‘त्या’ ऑडिओ क्लिप प्रकरणाचा तपास संदीप मिटके करणार..
नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
मागील आठवड्यात नेवासा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विजय करे यांची ऑडिओ क्लिप विविध समाज माध्यमांद्वारे व्हायरल झाल्याने एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर त्यांची तत्काळ अहमदनगर नियंत्रण कक्षात बदली करण्यात आली. या प्रकरणाची विविध स्तरांतून चौकशी करण्याची मागणी होत असताना याचा तपास श्रीरामपूरचे कर्तबगार उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.
सदर ऑडिओ क्लिपमध्ये ‘पोलीस ठाण्यातून मी कारवाईला येतोय, जेवढी वाहने काढून घेता येईल तेवढे घेऊन जा. मी जोपर्यंत सांगत नाही तोपर्यंत सर्व बंद’ अशा आशयाची एका पोलीस अधिकारी व एक इसम यांच्यातील संभाषणाची ऑडिओ क्लिप नेवासा तालुक्यात व्हायरल झाली होती. या क्लिपमध्ये पोलीस निरीक्षक करे समोरच्या व्यक्तीला ‘तुम्ही पिंपळगावमध्ये उच्छाद मांडला असल्याने सगळ्यांचे धंदे कायमस्वरूपी बंद करावे लागेल. मी पोलीस स्टेशनमधून पिंपळगाव येथे येण्यास निघालो आहे. मी तिथे येण्याआधी जेवढे वाहने काढून घेऊन जाता येतील तेवढे काढून घ्या. नाहीतर जेवढी वाहने मिळतील तेवढे जप्त करण्यात येतील. येथून पुढे माझा आदेश येईपर्यंत तुमचे काम बंद राहील’, अशा आशयाची ऑडिओ क्लिप फेसबुक, व्हाट्सऍप आणि विविध समाज माध्यमांद्वारे व्हायरल होत आहे. ही क्लिप कोणी व्हायरल केली? समोरील बोलणारा व्यक्ती कोण? या प्रकरणात अजून कोणाकोणाचा समावेश आहे? याची सविस्तर चौकशी श्रीरामपूर उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप मिटके यांच्याकडून केली जाणार आहे. त्यानंतरच संपूर्ण प्रकरणाचा उलगडा होणार आहे.