‘हनी ट्रॅप’ प्रकरणाचे ‘ओघळ’ संगमनेर शहर पोलिस ठाण्यापर्यंत..! फेसबुक वरुन ओळख काढीत शेतकऱ्याकडून पन्नास हजार रुपयांची मागणी; ‘त्याच’ मुन्नीसह चौघांवर संगमनेरात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अकोल्यातीलच एका सद्गृहस्थाला प्रेम जालात फसवून दोन लाख रुपयांना गंडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या ‘त्याच’ मुन्नी (बदललेले नाव) विरोधात अकोल्या पाठोपाठ आता संगमनेर शहर पोलिस ठाण्यातही गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु झाली आहे. अकोले तालुक्यातीलच एका 46 वर्षीय शेतकऱ्याला फेसबुकच्या माध्यमातून आपल्या प्रेम जालात ओढून, नंतर त्याला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मुन्नीसह तिच्या दोन सहकारी महिला व वाहनचालकावर गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. मुन्नी आणि तिच्या गँगवर यापूर्वी अकोले पोलीस ठाण्यात दोन गुन्हे दाखल आहेत. अकोल्यापासून सुरु झालेल्या या ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाचे ओघळ संगमनेरपर्यंत आल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तक्रारीनंतर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी अशाप्रकारे कोणाची फसवणूक झाली असल्यास त्यांना समोर येण्याचे आवाहन केले आहे.

याबाबत दैनिक नायकच्या हाती लागलेल्या माहितीनुसार अकोले तालुक्यातील एका 46 वर्षीय शेतकऱ्याला फेसबुकच्या माध्यमातून हेरुन संगमनेरच्या ‘मुन्नी’ आणि कंपनीने आपल्या प्रेम जालात ओढण्यास सुरुवात केली. फेसबुक वरुन ‘त्या’ शेतकऱ्याचा मोबाईल क्रमांक मिळवून मुन्नीने त्याच्याशी व्हॉट्सअपवरुन संपर्क साधण्यास सुरुवात केली. तुम्ही काय करता?, कोठे राहता?, घरात कोण कोण आहेत? अशा वेगवेगळ्या प्रश्नातून अत्यंत व्यावसायिक असलेल्या मुन्नीने अनोळखी असूनही त्या शेतकऱ्याशी सलगी वाढवण्यास सुरुवात केली. त्या महिलेशी काही घेणंदेणं नसल्याने त्या शेतकऱ्याने तिच्या प्रश्नांना उत्तरे देण्याचे टाळून एक प्रकारे त्याकडे दुर्लक्ष केले. याच दरम्यान मे महिन्यात फिर्यादी असलेल्या शेतकऱ्याने नवीन चारचाकी वाहन खरेदी केले. पत्नी, दोन मुले व आई-वडील असा सुखी संसार असलेल्या या शेतकऱ्याच्या कुटुंबात आनंदाला पारावार नव्हता. त्याच्या जल्लोषात मुलांनी परिवारासह काढलेली छायाचित्रे फेसबूकवर टाकली आणि तेथेच या शेतकऱ्यावरील आगामी संकटाची पाल चुकचुकली.

फेसबुकवरील महागड्या चारचाकी वाहनासोबत आपल्या ‘सावजाचे’ छायाचित्र पाहून मुन्नी आणि तिच्या कंपनीच्या तोंडाला पाणी सुटले आणि त्यांनी योजना आखून पुन्हा त्या शेतकऱ्याला फोन केला. गाडी घेतल्याबद्दल त्याचे अभिनंदन करीत पेढ्यांची मागणीही केली. त्यावर त्याने ‘संगमनेरला आल्यावर देईन’ असे म्हणत त्यांंना टाळण्याचा प्रयत्न केला. मात्र व्यावसायिक असलेल्या मुन्नीने विषय पाघळीत त्याच्यावर काही प्रमाणात माया केली. त्यानंतर आठवड्याभराने सहा जून रोजी सकाळी साडेदहाच्या सुमारास मुन्नीने पुन्हा एकदा त्या शेतकऱ्याला फोन करुन ‘आज तुम्ही संगमनेरला येणार आहात का?’ म्हणून बळंच विचारणा केली. यावर त्याने नाही असे उत्तर देत फोन बंद केला. मात्र त्याच दिवशी दुपारनंतर संगमनेरच्या कृषी उत्पन्न बाजार समितीत त्यांचे शेती विषयक काम निघाल्याने ते आपल्या चार चाकी वाहनाने संगमनेरात आले होते. कामकाज आटोपल्यानंतर घराकडे निघाले असता पुन्हा मुन्नीचा फोन आला व कोठे आहात अशी विचारणा करण्यात आली. त्यावर संबंधिताने शेतकी संघाच्या पंपाजवळ असल्याचे सांगितले असता, मी दहा मिनिटात तेथे येते तुम्ही जाऊ नका असे म्हणत तिने त्यांना तेथे थांबण्याची गळ घातली. आणि येथूनच ब्लॅकमेलींग नाट्याची रंगीत तालीम सुरु झाली.

सुमारे तासाभराने मुन्नी आणि तिच्या अन्य दोन सहकारी महिला त्या शेतकऱ्याजवळ आल्या व त्याच्याशी संवाद साधत मुन्नी म्हणाले की ‘तुम्ही तर पेढे दिले नाही; चला घरी मी तुम्हाला चहा पाजते’ त्यावर त्या शेतकऱ्याने नकार देण्याचा प्रयत्न केला असता त्या तिघींनी खूप आग्रह करुन गणेशनगर परिसरातील एका खोलीत त्यांना नेले. त्यातील लाली मावशी (काल्पनीक नाव) याच घरात राहते असे मुन्नीने त्या शेतकऱ्याला सांगितले. खोलीत गेल्यानंतर अन्य दोन महिलांनी खोलीचे पडदे बंद केले. त्यामुळे शेतकऱ्याचा संशय बळावला आणि त्याने पडदे का बंद करता अशी विचारणा केली. त्यावर ‘शहरात लोकांच्या घराची दारे बंदच असतात’ म्हणत मुन्नी हसू लागली. यादरम्यान त्या घरात राहणारी कथीत लाली मावशी चहा करण्यासाठी कोपर्यातील शेगडीजवळ गेली. पण ‘मी चहा घेत नाही’ असे म्हणत त्या शेतकऱ्याने तेथून निघण्याचा प्रयत्न केला. यावेळी मुन्नी त्याच्याजवळ येत म्हणाली ‘तुमचा मोबाईल फार सुंदर आहे’, आणि तिने त्याच्या हातातील मोबाईल हिसकावून घेतला. अचानक घडलेला हा प्रकार पाहून घाबरलेल्या त्या शेतकऱ्याने मुन्नीकडे मोबाईल देण्याची विनवणी केली असता तिने तिचा खरा चेहरा दाखवण्यास सुरुवात केली. त्या शेतकऱ्याची गचांडी पकडीत तिने अत्यंत शिवराळ भाषेत शिवीगाळ करीत ‘इथपर्यंत पाठलाग करीत मागे आलास, तुला लाज वाटत नाही का’ असे म्हणत त्या तिघांनीही त्याला मारहाण करण्यास सुरुवात केली.

यावेळी तिच्या अन्य दोन महिलांंनी त्याला पलंगावर लोटून देत त्याच्या खिशात असलेले एक हजार रुपये काढून घेतले. त्या महिला असल्याने शेतकऱ्याने त्यांना प्रतिकार करण्याचा प्रयत्न केला नाही. या झटापटीत त्याचा शर्टही फाटला. त्याच्याकडून मोबाईल आणि एक हजार रुपये लुटल्यानंतर आता याच्याकडे घेण्यासारखे काही नाही याची खात्री पटल्यावर, मुन्नी त्याच्याजवळ जात, पुन्हा एकदा त्याची कॉलर पकडीत म्हणाली; ‘तू जर पन्नास हजार रुपये दिले नाहीस, तर तुझ्या विरोधात विनयभंगाची तक्रार करीत दाखल करुन तुला तुरुंगात टाकेल’. घाबरलेल्या शेतकरी गयावया करू लागला व हातापाया पडून कसेबसा तेथून सुटला. मात्र त्या खोलीच्या काही अंतर पुढे जाऊन तो जवळपास अर्धातास तसाच उभा राहिला. काही वेळाने मुन्नी तिच्या एका सहकारी महिलेसह आपल्या पांढऱ्या रंगाच्या स्कुटीवरुन बाहेर पडली. या शेतकऱ्याने आपल्या कारमधून त्यांचा पाठलाग करण्यास सुरुवात केली. त्या दोघी अकोले रोडने बायपास रस्त्यावरुन कासारवाडी पुलावर पोहोचल्या असता या शेतकऱ्याने आपले चारचाकी वाहन आडवे घालून आपला मोबाईल आणि हजार रुपये परत देण्याची मागणी केली.

यावेळी त्या दोघींनी सुरुवातीला त्याला मारहाण करीत नंतर आरडाओरड करुन रस्त्याने जाणाऱ्या-येणाऱ्या व आसपासच्या लोकांचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. काही माणसे तेथे जमा झाल्यानंतर त्या दोघींनी हा माणूस आमची छेड काढत असल्याचा कांगावा करण्यास सुरुवात केली. मात्र चारचाकी वाहनात आलेली ती व्यक्ती हात जोडून तेथे उपस्थित असलेल्या लोकांना ‘मी शेतकरी आहे आणि या महिलांनी मला फसवून माझा मोबाईल आणि पैसे लुटल्याचे’ त्यांना सांगितले. त्यामुळे जमाव शेतकऱ्याच्या बाजूने झुकू लागला. ते पाहून मुन्नीने कोणालातरी फोन करुन तातडीने येण्यास सांगितले. त्यानुसार काही वेळातच इर्टीगा कंपनीची चारचाकी कार (क्रमांक एम.एच.17/डी.एक्स. 3924) तेथे आली. त्यात मुन्नीची सहकारी महिला बसली व ते वाहन आणि त्या मागोमाग मुन्नी आपल्या मोपेड वरुन नाशिकच्या दिशेने सुसाट निघून गेले. विशेष म्हणजे कासारवाडीच्या पुलाजवळ संबंधित शेतकऱ्याने त्या दोघींना अडवले असता त्यांनी ‘आम्ही पत्रकार आहोत, गुमान पन्नास हजार रुपये दे अन्यथा तुझी बातमी प्रसिद्ध करुन समाजात तुझी बदनामी करु व तुला तुरुंगातही डांबू अशी धमकी दिल्याचेही संबंधित शेतकऱ्याने दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. सध्या संगमनेर शहर पोलिस ठाण्यात या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रीया सुरु आहे. अकोले पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यात यापूर्वीच मुन्नीसह तिची एक सहकारी महिला आणि वाहन चालकाला अटक झालेली आहे. त्यांच्या पोलिस कोठडीची मुदत संपल्यानंतर त्यांना संगमनेर पोलीस ठाण्याकडे वर्ग केले जाईल व या प्रकरणाच्या तपासाला गती येईल. आता संगमनेर पोलिसांकडेही ‘हनी ट्रॅप’ प्रकरणाचा समांतर तपास आल्याने त्यातून संगमनेरातही या ‘हनीने’ कोणाला आपल्या जाळ्यात ओढले आहे का हे उघड होणार आहे. त्यामुळे अकोल्यातील प्रकरणाचे ओघळ संगमनेरात पोहोचताच संपूर्ण तालुक्यात एकच खळबळ उडाली आहे. संगमनेरात अशा पद्धतीने कोणाचीही फसवणूक झालेली असल्यास, संबंधित व्यक्तींनी न घाबरता पोलिसांना माहिती द्यावी. तक्रार देणार्यांची नावे गुप्त ठेवली जातील असे आवाहन संगमनेर शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक मुकुंद देशमुख यांनी केले आहे.

Visits: 228 Today: 2 Total: 1112937
