कोपरगाव पालिकेने थकबाकी असणार्‍या गाळ्यांना ठोकले ‘सील’

नायक वृत्तसेवा, कोपरगाव
येथील पालिकेच्या विविध व्यापारी संकुलातील गाळे धारकांकडे थकीत असलेल्या गाळा भाड्यासह इतर करांच्या थकबाकी वसुलीसाठी ‘सील’ ठोकण्याच्या कारवाईची मोहीम हाती घेतली आहे. बुधवारी व गुरुवारी या दोन दिवसांत दहा गाळ्यांना सील ठोकण्यात आले आहे. या कारवाईमुळे थकबाकीदार गाळाधारकांचे चांगलेच धाबे दणाणले असून 31 मार्च नंतरही ही कारवाई सुरू राहणार असल्याचे पालिकेच्यावतीने सांगण्यात आले आहे.

कोपरगाव शहरात पालिकेची 17 व्यापारी संकुले असून त्यात जवळपास 650 व्यावसायिक गाळे आहेत. यापैकी जवळपास 100 गाळेधारकांनी पालिकेचा गेल्या अनेक वर्षांपासूनचा कर थकवला असल्याने पालिका प्रशासनाने धडक मोहीम राबवित गाळ्यांना टाळे ठोकण्यास सुरवात केली. थकबाकीदार गाळे धारकाकडे सरासरी प्रतीगाळा रुपये 50 हजारांच्या आसपास बाकी असल्याचे प्रशासनाचे सांगणे आहे. ही एकत्रित रक्कम कोटींच्या घरात गेली आहे. भाडे थकीत रक्कम 1 कोटी 14 लाख तर डिपॉझिट न भरलेल्या काही गाळेधारकांची 25 लाख अशी एकूण 1 कोटी 39 लाखांची थकबाकी आहे. शहराच्या विकास कामाकरीता सर्वांनीच वेळेत आपले कर भरणे आवश्यक असते. त्यातूनच शहराचा विकास साधता येत असतो. तरी थकबाकी लवकर भरण्याचे आवाहन पालिका प्रशासनाने नागरिकांना केले आहे. या कारवाई दरम्यान काही गाळेधारकांनी भाडे व करापोटी जागेवर धनादेश व रोख रक्कम भरल्याने त्यांच्यावरील कारवाई टाळली आहे. ही कारवाई उपमुख्याधिकारी सुनील गोर्डे यांच्यासह बाजार विभागाच्या पथकाने केली आहे.

सदर कारवाई यापुढेही चालूच ठेवणार असून थकबाकीदारांनी आपल्याकडे थकीत असलेले कर भरून कारवाई टाळावी. तसेच जे गाळेधारक त्यांच्याकडील भाडे व करापोटी थकीत असलेली रक्कम भरणार नाही, असे गाळे पालिका ताब्यात घेवून पुन्हा लिलाव करणार आहे.
– प्रशांत सरोदे (मुख्याधिकारी, कोपरगाव)

Visits: 4 Today: 1 Total: 23165

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *