खरीपाच्या पेरण्यांत राहुरी तालुका गेला पिछाडीवर तर कृषीची उदासिनता आणि खतांच्या कृत्रित टंचाईने शेतकरी हैराण
नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यात लागोपाठ रोहिणी व मृग नक्षत्राने पाठ फिरविल्याने खरीपाच्या पेरण्यांत राहुरी तालुका पिछाडीवर गेला आहे. त्यातच राहुरीच्या कृषी विभागाची उदासिनता आणि खतांच्या कृत्रिम टंचाईने शेतकरी पुरता हैराण झाला असून पुरेशा पावसाअभावी पेरलेले उगवते की नाही? अशी धास्ती बळीराजाने घेतली आहे. तालुक्याच्या बागायती क्षेत्रात अवघ्या 40 टक्के पेरण्या झाल्या असून जिरायत क्षेत्रात मात्र, अद्यापही पावसाअभावी पेरण्यांचा खोळंबा झाला आहे. पावसाचा तब्बल सव्वा महिना उलटूनही पावसाने दडी मारल्याने आता दुबार पेरणीचे संकट शेतकर्यांसमोर उभे राहणार असल्याची भीती शेतकर्यांनी व्यक्त केली आहे.
बागायती भागातील 40 टक्क्यांमध्ये सोयाबीन, बाजरी व कपाशी पिकांच्या पेरण्या झाल्या आहेत. तर जिरायती भागात मूग, मका व भूईमुगाच्या अत्यंत कमी प्रमाणात पेरण्या झाल्या आहेत. त्यामुळे यंदा खरीप हंगामाला अपुर्या पावसाचा फटका बसणार आहे. जून महिन्यात तालुक्याच्या सात महसूल मंडलांत एकूण 133 मिमी म्हणजेच 125 टक्के पाऊस झाला आहे. त्यामुळे पिके संकटात सापडलेली आहेत. तालुक्यात खरीपाचे पेरणीखालील क्षेत्र 26 हजार हेक्टर इतके आहे. मात्र, यावर्षी सुमारे 30 हजार हेक्टरवर खरीपाच्या पेरण्या होणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. जून अखेर बाजरीची 1 हजार हेक्टरवर पेरणी झाली आहे. पश्चिम भागातील ताहराबाद, मल्हारवाडी, चिंचाळे, वरशिंदे, वावरथ जांभळी, कुरणवाडी, गडदे आखाडा, जांभुळवन आदी भागांत बाजरीची पेरणी करण्यात आली आहे. कपाशीच्या साडेपाच हजार हेक्टरवर म्हणजे 80 टक्के पेरण्या झाल्या आहेत. सोयाबीनच्या 1 हजार 300 हेक्टर (64 टक्के) पेरण्या झाल्या आहेत. तर तुरीच्या 35 हेक्टरवर (74 टक्के) पेरा पूर्ण झाला आहे.
यंदा मका पिकाची निचांकी म्हणजे 285 हेक्टरवर तर मुगाची पाच टक्के क्षेत्रावर (54 हेक्टर) पेरा झाला आहे. भूईमुगाच्या पेरण्या अवघ्या दोन हेक्टरवर झाल्या आहेत. एकूण 8 हजार 224 हेक्टरवर 40 टक्के पेरण्या पूर्ण झाल्या आहेत. चारा पिकांच्या 8 हजार 800 हेक्टर तर उसाच्या 503 हेक्टरवर लागवडी झाल्या आहेत. राहुरी मंडळात 134 मिमी, सात्रळ 99 मिमी, ताहाराबाद 96 मिमी, देवळाली प्रवरा 143 मिमी, टाकळीमिया 148 मिमी, ब्राम्हणी 140 मिमी, तर वांबोरीत सर्वाधिक 173 मिमी पावसाची नोंद झाली आहे.