मुळा धरण भिंतीवरील कठड्यांचे काम निकृष्ट दर्जाचे सुरक्षा धोक्यात; पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांचे होतेय दुर्लक्ष
नायक वृत्तसेवा, राहुरी
मुळा धरणाच्या भिंतीवरील कठड्यांचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे असल्याने या कामाची चौकशी करण्याची मागणी नागरिकांनी केली आहे. कठड्यांच्या कामात वापरण्यात येणारे साहित्य अत्यंत दुय्यम दर्जाचे असल्याने आता मुळा धरणाची सुरक्षा रामभरोसे बनली आहे. लाखो रुपयांचे काम बोगस पद्धतीने सुरू असतानाही संबंधित मुळा पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांचे याकडे जाणूनबुजून अर्थपूर्ण दुर्लक्ष होत असल्याने वरिष्ठांनी बांधकामाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
मुळा धरणस्थळी लाखो रुपयांचा निधी उपलब्ध होऊन काम सुरू झाले. यामध्ये ठेकेदाराला भिंतीवरील दोन्ही बाजूचे कठडे बांधण्याचे काम देण्यात आले आहे. दरम्यान, कठडे बांधले जात असताना क्षमता नसलेले दुय्यम दर्जाचे स्टील वापरले जात आहे. तसेच बांधकामासाठी वाळू वापरणे गरजेचे असताना ठेकेदाराने डस्टचा वापर करून बांधकाम सुरू केलेले आहे. याबाबत पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांशी संपर्क साधून कामाची माहिती देण्यात आली होती.
त्यानंतर अधिकार्यांनी ठेकेदार हा निविदेप्रमाणे काम करीत नसल्याने अधिकार्यांनी काम बंद करण्यास सांगितले होते. परंतु दुसर्या दिवशी परत ‘जैसे थे’ काम सुरू झाले. यामुळे अधिकारी व ठेकेदार यांची मिलीभगत होऊन ते मिळून मुळा धरणस्थळी निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याची टीका होत आहे. दोन दिवसांपूर्वी निकृष्ट दर्जाचे काम करीत असल्याचे पाहून काम थांबविले होते. परंतु अधिकार्यांच्या मर्जीतील ठेकेदार अत्यंत निकृष्ट काम करीत असल्याने पाटबंधारे विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांमार्फत चौकशी करण्याची मागणी केली आहे.
मुळा धरणस्थळी पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांचे दुर्लक्ष झाल्याने धरणाची सुरक्षितता धोक्यात आली आहे. येथे लावण्यात आलेले अनेक पथदिवे बंद पडलेले आहेत. याबाबत अनेकदा पाटबंधारे विभागाच्या अधिकार्यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. परंतु धरणस्थळी अंधाराचे साम्राज्य राहून अवैध धंदे सुरूच रहावे म्हणून वीजेचा प्रश्न सोडविला जात नाही, पथदिवे दुरूस्तीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. याबाबत संबंधित मुळा धरणस्थळावरील अधिकारी मात्र, उदासीन असल्याची आरोप होत आहे. यापूर्वीही अनेकदा मुळा धरणाच्या भिंतीवरून वाळूची वाहतूक संबंधित पाटबंधारे खात्याच्या अधिकार्यांच्या छुप्या आशीर्वादाने सुरू होती. त्यानंतर नागरिकांनी तक्रारी केल्यानंतर ही वाहतूक बंद करण्यात आली होती.