‘एक वार्ड एक प्रतिनिधी’चा निर्णय बदलू नका ः पगडाल
नायक वृत्तसेवा, संगमनेर
नगरपालिका, महानगरपालिका निवडणुकीचे पडघम वाजत असून, वार्डाची प्रारूप रचना करण्याचे आदेश राज्य निवडणूक आयोगाने दिले आहेत. मात्र, ही प्रारूप रचना करताना शासनाने ‘एक वार्ड एक प्रतिनिधी’ आणि निवडून आलेल्या नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडण्याचा निर्णय घेतला होता. परंतु महाराष्ट्रातील काही सामंतवादी शक्ती, एक जातीय वर्चस्ववादी शक्ती हा निर्णय बदलण्यासाठी सरकारवर दबाव आणत आहे. तरी देखील सरकारने हा निर्णय बदलू नये अशी मागणी विणकर विकास मंडळाचे निमंत्रक हिरालाल पगडाल यांनी निवेदनातून केली आहे.
सदर निवेदनात म्हटले आहे की, जितके वार्ड लहान तितके ते छोट्या छोट्या समूहांना निवडून येण्यास पोषक असतात. एक वार्ड एक प्रतिनिधी या सूत्रामुळे अठरापगड जाती, बारा बलुतेदार, आलुतेदार, छोट्या कारागीर जाती, भटक्या जाती, व्यापारी जाती यांना निवडून येण्याची अधिक संधी असते. वार्ड ऐवजी प्रभाग केल्यानंतर मतदार संख्या वाढते. त्यामुळे छोट्या-छोट्या जाती समूहाचे राजकीय खच्चीकरण होते, धनदांडगे, अधिक लोकसंख्या असलेले जातीसमूह यांचे फावते. त्यामुळे मोठे प्रभाग आणि त्यातून एकापेक्षा अधिक प्रतिनिधी निवडण्यास विरोध आहे. नगरसेवकांतून नगराध्यक्ष निवडल्यामुळे छोट्या वार्डातून निवडून आलेल्या नगरसेवकाला देखील नगराध्यक्ष होण्याची संधी मिळते. त्यामुळे ज्यांच्याकडे सत्ता, संपत्ती आणि प्रतिष्ठा यांचे केंद्रीकरण झाले आहे त्यांच्या दबावाखाली येऊन राज्य शासनाने आपला निर्णय बदलू नये अशी मागणी विणकर विकास मंडळाचे निमंत्रक पगडाल यांनी केली आहे.