आमदार लहामटेंवर राजूर पोलिसांत गुन्हा दाखल
आमदार लहामटेंवर राजूर पोलिसांत गुन्हा दाखल
नायक वृत्तसेवा, अकोले
भरधाव वेगाने जाणार्या वाहनाला टोकल्याच्या रागातून अकोल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार डॉ.किरण लहामटे यांनी पोटात लाथ मारल्याची तक्रार एका ग्रामस्थाने केली आहे. यावरून राजूर पोलीस ठाण्यात आमदार लहामटे यांच्याविरुद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंबंधी रामदास लखा बांडे (वय 40, रा.खडकी, ता.अकोले) यांनी तक्रार दिली आहे. त्यांनी तक्रारीत म्हंटले आहे की, खडकी गावातून आपण पायी जात असताना पाठीमागून भरधाव वेगाने एक गाडी आली. आम्हांला कट मारून ती पुढे गेली. कोणीतरी पर्यटक असावेत म्हणून आम्ही जोरात ओरडून गाडी हळू चालवा असे म्हणालो. त्यावर काही अंतरावर जाऊन ती गाडी थांबली. त्यातून आमदार लहामटे उतरले व म्हणाले, मला ओळखले का मी कोण आहे. असे म्हणून माझ्या पोटात त्यांनी लाथ मारली व शिवीगाळ करून ते निघून गेले. रामदास बांडे यांच्या तक्रारीवरून राजूर पोलीस ठाण्यात आमदार लहामटे यांच्याविरूद्ध अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेवरुन तालुक्यात उलटसुलट चर्चेला उधाण आले आहे.

