साईनगरीत अज्ञात चोरट्यांनी लांबविला नऊ लाखांचा ऐवज शिर्डी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल; वाढत्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत
नायक वृत्तसेवा, शिर्डी
शहरातील विवेकानंद नगर येथील घराच्या छताचा पत्रा कापून अज्ञात चोरट्यांनी कपाटातील सोन्या-चांदीचे दागिने व रोख रक्कम असा एकूण 8 लाख 63 हजार रुपये ऐवज चोरला आहे. याबाबत शिर्डी पोलिसांत चोरीचा गुन्हा दाखल झाला असून दिवसेंदिवस वाढत असलेल्या गुन्हेगारीमुळे नागरिक भयभीत झाले आहेत.
याप्रकरणी कमल ज्ञानेश्वर दसरे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले की, आमचा परिवार शिर्डीवरून श्री महालक्ष्मीच्या दर्शनासाठी कोल्हापूरला 16 एप्रिलला गेलाा होता. परत शुक्रवारी (ता.21) रात्री साडेदहाच्या सुमारास घरी आलो. त्यानंतर घराचा दरवाजा उघडून आत गेलो तर बेडरूमचा दरवाजा उघडा होता व त्या दरवाजाला छिद्र पडलेले दिसले. अधिक पाहणी केली असता छताचा पत्राही कापलेला होता. तसेच घरातील सर्व सामान अस्ताव्यस्त पडलेले दिसले व कपाट उघडे होते. कपाटात ठेवलेला 1 लाख 80 हजार रुपयांचा सोन्याचा राणीहार, 3 लाखांचा सोन्याचा नेकलेस व कानातले, 8 हजाराचे कानातले झुबे, तसेच 23 हजाराचे चांदीचे बिस्किट, 3 लाख रुपये रोख असा एकूण 8 लाख 63 हजार रुपयांचा ऐवज अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेला.
या फिर्यादीवरून शिर्डी पोलिसांनी अज्ञात चोरट्यांविरुद्ध भादंवि कलम 380, 457 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस निरीक्षक नंदकुमार दुधाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस करत आहेत. दरम्यान, शिर्डीत दैनंदिन मोठ्या प्रमाणात घर फोडी, पाकिटमारी, गंठण व वाहन चोरीच्या घटना घडत असून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे पोलिसांनी आपल्या खाकीचा धाक निर्माण करून गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ग्रामस्थांकडून होत आहे.