दिलासादायक; राहाता तालुक्यात रुग्णसंख्येत होतेय घट
नायक वृत्तसेवा, राहाता
तालुक्यातील पंच्याहत्तर टक्के गावांतून कोविडने काढता पाय घेण्यास सुरूवात केली आहे. कोरोना संसर्ग फैलाव दर तीन टक्क्यांवर घसरला आहे. तर लसीकरणाने पासष्ट हजारांचा टप्पा ओलांडला आहे. यामुळे तालुक्याला मोठा दिलासा मिळत आहे.
गुरुवारी (ता.1) पंधराशे चाचण्या झाल्या तर केवळ 64 बाधित होते. सोळा गावांत एकही नवा रुग्ण नव्हता. 31 गावांतील रुग्णसंख्या एक आकडी आहे. 61 पैकी 47 गावांतून कोविड विषाणू काढता पाय घेत आहे. तर शहरात गेल्या नऊ दिवसांत दररोज सरासरी दीडशे चाचण्या झाल्या, त्यात केवळ दोन रुग्ण आढळले. शिर्डीची परिस्थितीही याहून वेगळी नाही. लसीकरणाने 65 हजारांचा टप्पा ओलांडला आहे. पहिला डोस 47 हजार तर दुसरा डोस 18 हजार जणांनी घेतला आहे. याबाबत माजी मंत्री, आमदार राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले, राहाता तालुक्यात कोविडची लाट झपाट्याने ओसरतेय. तिसर्या लाटेला तोंड देण्याची तयारी वेगाने सुरू आहे. तालुक्याने लसीकरणात आघाडी घेतलीय, राज्यात सर्वाधिक वेगाने आम्ही लसीकरण पूर्ण करणार आहोत. हे उत्तम टीमवर्कचे फलित आहे. प्रत्येक गावात खबदारी घेतली जातेय. प्रांताधिकारी गोविंद शिंदे म्हणाले, लस घेतली त्यांनीच घरची कामे करण्यासाठी घराबाहेर पडावे, असा आग्रह धरला जाणार आहे. सरकारी आरोग्य यंत्रणेने मोठी मेहनत घेतल्याने कोविडचा प्रकोप कमी झाला. तथापि, प्रत्येकाने काळजी घेणे गरजेचे आहे.