शेतकर्याचा नादच खुळा; वाजत-गाजत काढली गायीची मिरवणूक माहुली येथे पशुपालकाचा आनंदोत्सव; शेतकरीही झाले सहभागी

नायक वृत्तसेवा, घारगाव
संत तुकारामांसह अनेक साधू-संतांनी गोमातेचे रक्षण करण्यासह पूजन करण्याबाबत प्रबोधन केलेले आहे. त्यामुळे पशुपालक मुक्या जीवांचा लहान मुलांप्रमाणे सांभाळ करुन जीवापाड प्रेम करत असल्याच्या अनेक बातम्या पाहिलेल्या आहेत. याप्रमाणेच संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील माहुली येथील पशुपालकाने गोमातेवरील प्रेम अनोख्या पद्धतीने व्यक्त केले आहे. अंकुश गाडेकर या पशुपालकाने खिलारी गायीची वाजत-गाजत मिरवणूक काढत आनंदोत्सव साजरा केला. यामध्ये अनेक शेतकरी फेटे बांधून सहभागी झाले होते, त्यामुळे मिरवणुकीची रंगत वाढली होती.

खंदरमाळ गावांतर्गत असलेल्या माहुली येथील अंकुश गाडेकर यांना पहिल्यापासूनच जनावरे सांभाळण्याची प्रचंड आवड आहे. त्यामुळे इतर गायांप्रमाणे एखादी खिलारी गाय आपल्याजवळ असावी असे त्यांना नेहमी वाटत होते. त्यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून खिलारी गायीच्या शोधात होते. त्यानंतर पुणे जिल्ह्यातील अवसरी येथे खिलारी गाय असल्याचे गाडेकर यांना समजले. ते तत्काळ तेथे गेले आणि खिलारी गाय घेवून आले. ही गाय मिळाल्याने त्यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. घरी आणल्या नंतर तिची मिरवणूक काढण्याचे त्यांनी ठरवले.

त्यानुसार वाजंत्र्यांना पाचारण केले, तोपर्यंत फेटेही आणण्यात आले. आणि तयारी करता करता भरभर अनेक शेतकरी देखील गोळा झाले. त्यांना फेट्यांचा साज चढविला. त्यानंतर गायीची वाजत-गाजत मिरवणूक काढण्यात आली. गावकर्यांनाही प्रारंभी हे कळेनाच. मात्र, त्यांना समजल्यावर त्यांनीही मिरवणुकीत सहभाग घेतला. यामुळे मिरवणूक अधिक रंगतदार झाली. गाडेकर यांच्याबरोबर गावकर्यांनी देखील गोमातेचा आनंदोत्सव साजरा केला.

आपण खिलारी गायीला लक्ष्मी मानतो, तिची पूजा करतो. त्यामुळे चांगली खिलारी गाय आपल्या घरी असावी अशी इच्छा होती. मात्र आज ही इच्छा पूर्ण झाली आहे. त्यामुळेच गायीची वाजत-गाजत मिरवणूक काढली.
– अंकुश गाडेकर (पशुपालक)
