केळी ओतूरच्या ग्रामसेवकास ग्रामस्थाची शिवीगाळ व दमदाटी अकोले पोलिसांत सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, अकोले
नळपट्टीची थकबाकी मागितल्याच्या रागातून ग्रामस्थाने वसुली नोंदवही भिरकावून ग्रामसेवकाला दमदाटी केल्याची घटना नुकतीच घडली आहे. या प्रकरणी तालुक्यातील केळी ओतूर ग्रामपंचायतचे ग्रामसेवकांनी पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन ‘त्या’ ग्रामस्थावर सरकारी कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

याबाबतचे सविस्तर वृत्त असे की, ग्रामसेवक रवींद्र ताजणे हे कर्मचार्यांसोबत केळी ओतूर येथील ग्रामपंचायत कार्यालयामध्ये काम करत होते. त्यावेळी सरपंच गणेश वायळ, पोलीस पाटील राजेंद्र वायळ आदी पदाधिकारी उपस्थित होते. त्याचवेळी ग्रामपंचयतच्या मोटार दुरुस्तीचे बिले अदा करण्यासाठी जुन्या थकबाकीदारांकडून वसूल करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार थकबाकीदार अरुण वालघडे या ग्रामस्थास ग्रामपंचायत कार्यालयात बोलवून थकबाकी भरण्याची विनंती केली असता राग मनात धरुन त्याने ग्रामसेवक ताजणे यांना शिवीगाळ करून वसुली नोंदवहीसह इतर कागदपत्रे खाली फेकून दिले.

अरुण वालघडे याच्याकडे तीन वर्षांची थकीत नळपट्टी आहे. ही थकबाकी मागितली असता ‘मी पैसे भरणार नाही, तुला काय करायचे ते करुन घे असे मोठ्याने बोलून ग्रामसेवक ताजणे यांना दमदाटी व शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिली. या प्रकरणी ग्रामसेवक रवींद्र ताजणे यांनी अकोले पोलिसांत दिलेल्या फिर्यादीवरुन वालघडे याच्याविरोधात गु.र.नं. 241/2021 भा.दं.वि. कलम 353, 504, 506 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मिथून घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस करत आहे.

