सलग दुसर्या कामाला स्थगिती देत म्हाळुंगीच्या पुलासाठी निधी मंजूर! श्रेयवादाचे नवे नाटक रंगणार; पालिकेच्या बहुउद्देशीय व्यापारी संकुलाचा निधी वळवला..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यातील विरोधकांच्या ताब्यात असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांना विकास कामांसाठी निधी देण्यात कशाप्रकारचे राजकारण केले जाते याचे उत्तम उदाहरण संगमनेरातून समोर आले आहे. नागरी आवश्यकतेसाठी तातडीची बाब म्हणून शासनाकडून मागण्यात येणार्या निधीला कात्री लावून तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने मंजूर केलेल्या निधीचाच त्यासाठी वापर होत असून त्यावेळच्या कामांना स्थगिती देवून नव्याने समोर आलेल्या कामांसाठी त्याचा वापर केला जात आहे. असाच प्रकार संगमनेर नगरपालिकेच्या निधीबाबतही घडला असून चक्क दोन वर्षांपूर्वी नाटकी नाल्यासाठी मंजूर झालेला निधी नंतर व्यापारी संकुलाला आणि आता तोच निधी तुटलेल्या म्हाळुंगी नदीच्या पूलासाठी देण्यात आला आहे. हा प्रकार नागरिकांच्या डोळ्यात धूळ फेकणारा असून त्याच निधीच्या मंजूरीतून आता श्रेयवादाची लढाई रंगणार आहे.

गेल्या वर्षी 13 ऑक्टोबर रोजी संगमनेर शहरातील रंगारगल्लीतून प्रवरा नदीकडे जाणार्या मुख्य रस्त्यावरील म्हाळुंगी नदीचा पूल स्वामी समर्थ मंदिराजवळील बाजूने खचला होता. तेव्हापासून पालिकेने अडथळे निर्माण करुन सर्वसामान्यांसाठी या पुलाचा वापर पूर्णतः बंद केला आहे. या नंतरच्या गेल्या आठ महिन्यांपासून सदरील पुलाचे काम व्हावे यासाठी साईनगर, पंम्पिंग स्टेशन, घोडेकरमळा, कासारवाडी या भागातील रहिवाशांनी आंदोलने केली, मंत्र्यांचे व लोकप्रतिनिधींचे लक्ष्यही वेधले, मात्र हजारो लोकांना नित्य हेलपाटे देणारा हा पूल पूर्ववत होवू शकला नाही. या दरम्यान पालिकेच्या प्रशासकांनी वेळोवेळी पत्रव्यवहार करुन नागरी गरजही शासनाच्या लक्षात आणून दिली, मात्र संगमनेर नगरपालिकेवर गेल्या तीन दशकांपासून काँग्रेसचे वर्चस्व असल्याने नागरी गरज राजकारणाच्या तुलनेत हलकी ठरली.

आता आठ महिन्यानंतर संगमनेरच्या म्हाळुंगी नदीवरील तुटलेल्या या पूलाचे काम सुरु होण्याचे संकेत मिळाले असून त्यासाठी साडेचार कोटी रुपयांचा वळवलेला निधी शासनाने मंजूर केला आहे. मात्र त्याचवेळी तळमजल्याचे काम पूर्ण होवून वरच्या मजल्यासाठी निधी मिळालेल्या संगमनेर नगरपालिकेच्या बहुउद्देशीय व्यापारी संकुलाच्या कामाला मात्र स्थगिती देण्यात आली आहे. विशेष म्हणजे गेल्या वर्षी 2 मार्च, 2022 रोजी तत्कालीन महाविकास आघाडी सरकारने या संकुलाच्या कामासाठी 7 कोटी रुपयांचा निधी मंजूर करताना याच सरकारने 3 नोव्हेंबर, 2021 रोजी मंजूर केलेल्या संगमनेरच्या नाटकीनाला सुशोभिकरणाच्या कामाला स्थगिती देवून त्याचा संपूर्ण निधी व्यापारी संकुलासाठी मंजूर केला होता. त्यानंतर पालिकेच्या प्रशासकांनी निविदा प्रक्रियाही राबविली होती, त्याचा कार्यारंभ आदेश काढण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात असतांनाच आता ‘त्या’ कामालाही स्थगिती देण्यात आली आहे.

याबाबत राज्य सरकारने बुधवारी (ता.14) शुद्धीपत्रक जारी केले असून राज्यातील नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान देण्यात येते. सदरील योजनेतंर्गत मिळालेल्या निधीतून होणार्या कामाचा कार्यारंभ आदेश जारी झाला नसल्यास सदरील काम रद्द करुन त्याऐवजी नव्याने समोर आलेल्या कामांना या शुद्धीपत्रकाद्वारे मान्यता देण्यात येत असल्याचे त्यात म्हंटले आहे. शासनाच्या या निर्णयानुसार 2 मार्च, 2022 रोजी नाटकी नाल्याचा विकास थांबवून तहसील कचेरीजवळील पालिकेच्या व्यापारी संकुलाच्या कामासाठी वळविलेल्या सात कोटी रुपयांना स्थगिती देण्यात आली आहे. त्यामुळे मूळ नाटकी नाल्याच्या सुशोभिकरणासाठी मंजूर झालेला निधी व्हाया व्यापारी संकुलाच्या मार्गाने आता म्हाळुंगी नदीचा पूल आणि इतर रस्त्यांच्या कामांकडे वळाला आहे.

बुधवारच्या (ता.14) या शासन निर्णयानुसार संगमनेर नगरपालिकेच्या व्यापारी संकुलासाठी मंजूर असलेल्या सात कोटी रुपयांमधून आता अकरा कामे प्रस्तावित करण्यात आली असून त्यात साडेचार कोटी रुपयांचा साईनगरकडे जाणारा पूल, पावबाकी रस्त्यावर दुतर्फा पादचारी मार्ग तयार करण्यासाठी 70 लाख रुपये, कोल्हेवाडी रस्ता व अलकानगर येथील नाटकी नाल्यावर पूल व सुशोभिकरणासाठी प्रत्येकी 30 लाख, इंदिरा गार्डन व परिसराचे सुशोभिकरण, लिंकरोड ते महामार्गापर्यंत रस्त्याचे सुशोभिकरण, साईश्रद्धा चौकाचे सुशोभिकरण व कुरण रोडवरील नाटकी नाल्यावर पूल आणि सुशोभिकरणासाठी प्रत्येकी 20 लाख, भारत चौक व सखाहरी गुंजाळ यांच्या मोकळ्या जागेत सुशोभिकरणासाठी प्रत्येकी 15 लाख आणि अन्य एका मोकळ्या जागेचे सुशोभिकरण करण्यासाठी 10 लाख रुपये याप्रमाणे 3 नोव्हेंबर 2021 रोजी नाटकी नाल्याच्या विकासासाठी मिळालेला सात कोटी रुपयांचा निधी आता वरील कामांसाठी वापरला जाणार आहे. यातून दोन वर्षांपूर्वी महाविकास आघाडीने मंजूर केलेला निधीच वेगवेगळ्या कामांची वळणे घेत असून या कामाचे श्रेय घेण्यासाठी आत संगमनेरात श्रेयवादाचे नाटकही रंगणार आहे.

या निर्णयाने गेल्या आठ महिन्यांपासून प्रचंड हाल सोसणार्या साईनगर, पंम्पिंग स्टेशन, घोडेकर मळा व कासारवाडीतील हजारो रहिवाशांसह सराफ विद्यालय आणि ओहरा कनिष्ठ महाविद्यालयातील शेकडो विद्यार्थ्यांची परवड थांबणार असली तरीही तोंडावर आलेला पावसाळा लक्षात घेता सदर पूलाचे काम लगेच सुरु होण्याची शक्यता कमी आहे. त्यासोबतच या पूलासाठी नव्याने निधी आवश्यक असताना शासनाने धूळफेक करीत पूर्वीच्याच निधीला नवी वाट करुन दिल्याने या पुलाचे खरे श्रेय माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनाच द्यावे लागणार हे देखील स्पष्ट आहे. असे असतानाही विकासकामांना स्थगिती देवून कागदोपत्री फिरवलेल्या या निधीवरुन लवकरच श्रेयवादाचा सामना बघण्यास मिळेल हे मात्र खरे.

