यापुढे आता हार्वेस्टरद्वारे ऊस तोडणी : ना. विखे पाटील

नायक वृत्तसेवा, लोणी
सर्वांनी एकत्रित काम करून हा गळीत हंगाम यशस्वी पूर्ण करावा. आता ऊस तोडणीसाठी यापुढे हार्वेस्टरचा वापर करावा लागणार आहे. नैसर्गिक संकट असले तरी, हंगाम यशस्वी करण्यासाठी आपण सर्वजण कटीबध्द होवू, असे प्रतिपादन जलसंपदा तथा पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.

येथील पद्मश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कारखान्याचा बॉयलर अग्रिप्रदिपन समारंभ मंत्री विखे पाटील यांच्या उपस्थितीत करण्यात आला. माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या
कार्यक्रमास जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा शालिनी विखे पाटील, चेअरमन डॉ. सुजय विखे पाटील, व्हा. चेअरमन सोपान शिरसाठ, प्रवरा सहकारी बँकेचे अध्यक्ष डॉ. भास्कर खर्डे, उपाध्यक्ष मच्छिंद्र थेटे, ट्रक्स वाहतूक संस्थेचे अध्यक्ष नंदकिशोर राठी, सभापती ज्ञानेश्वर गोंदकर, कैलास तांबे, गीता थेटे, कार्यकारी संचालक महेश कोणापुरे आदींसह सर्व संचालक उपस्थित होते.प्रारंभी अर्चना आणि विजय काशिनाथ म्हसे, सुरेखा आणि बापूसाहेब चांगदेव कडसकर, हिरा आणि भास्कर विठ्ठल पाटोळे तसेच सुप्रिया आणि विजय उत्तम कडू यांच्या हस्ते बॉयलरचे पूजन करण्यात आले.

मंत्री विखे पाटील म्हणाले, निसर्गाचे मोठे संकट आपल्या समोर आहे. पण याही परिस्थितीत ग्रामीण अर्थकारणाला स्थैर्य देणाऱ्या साखर कारखानदारीला पुढे घेवून जावे लागणार आहे. १ नोव्हेंबर पासून कारखाने सुरु करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. त्यादृष्टीने गाळपाचे नियोजन करावे लागेल. ऊस तोडणी पुढे असलेले आव्हाने पाहाता हार्वेस्टरचा वापर करावाच लागणार आहे. सरकार आता हार्वेस्टरसाठी ३५ टक्के अनुदान देत आहे. गाळप निर्धारित वेळेत पूर्ण व्हावे यासाठीच आपण आपल्या कारखान्याची गाळप क्षमता वाढविली आहे. डॉ. सुजय विखे पाटील यांनी अतिशय कमी कालावधीत या कारखान्याची उभारणी करुन, विक्रम केला आहे. यामुळे आता गाळप क्षमता वाढेल. त्या दृष्टीने उसाचा पुरवठा कशा पद्धतीने होईल याची काळजी सर्वांनी घ्यावी. विक्रमी गळीत हंगामाचे उदिष्ट सर्वांच्या सहकार्याने आपण पूर्ण करु, असे ते म्हणाले.

माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के पाटील म्हणाले, पद्मश्री डॉ. विखे पाटील कारखान्याने आजपर्यंत चांगला भाव दिला आहे. यापुढेही चांगला भाव सभासदांना मिळणार आहे. ऊस लागवड वाढवण्याबरोबरच गाळप वाढवण्यावर सर्वांनी एकत्रित प्रयत्न करावा. ५ ऑक्टोबर रोजी देशाचे सहकार मंत्री अमित शहा यांच्या उपस्थित विविध कार्यक्रमांचे आयोजन प्रवरा परिवाराने केले आहे. हा कार्यक्रम सर्वांनी मिळून यशस्वी करावा, असे आवाहन त्यांनी केले. प्रास्ताविक साखर कामगार सभेचे अध्यक्ष ज्ञानदेव आहेर यांनी केले. आभार संचालक अशोक घोलप यांनी मानले.

Visits: 76 Today: 2 Total: 1114507
