सावधान; चंदनापुरी घाटात दरड कोसळण्याचे सत्र सुरू! कंपनीचा उदासीन कारभार प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचा धोका..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
पुणे व नाशिक या दोन महानगरांना जोडणारा राष्ट्रीय महामार्ग कायमच कोणत्या ना कोणत्या कारणाने चर्चेत येत असतो. आत्ताही पावसाळा सुरू झाला असून शुक्रवारी (ता.16) सकाळी चंदनापुरी घाटात दरड कोसळली. जाळीतून लहान-मोठे दगड थेट महामार्गावर आल्याने वाहनचालकांची तारांबळ उडाली. यामुळे वाहनधारकांकडून दररोज लाखो रुपयांत टोल वसूल करणार्या महामार्गाच्या संबंधित व्यवस्थापनाचा उदासीन कारभार प्रवाशांच्या जीवावर बेतण्याचा धोका निर्माण झाला आहे.
वाहनांसह प्रवाशांच्या वाढत्या संख्येमुळे जुना पुणे-नाशिक महामार्ग वाहनधारकांसाठी डोकेदुखी ठरला होता. वारंवार होणारी वाहतुकीची कोंडी आणि अपघातांची मोठी संख्या यामुळे नाशिक-पुणे या दोन महानगरांदरम्यान प्रवास करण्यासाठी आठ ते दहा तासांचा कालावधी लागत. त्यातच घाटांची संख्या आणि वळणाचे अरुंद रस्ते यामुळे हा महामार्ग म्हणजे ‘मृत्यूघंटा’ अशीही त्याची ओळख बनली होती. स्थानिक नागरिकांसह या मार्गावरुन प्रवास असंख्य प्रवाशांच्या मागणीनंतर या महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा निर्णय शासनाने घेतला. त्यानुसार आय. एल. एफ. एस. या ठेकेदार कंपनीने महामार्गाची निविदा घेवून 2013 साली आय. एल. एफ. एस. कंपनीने खेड ते झोळे पर्यंतचा रस्ता मॉन्टो कार्लो तर झोळे ते सिन्नर हा रस्ता जी. एच. व्ही. इंडिया प्रा. लि. या अन्य पोट कंपन्यांकडून तयार करुन घेतला व चार वर्षांनंतर 7 फेब्रुवारी, 2017 रोजी खेड ते सिन्नर दरम्यानच्या महामार्गाचे 70 टक्के काम पूर्ण झाल्याने महामार्ग प्राधिकरणाच्या नियमानुसार हा महामार्ग वाहतुकीसाठी खुला करण्यासह संबंधित ठेकेदार कंपनीने टोल वसुली करण्याची परवानगीही मिळविली. टोल सुरु करण्याची परवानगी मिळताच आय. एल. एफ. एस. कंपनीने लागलीच स्वतःची यंत्रणा उभी करुन सिन्नर, झोळे व चालकवाडी (खेड) या तीन ठिकाणच्या टोलनाक्यांवरुन वाहनचालकांकडून वसुलीही सुरु केली.
महामार्गाचे राहिलेले 30 टक्के काम वेळेत पूर्ण करण्याची व या रस्त्याच्या देखभाल व दुरुस्तीची जबाबदारी साहजिकच आय. एल. एफ. एस. कंपनीची होती. मात्र गेल्या चार वर्षात या कंपनीने केवळ टोल वसुलीशिवाय दुसरे काहीच केले नाही. विशेष म्हणजे 18 जानेवारी, 2021 रोजी अहमदनगर जिल्हाधिकार्यांच्या अध्यक्षतेखाली या महामार्गाच्या सद्यस्थितीबाबत आढावा घेण्यात आला. त्यावेळी जिल्हाधिकार्यांनी रस्त्याला जागोजागी पडलेले खड्डे तसेच सर्व्हिस रोड व विकासाच्या कामांबाबत झालेल्या दुर्लक्षावर बोट ठेवून तीव्र नाराजीही व्यक्त केली. या बैठकीला राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक यांनी ‘ठेकेदार’ मिळत नसल्याचे कारण सांगून फेरनिविदा काढून राहिलेली कामे पूर्ण करण्याचे आश्वासन या बैठकीत दिले होते. मात्र त्यानंतरही उदासीन कारभाराचा नमुना समोर आला आहे. पावसाळा सुरू होण्यापूर्वीच दरड कोसळू नयेच्या दृष्टीने खबरदारी घेणे गरजेची असताना कंपनी व्यवस्थापनाने दुर्लक्ष केले आहे.
शुक्रवारी सकाळी चंदनापुरी घाटात जाळीला भेदून छोटे-मोठे दगड थेट महामार्गावर आले. सुदैवाने त्यावेळी कोणतेही वाहन धावत नसल्याने दुर्घटना टळली. दरम्यान, यापूर्वी देखील दरड कोसळण्याच्या घटना घडलेल्या असूनही संबंधित कंपनी शाश्वत सुरक्षितता देण्यास असमर्थ ठरली आहे. सध्या पावसाळा सुरू असल्याने डोंगरात पाणी पाझरून दगड-गोटे सुट्टे होवून खाली कोसळतात. त्यामुळे हा धोका लक्षात घेता वाहनचालकांनीही अधिक सुरक्षिततेने वाहन चालविणे गरजेचे आहे. तर कंपनीने टोल भरणार्या वाहनचालकांनाच्या जिवाची पर्वा करुन तत्काळ सुरक्षिततेच्या दृष्टीने उपाययोजना करणे गरजेच्या आहे.
सध्या पावसाळा सुरू असल्याने चंदनापुरी घाट क्षेत्रात दरड कोसळण्याची शक्यता आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून दुचाकीधारकांनी हेल्मेट वापरणे गरजेचे आहे. तर इतर प्रवासी वाहनांनी देखील काळजी घेण्याची गरज आहे.
– भालचंद्र शिंदे (डोळासणे महामार्ग पोलीस मदत केंद्रप्रमुख)