घारगाव जवळील बोल्हाई माता पाझर तलाव फुटण्याच्या मार्गावर?
घारगाव जवळील बोल्हाई माता पाझर तलाव फुटण्याच्या मार्गावर?
परिसरातील नागरिकांत भीतीचे वातावरण; संबंधित विभागाने लक्ष घालण्याची गरज
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील घारगाव व कुरकुंडीच्या या दोन्हीही गावांच्या शिवेवर असलेला बोल्हाई माता पाझर तलाव यंदाच्या पावसाळ्यात तुडूंब भरत आला असून, तो फुटण्याच्या मार्गावर असल्याचे दिसत आहे. यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

जून महिन्यात तुरळक पडलेला पाऊस जुलै आणि ऑगस्ट महिन्यात धो ऽऽ धो बरसल्याने घारगाव परिसरातील पाण्याचे उद्भव हळूहळू भरु लागले. त्याच बरोबर कुरकुंडी परिसरातील डोंगरदर्यांतून वाहून येणारे पाणी घारगाव परिसराला वरदान ठरलेला बोल्हाई पाझर तलावामध्ये जमा होत गेले. अखेर मंगळवारी (ता.8) झालेल्या जोरदार पावसामुळे बोल्हाई मातेच्या पाझर तलाव पूर्ण क्षमतेने भरला. परंतु कच्चे बांधकाम असल्याने या पाझर तलावाची सुरक्षितता धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. सद्यस्थितीत तलाव पूर्ण क्षमतेने भरल्याने मोठ्या प्रमाणात पाण्याची गळती सुरू झाली आहे. गळती होणार्या ठिकाणी मोठे भगदाड पडल्याने मोठ्या प्रमाणात पाणी वाहून जात असल्याने तलाव रिकामा होण्यासह फुटण्याची शक्यता निर्माण झाली आहे. या प्रकारामुळे तलाव लाभक्षेत्रातील शेतकर्यांनाही याचा मोठा फटका बसू शकतो.
![]()
या पार्श्वभूमीवर संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी याची तात्काळ दखल घेऊन पाझर तलावाची डागडुजी करावी, अशी मागणी माजी सरपंच दैवत आहेर, शिवाजी गवांदे, रामदास गवांदे, बाजीराव फाफाळे, प्रकाश गाडेकर, संजय आहेर, नितीन कडाळे, भाऊसाहेब गाडेकर, कुणाल आहेर, अक्षय गवांदे आदी शेतकर्यांनी केली आहे.

बोल्हाई पाझर तलाव गळतीची माहिती नागरिकांनी ग्रामपंचायतला दिली आहे. तसेच मी स्वतः प्रत्यक्ष तलाव ठिकाणी जाऊन पाहणी केली आहे. याबाबत लवकरच संबंधित विभागाच्या अधिकार्यांनी पत्रव्यवहार करुन पाठपुरावा करणार आहे.
– नितीन आहेर (सामाजिक कार्यकर्ते, घारगाव)

