वैभवशाली शहरातील ‘शिवस्मारक’ अडकले चर्चेच्या फेर्यात! पालिकेने बांधकाम थांबविले; आता प्रतीक्षा जागा मालकाच्या दातृत्त्वाची..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
अखंड हिंदुस्थानचे आराध्य दैवत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचे संगमनेरातील विस्तारित स्मारक मोठ्या ‘नाट्यमय’ घडामोडींनंतर आता चर्चेच्या फेर्यात अडकले आहे. ‘युवानेत्याच्या’ सुमोटो शिष्टाईनंतर त्यांच्या अनुयायांनी उठवलेले पंधरा फूट चर्चेचे लोळ तर कधीच हवेत विरले असून युवानेतेही या विषायातून आता ‘अज्ञात’ झाले आहेत. मात्र शिवप्रेमींच्या मनातील सल कायम असल्याने पालिकेने संबंधितास नोटीस बजावून सध्या सुरु असलेले बांधकाम बंद पाडले असून जागा मालकाशी चर्चेच्या फेर्या सुरु आहेत. त्यातून स्मारकासाठी अपेक्षीत असलेली जागा मिळेल अशी पालिकेला आशा आहे.

चार दशकांपूर्वी म्हणजे 1979 साली संगमनेर नगरपालिकेने बसस्थानकाजवळील अरगडे गल्ली मारुती मंदिराच्या समोर मोकळ्या पटांगणावर छत्रपती शिवाजी महाराजांची अर्धाकृती प्रतिमा स्थापन केली होती. सदरची प्रतिमा स्थापन करतांना त्यात वारंवार मोठी विघ्नंही आली होती, मात्र त्यावेळी पालिकेच्या कारभारात ‘राजकारण’ कमी आणि शहराचे हित अधिक होते. त्यामुळे त्यावेळी पालिकेच्या नगराध्यक्षपदी असलेल्या नूरमोहंमद शरफुद्दिन शेख यांनी जनभावनेचा आदर करुन ‘त्या’ दांडगाईच्या विरोधात जावून आज आहे त्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांची प्रतिमा स्थापन करण्यास संपूर्ण ‘साथ’ दिली होती. याबाबत दिवंगत नेते व पालिकेचे माजी नगराध्यक्ष राधावल्लभ कासट यांनी ज्येष्ठ समाजवादी नेते राजाभाऊ अवसक यांना अलिकडच्या काळात दिलेल्या एका मुलाखतीत अगदी स्पष्टपणे आणि सविस्तर प्रसंग सांगितलेले आहेत.

सदर ठिकाणी असलेली लॉजची इमारत जमिनदोस्त झाल्यापासूनच येथील शिवस्मारकाच्या विस्तारीकरणाची आणि सुशोभिकरणाची चर्चा सुरु झाली. त्या दरम्यान तालुक्याच्या युवानेत्यांनी सुमोटो पद्धतीने या विषयात लक्ष्य घालून स्मारकासाठी किमान पंधरा फूट जागा सोडली जावी यासाठी मूळ जागामालकाशी संवाद साधला. त्यातून काय साध्य झाले हे अद्यापही गुलदस्त्यात असतांना त्यांच्या समर्थकांनी मात्र जागामालकाच्या दातृत्त्वासह युवानेत्याच्या शिष्टाईचे सोशल माध्यमातील विविध मंचावर गोडवे गायले. प्रत्यक्षात मात्र बांधकाम सुरु झाले तेव्हा या चर्चेचे फलित हाती धुपाटणे लागल्यागत असल्याचे सिद्ध झाले आणि शिवप्रेमींचा दबलेला संताप उसळून वर आला. त्यातून आंदोलने आणि निवेदनेही झाली व पालिका प्रशासन दबावात आले. अखेर पालिकेने संबंधित जागा मालकास नोटीस बजावून सुरु असलेले बांधकाम बंद पाडले.

सद्यस्थितीत सदरचे बांधकाम बंद असून शहरातील असंख्य शिवप्रेमींच्या मागणीप्रमाणे आहे त्याच जागी छत्रपती शिवाजी महाराजांचे विस्तारीत आणि सुंदर स्मारक व्हावे यासाठी पालिका प्रशासनाकडून जागा मालकाशी संवादाच्या फेर्या सुरु आहेत. त्यातून संबंधित जागा मालक आणखी काही फूट जागा सोडण्यास तयार असल्याचे खात्रीलायक वृत्त असून पालिकेकडून ‘युवानेत्या’ला देण्यात आलेल्या अभिवचनानुसार जागामालकाने किमान पंधरा फूट जागा सोडावी यासाठी आग्रह सुरु आहे. त्यातून सकारात्मक गोष्ट घडेल असा भरवसाही संबंधितांना आहे. मात्र याबाबत सामान्य शिवप्रेमींना नेमकी माहिती मिळत नसल्याने शिवस्मारकाच्या विस्तारीकरणाचा विषय ‘राजकीय’ वलयात अडकल्याची चर्चा सुरु झाली आहे. वास्तविक पालिकेने संबंधिताला नियम आणि परवानगीच्या मुद्द्यावर अडविल्याने आता त्याच्यासमोर जागा सोडणे हा एकमेव पर्याय शिल्लक आहे, त्यातून पालिका किती जागा पदरात पाडण्यात यशस्वी होते हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे.

सन 1979 साली शहरातील पहिले स्मारक म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरगडे गल्लीतील अर्धाकृती प्रतिमेकडे पाहिले जाते. त्या काळात या जागी सदरची प्रतीमा उभी करण्यास जागा मालकाकडून मोठा विरोध झाला होता. मात्र तत्कालीन अल्पसंख्याक समाजाचे नगराध्यक्ष नूरमोहंमद शरफुद्दीन शेख यांनी एकाचा विचार करण्याऐवजी शहराचा व्यापक विचार करुन अधिकृतपणे सदरच्या जागी शिवरायांची अर्धाकृती प्रतिमा उभारली. तब्बल चाळीस वर्षांनंतर आता तसाच प्रसंग पुन्हा उभा राहिला असून यावेळची भूमिका बजावण्याची जबाबदारी आता बहुसंख्य समाजाच्या नगराध्यक्षांवर आली आहे. त्यांच्याकडून हा प्रश्न कसा निकाली निघतो याकडे आता संपूर्ण संगमनेरचे लक्ष्य खिळले आहे.

