‘अखेर’ सारोळे पठारच्या उपसरपंचास पाच महिन्यांनी पडल्या ‘बेड्या’! पाच दिवसांच्या कोठडीत झाली रवानगी; ग्रामसेवक मात्र अजूनही पसारच..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
गावकर्‍यांचा विश्‍वास पायदळी तुडवीत सरपंचपदाच्या कार्यकाळात ग्रामसेवकाच्या मदतीने 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा अपहार करणार्‍या सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच व विद्यमान उपसरपंच प्रशांत गवराम फटांगरे यांना ‘अखेर’ तब्बल पाच महिन्यांनंतर बेड्या ठोकण्यात पोलिसांना यश मिळाले आहे. रविवारी रात्री फटांगरे आपल्या मूळगावी आल्याची माहिती मिळताच घारगाव पोलिसांनी तत्परता दाखवून त्यांना बेड्या ठोकल्या असून न्यायालयाने त्यांची रवानगी पाच दिवसांच्या पोलीस कोठडीत केली आहे. या प्रकरणातील दुसरा आरोपी ग्रामसेवक सुनील शंकर शेळके मात्र अजूनही पोलिसांपासून दूरच असून फटांगरेच्या अटकेनंतर त्याच्याही भोवतीला फास आवळला गेला आहे. संबंधित उपसरपंचाला अटकेपासून वाचवण्यासाठी जिल्हा परिषदेच्या एका माजी सदस्यानेही जोर लावला होता, मात्र त्याचा कोणाताही फायदा झाला नाही.


चालू वर्षांच्या सुरुवातीलाच संगमनेर तालुक्यातील सारोळे पठार या दुष्काळी गावातून सदरचा गंभीर प्रकार समोर आला होता. गावातीलच एका इसमाने याबाबत 25 जानेवारी 2020 रोजी पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांकडे सारोळे पठार ग्रामपंचायतीमध्ये शासकीय निधीचा गैरव्यवहार झाल्याची तक्रार करुन चौकशीची मागणी केली होती. त्यानुसार गटविकास अधिकार्‍यांनी त्रिसदस्यीय समितीची स्थापना करुन 10 फेब्रुवारी 2020 रोजी चौकशीचे आदेश दिले होते. त्यानुसार समितीने या प्रकरणाचा सखोल तपास करुन सन 2012-13 ते 2017-18 या कालावधीत सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच प्रशांत गवराम फटांगरे व ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांनी संगनमताने आर्थिक गैरव्यवहार, अनियमितता व अपहार केल्याचा अहवाल 31 जुलै 2020 रोजी गटविकास अधिकार्‍यांना सोपविला होता.


यानंतर या दोघांनाही वेळोवेळी नोटीसा बजावून आपले म्हणणे सादर करण्यास सांगण्यात आले. सरपंच फटांगरे यांनी यासर्व नोटीसांना केराची टोपली दाखवली, मात्र ग्रामसेवक शेळके यांनी 1 ऑक्टोबररोजी आपले म्हणणे सादर केले. त्याची पडताळणी करुन 10 नोव्हेंबररोजी समितीने अंतिम अहवाल सादर केला. त्यात शासनाने ज्याबाबींसाठी निधी दिला होता त्याचे अंदाज पत्रक घेणे, मुल्यांकन करुन घेणे, त्याला मासिक सभेत ग्रामपंचायतीची मंजूरी घेणे या गोष्टींकडे दुर्लक्ष करुन संगनमताने वरील कालावधीत सरपंच प्रशांत गवराम फटांगरे यांनी 11 लाख 72 हजार 155 रुपयांचा धनादेश स्वतःच्या नावाने काढले आणि संयुक्त जबाबदारी असलेल्या एकूण रकमेच्या (8 लाख 83 हजार 131 रुपये) 50 टक्के रक्कम 4 लाख 41 हजार 565 रुपये असे मिळून एकूण 16 लाख 13 हजार 720 रुपयांचा अपहार केला.


तसेच लोकसेवक असलेल्या ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांनी 4 लाख 66 हजार 626 रुपयांसह संयुक्त जबाबदारी असलेल्या एकूण रकमेच्या (8 लाख 83 हजार 131 रुपये) 50 टक्के रक्कम 4 लाख 41 हजार 565 रुपये असे मिळून एकूण 9 लाख 8 हजार 191 रुपयांचा धनादेश काढून त्याचा अपहार केला. वरील कालावधीत सरपंच प्रशांत फटांगरे यांनी तब्बल 82 वेळा तर ग्रामसेवक शेळके यांनी 24 वेळा स्वतःच्या नावाने धनादेश काढून सारोळे पठार गावाच्या विकासासाठी शासनाकडून प्राप्त झालेला 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा गैरव्यवहार केला. वारंवार धनादेशाद्वारे इतकी मोठी रक्कम काढली जावूनही पंचायत समितीला या गैरव्यवहाराचा थांगपत्ता लागला नव्हता.


याप्रकरणी पंचायत समितीचे विस्तार अधिकारी सुनील गुलाबराव माळी यांनी फेब्रुवारी 2021 मध्ये घारगाव पोलीस ठाण्यात सारोळे पठारचे तत्कालीन सरपंच तथा विद्यमान उपसरपंच प्रशांत फटांगरे व लोकसेवक (ग्रामसेवक) सुनील शेळके या दोघांविरोधात फसवणूक व अपहार केल्याची फिर्याद दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी या दोघांविरोधात भा.द.वी.कलम 420, 409, 34 प्रमाणे गुन्हा दाखल केला होता. तेव्हापासून हे दोन्ही आरोपी पसार झाले होते. त्यांच्या शोधासाठी सुरुवातीला घारगाव पोलिसांनी काही ठिकाणी छापेमारीही केली, मात्र त्याचा कोणताही फायदा झाला नाही. त्यातच यासर्व घडामोडींना पाच महिन्यांचा काळ गेल्याने लोकं विसरले असतील असे समजून उपसरपंच फटांगरे रविवारी रात्री आपल्या कुटुंबाला भेटण्यासाठी गावात आले. त्यांच्या आगमनाचे वृत्त समजताच घारगाव पोलिसांनी छापा घालीत जागेवरच त्यांच्या मुसक्या आवळल्या आणि तब्बल पाच महिलन्यांनंतर ‘अखेर’ दुष्काळी गावाला आणखी दुष्काळात ढकलणार्‍या ‘गाव पुढार्‍या’च्या हातात बेड्या पडल्या.

सदरचा गैरव्यवहार सारोळेपठार येथील एका इसमाच्या तक्रार अर्जाने उघड झाला. सन 2012-13 ते 2017-18 या कालावधीत झालेल्या या गैरव्यवहारात तत्कालीन सरपंच प्रशांत गवराम फटांगरे यांनी तब्बल 82 वेळा आपल्या स्वतःच्या नावाने धनादेश काढून 16 लाख 13 हजार 720 रुपयांचा तर ग्रामसेवक सुनील शंकर शेळके यांनी 24 वेळा आपल्या नावे धनादेश काढून 9 लाख 8 हजार 191 रुपये असा एकूण 25 लाख 21 हजार 911 रुपयांचा अपहार केला. पाच वर्षांच्या कालावधीत या दोघांनी तब्बल 106 वेळा स्वतःच्या नावाने धनादेश काढून इतकी मोठी रक्कम लाटूनही पंचायत समितीच्या गटविकास अधिकार्‍यांना त्याचा थांगपत्ता लागला नव्हता, मात्र याचा त्यांच्यावर कोणताही परिणाम झाल्याचे आजवर दिसून आले नाही.

One thought on “‘अखेर’ सारोळे पठारच्या उपसरपंचास पाच महिन्यांनी पडल्या ‘बेड्या’! पाच दिवसांच्या कोठडीत झाली रवानगी; ग्रामसेवक मात्र अजूनही पसारच..

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *