जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या पुन्हा पाचशेच्या खाली! संगमनेरच्या पठारभागातील प्रादुर्भाव कायम; रुग्णसंख्या मात्र खालावली..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोविड संक्रमणाच्या आकडेवारीतील चढउताराचे दर्शन घडवित आज जिल्ह्यातील रुग्णसंख्येने एकीकडे उंचावलेल्या तालुक्यांना खालच्या, तर खालावलेल्या तालुक्यांना वरच्या पायर्यांवर ढकलले आहे. त्यातूनच बुधवारी शंभरीपार गेलेला तालुका आज पन्नाशीच्या आत आला असून शहरातील अवघ्या एकासह 41 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. आजच्या अहवालात संगमनेर शहरातील अवघ्या एका रुग्णाचा समावेश असून उर्वरीत सर्व रुग्ण ग्रामीणभागातील आहेत. विशेष म्हणजे आजच्याही अहवालातून तालुक्याच्या पठारभागात संक्रमण वाढत असल्याचे समोर आले असून पठारावरील चौदा गावे व वाड्यावस्त्यातून निम्म्याहून अधिक म्हणजे 21 रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 23 हजार 654 झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उंचावलेली जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आज पुन्हा एकदा पाचशेच्या खाली आली. एकूण रुग्णसंख्येत झालेला हा बदल दिलासादायक वाटत असला तरीही आजच्या अहवालातून कोविडसंख्या शून्य होण्याच्या मार्गावरील जिल्ह्यातील अन्य तालुक्यातही संक्रमण वाढल्याचे समोर आले आहे. त्यामुळे यापूर्वी अवघ्या पाच तालुक्यांतच दिसणारी अधिकची रुग्णसंख्या आता दहा तालुक्यांपर्यंत पोहोचली आहे. आज रुग्णसंख्या वधारलेल्या तालुक्यांमध्ये नेवासा, राहाता, शेवगाव, नगर ग्रामीण व श्रीरामपूर तालुक्यांचा समावेश आहे. तर यापूर्वी सातत्याने रुग्णवाढीत आघाडीवर असलेल्या संगमनेरसह जिल्ह्यातील पारनेर, पाथर्डी, श्रीगोंदा व कर्जत तालुक्यातील रुग्णसंख्या मात्र ढासळली आहे. चढ-उताराच्या या खेळात मात्र सामान्य माणूस पुरता हादरला आहे.
संगमनेर तालुक्याच्या पठारभागात वाढत असलेला प्रादुर्भाव चिंताजनक असून ओस पडलेली रुग्णालये पुन्हा एकदा रुग्णांच्या संख्येने दाटू लागली आहेत. आजही पठारावरील तब्बल 14 गावे आणि वाड्या-वस्त्यांमधून 21 रुग्ण समोर आले आहेत. विशेष म्हणजे आजच्या अहवालातून संगमनेर शहरातील 70 वर्षीय महिले व्यतिरिक्त अन्य कोणाचाही अहवाल पॉझिटिव्ह आलेला नाही.
तर ग्रामीण भागातील आंबी खालसा येथील 87 वर्षीय वयोवृद्धासह 24 व 22 वर्षीय तरुण, घुलेवाडीतील 63 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 53 वर्षीय महिला व 26 वर्षीय तरुण, बिरेवाडीतील 68 वर्षीय महिला, चिंचेवाडी (साकूर) येथील 45 वर्षीय इसम, चिंचोली गुरव येथील 50 वर्षीय महिला, जवळे कडलग येथील 51 वर्षीय इसम, सावरगाव घुले येथील 62 वर्षीय महिला, मांडवे बु. येथील 71 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 31 वर्षीय महिला, निमगाव जाळी येथील 23 वर्षीय महिला, सादतपूर येथील 11 वर्षीय मुलगा, साकूर येथील 45 वर्षीय महिला,
तळेगाव दिघे येथील 65 वर्षीय ज्येष्ठ नागरिक, कोल्हेवाडी येथील 55 वर्षीय इसमासह 50 वर्षीय महिला, अकलापूर येथील 15 वर्षीय मुलगा, हिवरगाव पठार येथील 23 वर्षीय महिलेसह सहा वर्षीय मुलगा, पिंपळगाव माथा येथील 70 वर्षीय महिला, नांदूरी दुमाला येथील 60 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 55 व 23 वर्षीय महिला व 30 वर्षीय तरुण, निमज येथील 40 वर्षीय तरुण, पेमगिरीतील 44 वर्षीय महिला, घारगाव येथील 55 वर्षीय इसम, दरेवाडीतील 22 वर्षीय तरुण, कोठे येथील 50 वर्षीय इसम, सावरचोळ येथील 59 वर्षीय इसम, पानोडीतील 35 व 25 वर्षीय तरुण, आंबी दुमाला येथील 42 व 29 वर्षीय महिला व माळेगाव येथील 48 वर्षीय इसमाचा अहवाल आज पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे तालुक्याची रुग्णसंख्या आता 23 हजार 654 झाली आहे.
गेल्या दोन दिवसांपासून उंचावलेली जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आज पाचशेच्या खाली आल्याने जिल्हावासियांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. आजच्या अहवालातून पारनेर 55, शेवगाव 54, पाथर्डी 52, राहाता 44, संगमनेर व नगर ग्रामीण प्रत्येकी 42, अहमदनगर महापालिका व नेवासा प्रत्येकी 24, श्रीगोंदा 22, श्रीरामपूर 19, अकोले व कर्जत प्रत्येकी 15, जामखेड व कोपरगाव प्रत्येकी 13, इतर जिल्ह्यातील 11, राहुरी 10 व भिंगार लष्करी परिसरातील तिघांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 86 हजार 859 झाली आहे.