पठारभागातील डोंगरदर्यांनी पांघरला हिरवा शालू! धबधब्यांना मोठ्या पावसाची प्रतीक्षा; तर वन्यजीवांचा मुक्त संचार
नायक वृत्तसेवा, घारगाव
जुलै महिन्याचा मध्य सरत आला असून, गेल्या तीन-चार दिवसांपासून पावसाने सर्वदूर जोरदार हजेरी लावली आहे. प्रवरा व मुळा खोर्यातही समाधानकारक बरसात होत असल्याने शेतकर्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. याचबरोबर निसर्ग सौंदर्यही खुलायला लागले आहे. पठारभागातील (ता. संगमनेर) सर्वच डोंगरदर्यांनी जणू हिरवा शालू पांघरल्याचे विलोभनीय दृश्य दिसू लागले आहे. हे निख्खळ सौंदर्य पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरुन प्रवास करणारे प्रवासी मोबाईलमध्ये कैद करत आहे. मात्र, येथील धबधबे मोठ्या पावसाच्या प्रतीक्षेत आहे.
संगमनेर तालुक्यातील पठारभाग म्हटला की निसर्गाची देणचं. सह्याद्री पर्वतरांगांतील विस्तीर्ण डोंगरदर्यांत हा भाग विसावलेला आहे. डोंगरदर्यांबरोबर निसर्गसंपदा असल्याने पक्षी व वन्यजीवांचा सतत वावर असतो. दरवर्षी येथे धोऽऽ धोऽऽ पाऊस पडतो. यंदा मात्र, जुलैमध्ये कोसळणारा पाऊस झाला नसल्याने शेतकर्यांबरोबर निसर्गही मोठ्या पावसाची वाट पाहत आहे. परंतु, सुरुवातीचा आणि गेल्या तीन-चार दिवसांपासून झालेल्या पावसाने पठारभागातील डोंगरदर्यांनी जणू हिरवा शालू पांघरल्याचे विलोभनीय दृश्य दिसत आहे. मात्र, पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या चंदनापुरी घाटातील तामकडा, कळमजाई देवी मातेचा धबधबा, जोठेवाडी, खंदरमाळवाडी आदी धबधबे अद्यापही कोरडेठाक आहे.
सध्या पावसाची संततधार सुरू असून, महामार्गालगतची डोंगररांग आणि पठारभागातील डोंगरांवरील निसर्गसंपदा खुलली आहे. यामध्ये पक्षी व वन्यजीव मुक्तपणे संचार करत आनंदाची उधळण करत असल्याचेही दिसत आहे. हे निख्खळ सौंदर्य पर्यटक व महामार्गावरुन प्रवास करणारे पर्यावरणप्रेमी मोबाईल कॅमेर्यात टिपत आहे. दरम्यान, गेल्या दीड वर्षापासून सुरू असलेल्या कोविड संकटामुळे पर्यटनावर निर्बंध आलेले आहेत. त्यामुळे यंदाही पर्यटकांना निसर्गाचा आनंद घेण्यास हिरमोड होणार आहे.