सामाजिक योगदानातून आशासेविकांना चार लाखांची दीपावली भेट

सामाजिक योगदानातून आशासेविकांना चार लाखांची दीपावली भेट
अकोलेतील जिल्हा बँकेच्या सभागृहात पार पडलेल्या कार्यक्रमात वाटप
नायक वृत्तसेवा, अकोले
कोरोना काळात जीवाची पर्वा न करता ‘फ्रंट वॉरियर’ म्हणून भूमिका बजावणार्‍या अकोले तालुक्यातील आशासेविका व गट प्रवर्तकांना तालुक्यातील सामाजिक कार्यकर्त्यांनी सुमारे चार लाख रुपयांच्या सामाजिक योगदान निधीतून अनोखी दीपावली भेट देत त्यांच्या कामाचा गौरव केला.

अकोले येथील अहमदनगर जिल्हा बँकेच्या सभागृहात गुरुवारी (ता.29) संपन्न झालेल्या कार्यक्रमात तालुक्यातील सुमारे 400 आशा व गट प्रवर्तकांना प्रत्येकी एक हजार रुपये, दोन एन-95 मास्क व एक लिटर सॅनिटायझर असे सुरक्षा संचाचे वाटप करण्यात आले. जिल्हा बँकेचे अध्यक्ष सीताराम गायकर, अगस्ति पतसंस्थेचे अध्यक्ष बाळासाहेब भोर व अगस्ति कारखान्याचे संचालक महेश नवले यांनी हा निधी संकलित करण्यामध्ये मोलाचे योगदान दिले.

कोरोना काळात सहकारी संस्था, पतसंस्था, कारखाना, दूध संघ व व्यापारी मित्रांनी पुढे येत सामाजिक निधी संकलित करावा व तो कोरोना योद्धे, कोरोना सेंटर, कोरोना रुग्णालयामध्ये सुविधा उभारण्यासाठी वापरावा असे आवाहन डॉ.अजित नवले व विनय सावंत यांनी केले होते. या आवाहनाला प्रतिसाद देत आशा कर्मचार्‍यांनी केलेल्या कामाचा गौरव करत ही दीपावली भेट या निधीतून उपलब्ध करून देण्यात आली आहे.

प्रास्ताविक सामाजिक कार्यकर्ते विनय सावंत यांनी केले. सदाशिव साबळे यांनी सूत्रसंचालन केले. सीताराम गायकर यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झालेल्या कार्यक्रमात गटप्रवर्तक भारती गायकवाड व सुनीता पथवे, आशा कर्मचारी संगीता साळवे, उषा अडांगळे यांनी मनोगते व्यक्त केली. सामाजिक भावनेतून आशांना दीपावली भेट दिल्याबद्दल सामाजिक कार्यकर्त्यांचे आभार मानले. आशा प्रकल्पाच्या तालुका समूह संघटक रोहिणी भांगरे यावेळी उपस्थित होत्या. तालुका आरोग्य अधिकारी डॉ.इंद्रजीत गंभीरे यांचेही कार्यक्रमासाठी सहकार्य लाभले.

किसान सभेचे नामदेव भांगरे, देवराम मधे यांनी उपक्रमास शुभेच्छा दिल्या. जिल्हा बँकेचे कर्मचारी व अगस्ति पतसंस्थेचे कर्मचारी यांनी कार्यक्रमासाठी मोलाचे योगदान दिले. जिल्हा बँकेचे कर्मचारी प्रतिनिधी सुभाष घुले, बाळासाहेब कोटकर, सामाजिक कार्यकर्ते नीलेश गायकर, अनिकेत चौधरी, श्याम वाकचौरे यावेळी उपस्थित होते. आशा प्रमाणेच तालुक्यातील ग्रामपंचायत कर्मचारी, घर कामगार, अर्धवेळ परिचर, बांधकाम कामगार, आहार कर्मचारी, विधवा, परित्यक्ता, अपंग, निराधार, वृद्ध यांची दीपावली कोरोना महामारीच्या पार्श्वभूमीवर काही प्रमाणात गोड करण्यासाठी सर्वांना बरोबर घेत प्रयत्न करणार असल्याचे यावेळी डॉ.अजित नवले व विनय सावंत यांनी सांगितले. कोरोना महामारीत जनतेला आणखी कशाप्रकारे मदत करता येईल यासाठी आणखी प्रयत्न करणार असल्याची भावना सीताराम गायकर, बाळासाहेब भोर व महेश नवले यांनी व्यक्त केली.

 

Visits: 163 Today: 3 Total: 1111096

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *