षीय तरुण, 26 वर्षीय महिला व दोन वर्षीय बालिका, खांडगाव येथील 15 वर्षीय मुलगा, खराडी येथील 49 वर्षीय इसम व मालुंजे येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.


जिल्ह्यात आज सलग दुसर्‍या एकूण रुग्णसंख्येने पाचशेच्या पल्याडची संख्या गाठली असून आज 590 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालातून शुक्रवारच्या तुलनेत पारनेर व कर्जत तालुक्यात दुपटीने तर संगमनेर तालुक्यातून तीस टक्के अधिक रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी राहाता तालुक्यात शुक्रवारी वाढलेली रुग्णसंख्या आज पाचपटीने, जामखेड तालुक्याची रुग्णसंख्या चारपटीने तर पाथर्डी तालुक्याची रुग्णसंख्या निम्म्याने कमी झाली आहे. त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात चौथ्या स्थानावर असलेला संगमनेर तालुका आज उसळी घेत थेट दुसर्‍या स्थानावर पोहोचला आहे. आजच्या अहवालातून पारनेर तालुक्यात शंभराहून अधिक म्हणजे 111, संगमनेर 99, कर्जत 62, नगर ग्रामीण 42, शेवगाव 41, इतर जिल्ह्यातील 34, अहमदनगर महापालिका क्षेत्रातील 28, पाथर्डी 25, अकोले 24, जामखेड 23, श्रीगोंदा 21, राहुरी 19, नेवासा 16, श्रीरामपूर 14, राहाता 10 व भिंगार लष्करी परिसरातील एका रुग्णाचा समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 88 हजार 35 झाली आहे.

गेल्या मोठ्या कालावधीपासून प्रतीक्षा असलेली माहिती आज जिल्हा माहिती कार्यालयाकडून जारी करण्यात आली असून त्यानुसार जिल्ह्यात आत्तापर्यंत कोविड संक्रमणाने सर्वाधीक 1 हजार 472 मृत्यू एकट्या अहमदनगर महापालिका क्षेत्रात झाले आहेत. त्या खालोखाल अहमदनगर तालुक्यात 599, राहाता 405, संगमनेर व श्रीगोंदा प्रत्येकी 387, राहुरी 364, श्रीरामपूर 325, पारनेर 313, नेवासा 289, जामखेड 219, पाथर्डी व कर्जत प्रत्येकी 217, शेवगाव 211, कोपरगाव 192 व सर्वाधीक कमी अकोले 151 जणांचा मृत्यू झालेल्यांमध्ये समावेश आहे. जिल्ह्यात शुक्रवारपर्यंत एकूण 6 हजार 18 जणांचे बळी गेले आहेत, त्यात इतर जिल्ह्यातील 180, इतर राज्यातील एक व भिंगार लष्करी परिसरातील 89 जणांचाही समावेश आहे.

Visits: 16 Today: 1 Total: 118192

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *