श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावरील खड्डे मुरूमीकरण करुन बुजविले डांबरीकरण करून खड्डे बुजविण्याची संभाजी ब्रिगेडची मागणी

नायक वृत्तसेवा, श्रीरामपूर
श्रीरामपूर-नेवासा रस्त्यावर खोकर फाट्यानजीक अपघाती खड्डे बुजविण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने निवेदन दिल्यानंतर सार्वजनिक बांधकाम विभाग खडबडून जागा झाला. याची तातडीने दखल घेतली; परंतु डांबरीकरणावर मुरूमीकरण करून केवळ आंदोलन टाळण्यासाठी केलेली बोळवण असून या राज्यमार्गावर डांबरीकरण करून खड्डे बुजविण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने पुन्हा केली आहे.

संभाजी ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष शिवाजी पवार, शहराध्यक्ष तुकाराम लबडे, पलाश पाटणी, उत्कर्ष दुधाळ, तन्मय सदावर्ते, स्वप्नील भोसले, संदीप मुठे यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यालयात निवेदन देवून राज्यमार्गावरील दुरुस्तीची मागणी केली होती. बांधकाम खात्याने तातडीने खड्डे बुजविण्याची मागणी पूर्ण न झाल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वरीष्ठ अधिकार्यांनी तातडीने दखल घेत संभाव्य अपघात टाळण्यासाठी पक्के डांबर खडीस मंजुरी येईपर्यंत मुरूम टाकून खड्डे बुजविण्याची व्यवस्था केली; परंतु त्यावर आमचे समाधान होणार नसून सार्वजनिक बांधकाम खात्याने या राज्य मार्गावरील काही खड्ड्यांत टाकलेला मुरूम काढून यावर तातडीने डांबरीकरण करावे, अशी मागणी होत आहे.

जोराचा पाऊस आल्यानंतर हा मुरूम लागलीच वाहून गेल्यानंतर एकाच पावसात सर्व खड्डे उघडे पडणार आहेत, त्याचबरोबर परिसरातील विविध संघटनांनी अनेकदा या राज्य मार्गावरील ‘साईड शोल्डर स्कीपिंग’ म्हणजेच रस्त्याच्या कडेच्या साईडपट्ट्यांवर मुरूम टाकण्याची मागणी केली जात असताना याकडे सार्वजनिक बांधकाम खात्याने दुर्लक्ष केल्याने अनेकदा वाहनांच्या क्रॉसिंग दरम्यान रस्त्याच्या खाली वाहन उतरविण्यास घाबरतात. डांबरीकरणावर मुरूमीकरण करून केवळ आंदोलन टाळण्यासाठी केलेली बोळवण असून या राज्यमार्गावर डांबरीकरण करून खड्डे बुजविण्याची मागणी संभाजी ब्रिगेडने पुन्हा केली आहे.

