कळसूबाई, हरिश्चंद्रगड व भंडारदरा पर्यटनासाठी शनिवार-रविवार बंद! कोरोनाच्या पार्श्वभूमीवर परिसरातील गावांचा ठराव; प्रशासनाचाही राहणार ‘वॉच’

नायक वृत्तसेवा, राजूर
कोरोनाच्या तिसर्या लाटेचा महाराष्ट्राला असणारा धोका आणि डेल्टा-डेल्टा प्लसचे राज्यात सापडलेले रुग्ण या सर्वांचा विचार करत महाराष्ट्र शासनाने राज्यात पुन्हा निर्बंध लागू केलेले आहेत. या पार्श्वभूमीवर नुकतीच शेंडी वन विश्रामगृह येथे कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य अंतर्गत येणार्या सर्व गावांतील लोकप्रतिनिधी सरपंच, पोलीस पाटील, वन समिती यांचे अध्यक्ष, सदस्य, वन अधिकारी, कर्मचारी व पोलीस अधिकारी यांच्या बैठकीत येत्या शनिवार व रविवारपासून कळसूबाई-हरिश्चंद्रगड अभयारण्य पर्यटनासाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे पर्यटकांनी नियमांचे पालन करुन सहकार्य करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.

कोरोनाच्या तिसर्या लाटेचा महाराष्ट्राला असणारा धोका आणि डेल्टा-डेल्टा प्लसचे रुग्ण सापडल्याने राज्य सरकारने पुन्हा निर्बंध लागू केलेले आहेत. त्यासाठी जमाव बंदीचे आदेशही लागू केलेले आहेत. तसेच गर्दीची ठिकाणे बंद करण्याचे देखील सूचित केले आहेत. याचा फटका पर्यटनाला बसला असून आदिवासी भागात कोरोनाचे संक्रमण टाळण्यासाठी भंडारदरा पर्यटन सरकारच्या सूचनांनुसार शनिवारी व रविवारी बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कळसूबाई शिखर हे पूर्णपणे बंदच राहणार असल्याचे बारी गावचे सरपंच तुकाराम खाडे यांनी सांगितले. तर भंडारदरा देखील शनिवारी व रविवारी बंद राहणार असून पुढची परिस्थिती पाहून निर्णय घेण्यात येईल असे भंडारदरा गावचे सरपंच पांडुरंग खाडे यांनी सांगितले.

या निर्णयामुळे सुशिक्षित बेरोजगार तरुण देशोधडीला लागणार आहे. आधीच दीड वर्षांपासून येथील व्यवसाय लॉकडाऊनमुळे बंद होता आणि आताच काही दिवसांपूर्वी निर्बंध हटविल्यने तरुणांनी पुन्हा एकदा व्यवसाय सुरू केला होता. यासाठी कोणी उधार पैसे घेतले तर अनेकांनी बँकेतून कर्ज काढले. मात्र राज्यात पुन्हा तिसर्या लाटेची शक्यता असल्याने राज्य शासनाने कडक निर्बंध लावत जमाव बंदीचे आदेश पारित केल्याने याचा पर्यटनावर मोठा परिणाम झाला आहे. तेव्हा सरकारने आमच्याकडेही लक्ष द्यावे अशी मागणी भंडारदरा परिसरात व्यावसायिकांनी केली आहे. पर्यटकांनी शनिवारी व रविवारी भंडारदरा येथे येवू नये असे आवाहनही त्यांनी केले आहे. या बैठकीस वनक्षेत्रपाल डी. डी. पडवळ, अमोल आढे, सहा. पोलीस निरीक्षक नरेंद्र साबळे आदी उपस्थित होते.

कळसूबाई, हरिश्चंद्रगड, रतनवाडी, साम्रद, रतनगड परिसरात कोरोना संक्रमण होऊ नये यासाठी शनिवार व रविवार या दिवशी पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. नियम मोडणार्या पर्यटकांवर कारवाई केली जाईल.
– गणेश रणदिवे (सहाय्यक वनसंरक्षक, कळसूबाई-हरिश्चंद्र अभयारण्य)

मद्यपान करून रस्त्यावर उतरणार्या व्यक्तींना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली जाईल. तसेच सर्वांनी पर्यटनावेळी कोविड नियमांचे पालन करावे.
– नरेंद्र साबळे (सहा. पोलीस निरीक्षक-राजूर)

