‘सीताफळा’ने अस्वले कुटुंबाच्या जीवनात आणला गोडवा! पहिल्याच तोड्यात घेतले साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न
नायक वृत्तसेवा, अकोले
तालुक्यातील वीरगाव येथील प्रयोगशील शेतकरी बाळासाहेब नामदेव अस्वले यांच्या कुटुंबात ‘सीताफळा’ने चार वर्षांपासून गोडवा आणलाय. एकेकाळी डाळिंब पिकातून समृद्धी मिळवल्यानंतर आता सीताफळातून प्रगतीची वाट धरली आहे. सध्या सीताफळाची काढणी सुरू झाली असून, पहिल्याच तोड्यात साडेतीन लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. त्यांचा हा यशस्वी प्रयोग इतर फळबाग लागवड करणार्या शेतकर्यांसाठी आदर्श ठरत आहे.
शेतकरी बाळासाहेब अस्वले शेतीला नवा आयाम देण्यासाठी व्यावसायिक दृष्टीकोनातून पीक घेत आले आहे. गेल्या पाच वर्षांपूर्वी सहा एकरवर ‘एनएमके वन गोल्डन’ या वाणाच्या सीताफळाची माळरानावर लागवड केली. त्यासाठी ठिबक सिंचनाचा वापर केलाय. दरवर्षी साधारण दीड लाख रुपयांचा खर्च करतात. यंदा देखील हंगाम यशस्वीरित्या काढण्यासाठी सूक्ष्म नियोजन केले. त्यासाठी कुटुंबातील सर्वच सदस्यांनी अपार मेहनत घेतल्याने आज फळ काढणी सुरू झाली आहे. प्रतिकिलोला ६५ रुपयांचा दर मिळत असून, पहिल्याच तोड्यात सहा टन उत्पादन घेतले आहे. अजूनही सुमारे वीस टन उत्पादन मिळण्याची अपेक्षा आहे.
एकेकाळी डाळिंबाचे आगार म्हणून वीरगाव परिसराची ओळख होती. परंतु, तेल्या रोगाने डाळिंब पीक उध्वस्त झाले. त्यामुळे शेतकर्यांनी नवीन पिकांना पसंती दिली आहे. यानुसारच शेतकरी बाळासाहेब अस्वले यांनी सीताफळाची लागवड केली. त्यातून डाळिंबाने जशी समृद्धी आणली तशीच सीताफळाने देखील गोडवा आणला आहे. त्यांचे हे नाविन्यपूर्ण प्रयोग कायमच इतर शेतकर्यांसाठी आदर्श ठरत आहे.
डाळिंबाच्या तुलनेत सीताफळ पीक अत्यंत फायदेशीर आहे. एकदा लागवड केल्यानंतर साधारण तीस वर्ष हे झाड टिकते. रोग व कीड सगळ्यात कमी येत असल्याने फवारणी, खते व मजुरीचा खर्चही कमी लागतो. फक्त सरकारने यावरील प्रक्रिया उद्योगाला चालना देणे आवश्यक आहे.
– बाळासाहेब अस्वले (सीताफळ उत्पादक-वीरगाव)