केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंना शिर्डीची ओढ! महिनाअखेर करणार शक्तीप्रदर्शन; मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांचीही हजेरी

नायक वृत्तसेवा, शिर्डी
शिर्डी लोकसभा मतदारसंघातील ‘तो’ पराभव जिव्हारी लागलेल्या केंद्रीय सामाजिक न्याय विभागाचे राज्यमंत्री व रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष रामदास आठवले यांना पुन्हा एकदा शिर्डीची ओढ लागली आहे. पुढील वर्षी होणार्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने वातावरण निर्मिती करण्यासाठी येत्या 28 मे रोजी त्यांनी शिर्डीत आपल्या पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन आयोजित केले आहे. या अधिवेशनात राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटीलही सहभागी होणार असून आठवलेंकडून यानिमित्ताने शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. त्यामुळे या अधिवेशनाच्या आडून शिर्डीतून लोकसभा लढवण्याची त्यांच्याकडून चाचपणी सुरु असल्याचेही आता बोलले जावू लागले आहे.

गेल्या महिन्यात केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी मुंबईत सभा घेत मोठे शक्तीप्रदर्शन केले होते. आता आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर त्यांनी पक्षाचे राज्यस्तरीय अधिवेशन शिर्डीचे घेण्याचे ठरवले आहे. 28 मे रोजी होणार्या या अधिवेशनाला रिपब्लिकन पक्षाचे राज्यभरातील हजारो कार्यकर्ते आणि समर्थक उपस्थित राहणार असल्याने आणि त्यातच या अधिवेशनाला शिवसेना (शिंदेगट) व भाजपाचे राज्यातील शीर्ष नेतृत्वही प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार असल्याने आठवले पुन्हा एकदा शिर्डीतून उमेदवारी मिळवण्यासाठी प्रयत्नरत असल्याचे समोर आले आहे.

काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेससोबत आघाडी असताना आठवले यांनी 2009 साली शिर्डीची लोकसभा लढवली होती. मात्र त्यावेळी त्यांच्याविरोधात नकारात्मक प्रचार झाल्याने त्यांचा दारुण पराभव झाला. विखे-थोरातांची साथ असतानाही झालेला हा पराभव त्यांच्या जिव्हारी लागल्याने निवडणुकीनंतर त्यांनी काँग्रेस-राष्ट्रवादीची साथ साोडून भाजप-शिवसेनेशी युती केली. त्या बदल्यात भाजपने त्यांना राज्यसभेवर पाठवत मंत्रीपदही दिले. आता त्यांनी ज्या मतदारसंघाने त्यांना पराभव दाखवला, त्याच मतदारसंघातील मतदारांसमोर जाण्याचा त्यांचा विचार असून महिना अखेरीला शिर्डीत होणार्या अधिवेशनातून ही बाब स्पष्ट होत आहे.

या अधिवेशनातून रिपब्लिकन ऐक्याचा नारा देत हजारो कार्यकर्ते व समर्थक उपस्थित राहणार असल्याने या माध्यमातून ते राज्याच्या सत्तेतील प्रमुखांना बोलावून त्यांच्यासमोरच आपले पाठबळ दाखवण्याचा प्रयत्न करतील असा राजकीय जाणकारांचा अंदाज आहे. आठवले सध्या राज्यसभेचे सदस्य असून त्यांचा कार्यकाळ 2026 पर्यंत आहे. या अधिवेशानातून ते शिर्डीच्या जागेवर दावा करण्याचीही शक्यता आहे. मात्र याबाबत त्यांच्या पक्षातील कोणीही स्पष्टपणे बोलण्यास तयार नसल्याचेही चित्र आहे. अर्थात लोकसभा निवडणुकीला अद्याप वर्षभराचा कालावधी असून त्यावेळच्या राजकीय परिस्थितीनुसार निर्णय होईल असे त्यांच्या पक्षाच्या पदाधिकार्यांकडून सांगितले जात आहे.

काँग्रेस-राष्ट्रवादीशी आघाडी असताना रामदास आठवले यांनी 2009 साली शिर्डी लोकसभेची निवडणूक लढवली होती. त्यांच्या प्रचाराच्या सभेत दिवंगत नेते बाळासाहेब विखे पाटील यांनी पंढरपूरचा उल्लेख करीत तेथे ज्याप्रमाणे अॅट्रोसिटीचा मुक्त वापर झाला, तसा शिर्डीत होणार नसल्याचे सांगत नकारात्मक चर्चेचा पाट मोकळा केला होता. तोच मुद्दा त्यांच्या पराभवाचे कारण ठरल्याने निवडणुकीनंतर त्यांनी आघाडीला रामराम करीत भाजपची साथ केली, तेव्हापासून ते भाजप सोबतच आहेत.
