वाढदिवसाच्या दिनीच तरुणावर अंत्यसंस्कार करण्याची आली वेळ!
वाढदिवसाच्या दिनीच तरुणावर अंत्यसंस्कार करण्याची आली वेळ!
सतरावर्षीय तरुणाचा मुळा नदीपात्रातील वाळूतस्करांच्या खड्ड्यात बुडून मृत्यू
नायक वृत्तसेवा, घारगाव
संगमनेर आणि वाळू असे सूत्र आता तालुक्यात घट्ट रुजलेे असून त्याचा फटका मात्र सामान्य नागरिकांनाच बसत आहे. असाच काहीसा प्रकार गुरुवारी पठारावरील कोठे खुर्दमध्ये घडला आहे. येथील दोन तरुण शेतावरचे काम उरकून मुळापात्रात अंघोळीसाठी गेले होते. मात्र मुळेतून दररोज मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी होत असल्याने जागोजागी झालेल्या खुड्ड्यांचा अंदाज न आल्याने ते दोघेही गटांगळ्या खाऊ लागले, सुदैवाने त्यातील एकाचा जीव वाचवण्यात स्थानिकांना यश मिळाले खरे, मात्र या घटनेत बारावी उत्तीर्ण होवून उच्च शिक्षणाचे स्वप्न रंगवणार्या सामान्य शेतकर्याच्या सतरावर्षीय हुशार मुलाला मात्र आपला जीव गमवावा लागला. दुर्दैव म्हणजे सदर तरुणाचा आज वाढदिवस आहे, याच दिवशी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्याची वेळ आल्याने अख्ख्या गावावर शोककळा पसरली असून पठारभागातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
याबाबत घारगाव पोलिसांकडून समजलेल्या माहितीनुसार गुरुवारी (ता.24) पठारावरील कोठे खुर्दमध्ये राहणारा तुषार बबनराव कोठवळ हा सतरावर्षीय तरुण आपला मित्र अजित दत्तात्रय ढोकरे याच्यासह आपल्या शेतावर मुरघास करीत होता. सध्या पावसाळी वातावरण असल्याने दुपारच्यावेळी वातवारणात प्रचंड उकाडा असतो. त्यामुळे मुरघास झाल्यानंतर घामाघूम झालेले ते दोघेही मित्र दुपारी चारच्या सुमारास जवळच असलेल्या मुळा नदीपात्रात अंघोळीसाठी गेले. कोठे खुर्द गावाजवळ मुळानदीत केटीवेअर बांधलेला आहे, त्यापुढेच या दोघांनी नदीत उड्या घेतल्या. मात्र काही क्षणातच आपला मित्र तुषार अचानक गायब झाल्याचे पाहून अजितने आरडाओरड करण्यास सुरुवात केली.
त्याच्या आवाजाने आसपासच्या शेतांमध्ये काम करणार्या शेतकर्यांनी व त्या दोघांच्या काही मित्रांनी लागलीच नदीकडे धाव घेत अजितला पाण्याबाहेर काढले. मात्र तुषारचा काही थांगपत्ता लागला नाही. या दुर्घटनेची वार्ता गावात पोहोचल्यावर अख्खं गाव मुळेकाठी जमा झालं. अनेकांनी मुळेत उड्या घेवून बेपत्ता झालेल्या तुषारचा शोध घेतला, त्यातच त्याचा मृतदेह हाती लागला. तो पाण्याबाहेर काढल्यानंतर गावातील अनेकांना अश्रू अनावर झाले. काही क्षणांपूर्वी हसतखेळत वावरणारा गावातील हुशार मुलगा असा अचानक मृत्यू पावल्याने अनेकांना वेदना अनावर झाल्या, मात्र काळाने आपला डाव साधलेला होता. कोठे खुर्दचे कामगार पोलीस पाटील भास्कर टपाल यांनी याबाबतची खबर दिल्यानंतर घारगाव पोलीस ठाण्याचे निरीक्षक अंबादास भुसारे यांनी आपल्या सहकार्यांसह कोठे खुर्दमध्ये धाव घेतली. कायदेशीर प्रक्रीया पूर्ण करुन त्यांनी सदर तरुणाचा मृतदेह कॉटेज रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात पाठवला. आज त्याच्यावर गावातीलच स्मशानभूमीत अत्यंत शोकाकूल वातारणात अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी पंचक्रोशीतील अनेकजण उपस्थित होते, प्रत्येकाच्या मुखातून हळहळ व्यक्त केली जात होती.
आजी, आजोबा, आई, वडील व मोठा भाऊ असा परिवार असलेला तुषार यंदाच्या बारावीच्या परिक्षेत चांगल्या गुणांनी उत्तीर्ण झाला होता. त्यामुळे पुढील उच्च शिक्षणासाठी त्याने पुण्यातील एका महाविद्यालयातही प्रवेश घेतला होता. आज (ता.25) त्याचा 18 वा वाढदिवस आहे. आपल्या मुलाने बारावीत चांगले गुण मिळवून पुण्यात प्रवेशही घेतल्याच्या आनंदात असलेल्या बबनराव कोठवळ यांनी आपल्या लाडक्या आणि हुशार मुलासाठी खास मोबाईल विकत घेतला होता, आज वाढदिवशी तो त्याला भेट दिला जाणार होता. मात्र तो हातात घेण्यापूर्वीच काळाने त्याच्यावर झडप घातली.
संगमनेर तालुक्यातील मुळा, प्रवरा व म्हाळुंगी नद्यांमधून मोठ्या प्रमाणात वाळूतस्करी चालते. तालुकाभर मोठ्या संख्येने वाढलेल्या या तस्करांनी सर्वच नद्यांच्या पात्रांना अक्षरशः ओरबाडून काढले आहे, त्यामुळे अशा दुर्घटना वारंवार घडत आहे. कोठे खुदमधील घटनेलाही तेथील वाळूतस्करीच कारणीभूत आहे. या दुर्घटनेत एका हुशार विद्यार्थ्याचा हकनाक बळी
गेल्याने संपूर्ण तालुक्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.
कोठे खुर्द हे तसे पठारवरील आडवळणी असलेले गाव. या गावात मोबाईला रेंज नसल्याने अनेकांकडे अद्यापही मोबाईल नाही. गेल्या आठवड्यात मात्र एका खासगी मोबाईत कंपनीने गावात मनोरा उभा केल्याने काही दिवसांपूर्वीच या गावात खासगी मोबाईल सेवाही सुरु झाली होती. आपल्या मुलाने बारावीच्या परिक्षेत चांगले गुण मिळवल्याने आनंदात असलेल्या
बबनरावांनी उसनवारी करुन मुलासाठी नवा मोबाईल संच खरेदी केला होता, आज त्याच्या वाढदिवसाच्या दिनी तो त्याला ‘सरप्राईज’ भेट दिला जाणार होता, मात्र त्यापूर्वीच तो जीवनात कधीही विसरता न येणारे सरप्राईज देत अचानक निघून गेल्याने अख्खं गाव शोकसागरात बुडालं आहे.