अकुशल ठेकेदारांमुळे ‘विकास’ कामांची लागली वाट! घोडेकर मळ्यातील घरे गेली रस्त्याखाली; तरीही ठेकेदार साकारतोय रस्त्यावरच रस्ता..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
आगामी पालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर शहरातील विविधभागात ‘विकास’ कामे सुरू झाली आहेत. मात्र कार्यकर्ते सांभाळण्याच्या प्रयत्नात काही ‘अक्कलशून्य’ ठेकेदारांच्याही हाती कामे पडत असल्याने पालिकेकडून लाखो रुपये खर्च करुनही विकास कामांची अक्षरशः वाट लागत आहे. असाच अनुभव सध्या घोडेकर मळा परिसरातील नागरिक घेत असून येथील घरांच्या प्रवेशद्वारापेक्षा गटारी उंच झाल्यानंतर आता रस्त्यांची निर्मितीही त्याच धर्तीवर सुरू झाली आहे. त्यामुळे या भागातील नागरिकांना आता आपल्या घरात जाण्यासाठी पायर्‍या चढण्याऐवजी त्या उतरुन जावे लागणार आहे. अकुशल ठेकेदाराच्या कृपेने सुरू असलेल्या या विकासकामाच्या विरोधात आता स्थानिक नागरिक आंदोलनाच्या मोडमध्ये आले असून पालिकेच्या प्रवेशद्वारसोर आज सकाळपासून उपोषणाला सुरूवात झाली आहे.

घोडेकर मळ्यातील रहिवासी विकास डमाळे यांनी याबाबत प्रसिद्ध पत्रक दिले असून त्यात म्हंटले आहे की, सध्या घोडेकर मळा परिसरात विकास कामांतर्गत सिमेंट काँक्रिट रस्त्यांची निर्मिती केली जात आहे. सुमारे पंधरा वर्षांपूर्वी या भागात असाच रस्ता करण्यात आला होता. त्यावेळी काही नागरिकांची घरे उंच असूनही रस्त्याच्या बरोबरीने आली होती. आताही संबंधित ठेकेदाराकडून तोच कित्ता गिरवला जात असून पूर्वी अस्तित्त्वात असलेल्या रस्त्यावरच नवीन रस्त्याची झालर चढविली जात आहे. यापूर्वीच्या रस्ता आणि गटारीच्या कामांमुळे या भागातील नागरिकांना सुविधा मिळण्याऐवजी असुविधा निर्माण होत होवू लागल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत असून त्यापेक्षा रस्ताच करु नका अशा भूमिकेपर्यंत येथील नागरिक आले आहेत.

दीड दशकांपूर्वी घोडेकर मळ्यातील बहुतेक सर्व घरांना तीन ते चार पायर्‍या होत्या. मात्र त्यावेळी झालेल्या कामात आधीचा रस्ता उकरण्याची तसदी घेण्यात आली नव्हती, त्याचा परिणाम रस्त्याची उंची वाढल्याने बहुतांशी घरे रस्त्यासमान उंचीवर आली. त्यातच गटारीच्या बाबतीही असाच प्रकार झाल्याने अनेक घरांतील सेप्टीक टँकहूनही गटार उंचावर गेल्याने स्थानिकांना नाहक भूर्दंड सहन करुन आपल्या सेप्टीक टँकची उंची वाढवावी लागली होती. त्यातून कोणताही बोध न घेता पालिकेने पुन्हा या भागातील कामे अकुशल ठेकेदाराच्या हाती सोपविली असून त्याच्याकडून मनमानी पद्धतीने स्थानिकांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करुन रस्त्याचे काम सुरू करण्यात आले आहे. या कामात वापरल्या जाणारे कच्चे साहित्यही अत्यंत निकृष्ट दर्जाचे असून त्यामुळे सदरचा रस्ता दीर्घकाळ टिकण्याबाबत साशंकता निर्माण झाली आहे.

रस्त्याचे काम सुरू करण्यापूर्वी या भागातील स्थानिकांनी येथील वस्तुस्थिती संबंधित ठेकेदाराच्या निदर्शनासही आणून दिली होती. मात्र त्याने त्याकडे सपशेल दुर्लक्ष करीत मनमानी पद्धतीने कार्यारंभ केला. आता या भागात पंधरा वर्षांपूर्वी बांधलेल्या सिमेंट रस्त्यावरच तीन-चार प्रकारच्या अनोळखी कंपन्यांचे सिमेंट, पांढरी बारीक माती, मुरूम व राखेचे मिश्रण करुन काम सुरू आहे. या कामासाठी आत्तापर्यंत एक पाटीही वाळू वापरण्यात आलेली नाही. यावरुन हा रस्ता किती दिवस टिकेल याची कोणतीही शाश्वती राहिलेली नसल्याचेही या निवेदनातून सांगण्यात आले आहे. पूर्वीचा रस्ता उकरुन काढल्याशिवाय नवीन रस्ता निर्माण झाल्यास घोडेकर मळ्यातील बहुतेक घरांमध्ये जाण्यासाठी दोन ते चार पायर्‍या उतरुन जावे लागणार आहे, त्यामुळे रस्त्यावरुन वाहणारे पावसाचे पाणी थेट रहिवाशांच्या घरात शिरुन त्यांच्या मालमत्तेचे नुकसान होण्याचीही भिती निवेदनातून वर्तविण्यात आली आहे. सदरचे काम त्वरीत बंद करावे व शास्त्रोक्त पद्धतीने नागरिकांना सुविधा होईल या पद्धतीने येथील रस्ता तयार करावा या मागणीसाठी आजपासून पालिकेच्या प्रवेशद्वाराबाहेर सदरचे उपोषण सुरू करण्यात आले आहे.


ज्या कामांचे समाधान नागरिकांनाच मिळत नसेल, त्या कामांना विकास काम तरी कसे म्हणावे असा प्रश्न घोडेकर मळ्यातील रस्ता कामाच्या निमित्ताने समोर आला आहे. कार्यकर्ता रुपातील अकुशल ठेकेदाराकडून नागरी सुविधांकडे दुर्लक्ष करीत पूर्वीच्या रस्त्यावरच नवा रस्ता चडवला जात असल्याने अनेक नागरिकांच्या घरात जाण्यासाठी आता चक्क तीन ते चार पायर्‍या खाली उतरावे लागणार आहे. गटारींच्या बाबतीही या भागात असाच प्रकार घडला होता. मात्र त्यातून कोणताही बोध घेतला गेला नसल्याने आता रस्तेही तसेच तयार होत आहेत. त्यामुळे शहरात सुरू असलेली विकास कामे नेमकी नागरिकांसाठी आहेत की ठेकेदारांसाठी अशीही शंका यातून उपस्थित झाली आहे.

Visits: 113 Today: 2 Total: 1107882

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *