राजकीय संघर्षात संगमनेरात अवतरली ‘शिवसृष्टी’! संपूर्ण शहर भगवेमय; ऐतिहासिक कमानींमुळे रस्त्यांचे सौंदर्य वाढले..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
विधानसभा निवडणुकांमधून राज्यातील जनतेचा मूड बदलल्याचे समोर आल्याने यापूर्वी निधर्मीपणाचा बुरखा घालून फिरणार्‍या राजकीय पक्ष आणि संघटनांनाही आपला विचार बदलण्यास भाग पाडले आहे. त्याचा प्रत्यक्ष अनुभव सध्या संगमनेरकर नागरिकही घेत असून कधीनव्हे ते संगमनेरच्या शिवजयंती उत्सवाला अनन्य महत्व प्राप्त झाले आहे. त्याचा परिणाम सत्ताधारी आणि विरोधकांकडून बसस्थानकाच्या परिसरात ऐतिहासिक देखाव्यांची उभारणी केली गेली असून महामार्गावर लावण्यात आलेल्या स्वागत कमानी, भगव्या झालरी आणि ध्वज यामुळे शहरात शिवसृष्टी अवतरली आहे. विशेष म्हणजे पुरोगामी विचारांचा पगडा असलेल्या काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीने चक्क छत्रपतींचे मंदिर साकारल्याने हा देखावा शहरात चर्चेचा विषय ठरला आहे.


मागील अडीच दशकांपासून महाराष्ट्रात दोनवेळा शिवजयंती उत्सव साजरा केला जातो. राज्यात काँग्रेस व राष्ट्रवादी आघाडीचे सरकार आल्यानंतर त्यांनी तारीख आणि तीथीचा तिढा सोडवण्याच्या हेतूने इतिहास अभ्यासकांची समिती स्थापन करुन त्यांच्याकडून अहवाल मागवला होता. समितीने वेगवेगळ्या संदर्भातून या विषयाचा अभ्यास करुन छत्रपती शिवाजी महाराज सामान्यातले असामान्य कर्तृत्व असल्याने त्यांचे दैवतीकरण टाळण्यासाठी राज्यात तारखेनुसार हा उत्सव साजरा व्हावा असा प्रस्ताव सरकारला दिला. तत्कालीन सरकारमधील काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही राजकीय पक्षांमध्ये पुरोगामी विचारांची बैठक असल्याने त्यांनीही तत्काळ हा प्रस्ताव स्वीकारला आणि राज्यात तीथीनुसार सुरु असलेल्या शिवजन्मोत्सवात तारखेनुसारच्या उत्सवाचीही भर पडली.


राज्य सरकारने तारखेनुसार शिवजन्म सोहळा अधिकृत केल्यापासून राष्ट्रवादी, काँग्रेससह अन्य समविचारी पक्ष आणि संघटनांनीही त्यानुसार हा उत्सव साजरा करण्यास सुरुवात केली. तर, एकसंध असलेल्या शिवसेनेसह विविध हिंदुत्त्ववादी संघटनांनी शिवराय अखंड हिंदुस्थानचे दैवतच असल्याचे सांगत तीथीनुसार सुरु असलेली उत्सवाची परंपरा कायम ठेवली. त्यातून राज्यात तारीख आणि तीथी अशा दोनवेळा छत्रपतींचा जन्मोत्सव साजरा होतो. यावेळच्या विधानसभा निवडणुकीत मात्र गेली चार दशके संगमनेर विधानसभा मतदारसंघावर राज्य करणार्‍या काँग्रेसचा पराभव झाला. तर, राज्यात सलग तिसर्‍यांदा जनतेने महायुतीच्या बाजूनेच कौल दिला. त्यामागील कारणांची मीमांसा करताना देशात जागृत होत असलेला हिंदू मतदार ठळकपणे दिसू लागल्याने आणि नंतरच्या काळातील प्रयागराज कुंभमेळ्यासह छावा चित्रपटला मिळत असलेला प्रतिसाद मतदारांचा बदलता मूड दर्शवणारा ठरल्याने कधीनव्हे ते विरोधकांमध्येही हिंदू सण व उत्सवांचे महत्त्व वाढले आहे.


त्याचा प्रत्यक्ष अनुभव आज तीथीनुसार साजर्‍या होत असलेल्या शिवजन्मोत्सव सोहळ्यातून संगमनेरकर घेत आहेत. नाशिक पदवीधर मतदारसंघातून अपक्ष निवडून आलेल्या आमदार सत्यजीत तांबे यांनी आधीच या सोहळ्याचे नियोजन करताना त्यासाठी बसस्थानकावरील जागेसाठी पहिला दावा ठोकला होता. मात्र परंपरेनुसार दरवर्षी शिवसेनाच हा उत्सव साजरा करीत असल्याने आणि काँग्रेसने दावा केलेल्या जागेवर शिवसेनेच्यावतीने शिवप्रतिमा उभारली जात असल्याने त्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये संघर्ष सुरु झाला. त्यामुळे पोलीस प्रशासनानेही त्यावर निर्णय घेण्याचे टाळून दोन्ही बाजूने समन्वयातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरु केले. मात्र दोघांकडून पोलिसांच्या आवाहनाला प्रतिसाद मिळत नसल्याने राजकीय ‘पेच’ निर्माण झाला.


दोन्ही पक्षांनी यंदा बसस्थानकाच्या आवारात ऐतिहासिक देखावे उभारण्याचे नियोजन केले होते. मात्र उत्सवाचा दिवस तोंडावर येवूनही पोलिसांकडून जागेचा तिढा सुटत नसल्याने काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीचे कार्यकर्ते अस्वस्थ झाले व त्यांनी प्रांताधिकारी कार्यालयासमोर ठिय्या दिला. मात्र त्यानंतरही प्रशासनाकडून कोणताच निर्णय होवू शकला नाही. उलट एकाच जागेवरील दोन दाव्यांमुळे शहरात शांतता व सुव्यवस्थेचा प्रश्‍न निर्माण होण्याची शक्यता दाटल्याने प्रशासनाने दोन्ही पक्षांचे अर्ज प्रलंबित ठेवून ‘त्या’ जागेला प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करून तेथे बंदोबस्त तैनात केला. त्यातून दोन राजकीय आघाड्यांमधील वाद विकोपाला गेला. सरतेशेवटी हा उत्सव राज्याच्या स्वाभीमानाचा असल्याने आमदार अमोल खताळ यांनी एक पाऊल मागे घेत वादग्रस्त जागा सोडून बसस्थानकाच्या दोन भीन्न दिशांना दोघांना परवानगी देण्याचा प्रस्ताव दिला व संगमनेरच्या शिवजन्मोत्सवाचा तिढा सुटला.


दोघांनाही देखाव्यांसह सायंकाळी निघणार्‍या मिरवणुकीचीही परवानगी मिळाल्याने यंदा संगमनेरचा शिवजयंती उत्सव ऐतिहासिक ठरणार याचे आडाखे बांधले जात होते. प्रत्यक्षात या उत्सवाच्या दिनी ते आता सत्यातही उतरले असून गेली अडीच दशके तारखेनुसार शासकीय उत्सव साजरा करणार्‍या काँग्रेसने यंदा पहिल्यांदाच तीथीनुसारच्या उत्सवात उडी घेत शहरात नवा पायंडा निर्माण केला आहे. त्यातही विशेष म्हणजे विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव विचारात घेवून पुरोगामी विचारांनाही मुठमाती दिली गेली असून आजवर छत्रपतींच्या दैवतीकरणा विरोधात असलेल्या काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीने चक्क शिवरायांचे देऊळ साकारले आहे.


तर, शिवसेनेच्यावतीने बसस्थानकाच्या उत्तर कोपर्‍यात किल्ल्याच्या पार्श्‍वभूमीवर छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्‍वारुढ पुतळा उभारला आहे. काँग्रेस व शिवसेना या दोन्ही राजकीय पक्ष व त्यांच्या समर्थक संघटनांनी छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक ते विश्रामगृहापर्यंतच्या महामार्गावर ऐतिहासिक स्वागत कामनीही उभारल्या आहेत. शिवाय दुतर्फा लावण्यात आलेल्या भगव्या झालरी आणि शेकडों भगवेध्वज संगमनेरात जणू शिवसृष्टी अवतरल्याचा भास करुन देत आहेत. त्यातून संपूर्ण संगमनेर भगवेमय झाले असून रस्त्यांच्या सौंदर्यातही मोठी भर पडली आहे.


काँग्रेस प्रणित शिवजन्मोत्सव सोहळा समितीने उभारलेल्या देखाव्यावर कोठेही ‘काँग्रेस’ असा उल्लेख केलेला नाही. मात्र ‘अपक्ष’ आमदार सत्यजीत तांबे यांच्या नेतृत्वाखाली आकाराला आलेल्या या समितीचे बहुतेक सर्वच सदस्य व कार्यकर्ते काँग्रेस पक्षाचे आजी-माजी पदाधिकारी व नगरसेवक असल्याने ही समिती काँग्रेस पुरस्कृतच असल्याचे सांगण्यासाठी वेगळ्या कोणाची गरज नाही. शिवाय शिवमंदिर देखाव्याचा शुभारंभही माजीमंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीतच पार पडल्याने विधानसभा निवडणुकांनी विरोधकांना विचार बदलण्यास भाग पाडल्याची चर्चा सध्या संगमनेरात खमंगपणे सुरु आहे.

Visits: 4 Today: 4 Total: 313958

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *