राहाता शहरात लसीकरणाचा बट्ट्याबोळ ः मापारी
नायक वृत्तसेवा, राहाता
शहरात आरोग्य विभागाकडून ग्रामीण रुग्णालयात कोविड लसीकरण सुरु होते, ते अतिशय व्यवस्थित सुरु होते. परंतु, तेथेच लसीची कमतरता असताना खासगी ठिकाणी लसीकरण सुरू केले आहे. आरोग्य प्रशासनाच्या या आडमुठ्या धोरणामुळे शहराच्या काही प्रभागांत खासगी ठिकाणी लसीकरण सुरू केल्याने सोयी-सुविधा, गैरसोय, वशिलेबाजी आणि नियोजनाच्या अभावामुळे लसीकरणात वारंवार विस्कळीतपणा येत आहे. याकडे आरोग्य विभाग सोईस्करपणे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस श्रीकांत मापारी यांनी केला आहे.
सरकारी खर्चात फुकटात बॅनरबाजी करुन प्रसिद्धीसाठी हे विस्कळित लसीकरण प्रभागांत सुरू असल्याने सामान्य नागरिकांच्या असंतोषाला आरोग्य विभागाला बळी पडावे लागत आहे. त्यामुळे प्रशासनावर प्रश्नांचा भडीमार होत आहे. शहरात व शहराच्या आजूबाजूला असलेली गावे कोविडच्या दृष्टीने सुरू असलेलल्या नियमांचे तंतोतंत पालन करत आहे. त्यामुळेच प्रशासनाला मोठे सहकार्य होत आहे. मात्र, त्यात होत असलेल्या लसीकरणाच्या गोंधळामुळे नागरिक त्रस्त झाले असल्याचे श्रीकांत मापारी यांनी सांगितले आहे.