जुना माहुली एकल घाट ‘गिरीपुष्प’ फुलांनी बहरला…! निसर्गप्रेमींना आनंदाची मुक्त उधळण करण्यास घालतोय साद..

नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभाग तसा अवर्षणग्रस्त म्हणून ओळखला जातो. परंतु, येथील डोंगररांगा आणि वन्यसंपदा नेहमीच पर्यटकांना आकर्षित करत राहिली आहे. सध्या माहुली येथील जुना एकल घाट ‘गिरीपुष्प’ फुलांनी बहरला असून जणू पांढर्या रंगांचे नक्षीकाम असलेला शालूच पांघरल्याचे विहंगम दृश्य दिसत आहे. घाटात सर्वत्र फुलेच फुले दृष्टीस पडत असल्याने निसर्गप्रेमींना आनंदाची मुक्त उधळण करण्यास साद घालत आहे.

पठारभाग हा नेहमीच अर्वषणग्रस्त राहणारा प्रदेश आहे. मोठमोठे डोंगर आणि वाडी-वस्त्यांवर विखुरलेला विस्तीर्ण प्रदेश असलेला पठारभाग आपल्या निसर्ग सौंदर्यामुळे पर्यटकांना खुणावत असतो. धबधबे, डोंगर, वन्यसंपदा आणि तीर्थस्थानामुळे पठारभागात पर्यटकांसह अभ्यागतांची वर्दळ पहायला मिळते. त्यातच गेल्या दोन-तीन वर्षांपासून मोठा पाऊस पडत असल्याने मुबलक पाणीसाठा होत आहे. परंतु, तात्काळ निचरा होणारी जमीन असल्याने बर्याचदा पाण्याचे दुर्भिक्ष जाणवते. मागच्या वर्षी तर निसर्ग चक्रीवादळ आणि अतिवृष्टीने शेतीपिकांचे मोठे नुकसान झाले आहे. मात्र, निसर्ग सौंदर्य बहरले आहे.

खंदरमाळवाडी गावांतर्गत असलेल्या माहुली येथील जुन्या एकल घाटात मोठ्या प्रमाणात ‘गिरीपुष्प’ वृक्ष आहेत. सध्या या वृक्षांना पांढर्या रंगांची फुले आली आहेत. त्यामुळे संपूर्ण एकल घाट हा गिरीपुष्प फुलांनी बहरल्याचे विहंगम दृश्य आहे. पांढर्या रंगांचे नक्षीकाम असलेला जणू शालूच पांघरल्याचे दृश्य दिसत असल्याने घाटातून ये-जा करणार्या प्रवाशांसह पर्यटकांना मुक्त आनंदाची उधळण करण्यास साद घालत आहे. सकाळच्या वेळी तर वार्याच्या हळूवार झुळकीने ही फुले झोका घेतानाचे चित्र चित्रपटात दिसणार्या देखाव्याप्रमाणेच दिसते. हे चित्र आपल्या नजरेत साठवून ठेवण्यासाठी अनेक फुलप्रेमी आणि निसर्गप्रेमी येथे भेट देऊन छबी टिपतात. माहुलीसह वनकुटे, केळेवाडी, माळवाडी, म्हसवंडी येथील डोंगरांवरही वृक्ष पहावयास मिळतात.

तेलात बुडून गिरीपुष्प फुले गव्हाच्या पिकात किंवा घासामध्ये ठेवल्यास उंदीर येत नाहीत. यासाठी अनेक शेतकरी या फुलांचा उपयोग करतात. त्याचबरोबर या वृक्षाखाली सर्पही येत नाहीत. अशा बहुगुणी असणार्या वृक्षाची फुलेही आकर्षक दिसत असल्याने निसर्ग सौंदर्यही बहरते.
– रामदास थेटे (वन परिमंडळ अधिकारी, घारगाव)
