एसपी साहेब, घारगाव पोलीस ठाण्यात चाललंय काय? पैशांसाठी प्रत्येकाची अडवणूक; चार महिने होवूनही खुनाचा तपास नाही..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
भ्रष्टाचार आणि मनमानी कारभारामुळे सतत चर्चेत राहणारेे घारगाव पोलीस ठाणे आता निष्क्रियतेमध्येही आघाडीवर पोहोचलेे आहे. लष्करी सेवेतून निवृत्त झालेल्या अधिकार्याच्या अधिपत्त्याखाली वर्षभरातच या पोलीस ठाण्याची राहिलेली रयाही मुळेच्या पाण्यात वाहून गेली असून घटनामागून घडणार्या घटना आणि तपासाच्या नावाने मात्र बोंबाबोंब अशा सततच्या अवस्थेमुळे कधीकाळी पठारभागाला वरदान ठरु पाहणारे हे पोलीस ठाणे आता अभिशापासारखे भासू लागले आहे. गेल्या काही काळात येथील भ्रष्टाचाराने अक्षरशः परिसीमा गाठली असून चक्क यात्रा-जत्रा कमिट्यांना उत्सवाची परवानगी देण्यासाठीही पैशांची मागणी केली गेली होती. अदखलपात्र गुन्ह्यातील लोकांना तासन्तास बसवून सोडण्यासाठी पैसे घेतल्याच्या प्रकारांचीही जोरदार चर्चा पठारात सुरु आहे. ६३ वर्षीय वृद्धाचा खून होवून चार महिने लोटले आहेत, चोर्या, घरफोड्या, विविध प्रकारचे धंदे फोफावले आहेत. मात्र इतके सगळे घडूनही जिल्ह्याचा पूर्वानुभव असलेल्या पोलीस अधीक्षकांनी ‘घारगाव’कडे केलेले दुर्लक्ष आश्चर्यजनक आहे.
संगमनेर तालुयाचा भौगोलिक विस्तार आणि विरळ लोकसंख्येच्या कारणाने तालुयाची पूर्वीच्या दहा आणि आत्ताच्या बारा महसुली मंडलात विभागणी करण्यात आली आहे. १७३ गावांचा समावेश असलेल्या संगमनेर तालुयाची लोकसंख्याही जिल्ह्यातील आघाडीच्या तालुयांमध्ये आहे. आश्वी, तळेगाव, धांदरफळ, चंदनापुरी, साकूर आणि घारगाव ही तालुयातील मोठी आणि बाजारपेठ असलेली गावे आहेत. त्यामुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होवू नये यासाठी तपभरापूर्वी संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे विभाजन करुन घाटाच्या वरच्या भागात असलेल्या ४६ गावांसाठी स्वतंत्रपणे घारगाव पोलीस ठाणे सुरु करण्यात आले.
त्यासोबतच पूर्वेकडील १३ ते १७ गावांचा समावेश असलेल्या आश्वी पोलीस ठाण्याचीही निर्मिती करण्यात आली. उर्वरीत राहिलेला संपूर्ण परिसर तालुका पोलीस ठाण्यातंर्गत आला. नगर-नाशिक जिल्हा सीमेचा भाग तालुका पोलीस ठाण्याच्या तर पुणे, ठाणे जिल्ह्याचा सीमा भाग घारगाव पोलीस ठाण्यातंर्गत येतो. जिल्ह्याच्या सीमावर्ती भागात वेगवेगळ्या गुन्हेगारांची वर्दळ असते हे सर्वश्रृत आहे. घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीला तर थेट पुणे आणि ठाणे हे राज्यातील महत्त्वाचे जिल्हेच असल्याने या पोलीस ठाण्याचे महत्त्वही अधोरेखीत आहे. त्यातच उत्तर भारतातून दक्षिणेकडे जाणार्या मोजया महामार्गामधील एक असलेल्या पुणे-नाशिक महामार्गावरुन होणारी वाहतूकही खूप मोठी आहे. या सगळ्या गोष्टीतून या ठाण्याचे अन्य पोलीस ठाण्यांच्या तुलनेत अधिक महत्त्व आहे.
यापूर्वी वरीष्ठ पोलीस निरीक्षक सुनील पाटील यांनी प्रदीर्घकाळ या पोलीस ठाण्यात सेवा बजावली. त्यांची सेवा ज्येष्ठता बघता त्यांचा कार्यकाळ पठारभागासाठी संस्मरणीय ठरेल असेही तर्क लावले गेले. मात्र त्यांनी पदभार स्वीकारल्या नंतरच्या काही काळातच ते सगळे तर्क सपशेल फोल ठरले. पठारभागात कधी नव्हते असे सगळ्या प्रकारचे उद्योग त्यांच्याच कार्यकाळात भरभराटीला आले. एकीकडे अवैध धंद्यांना सुगीचे दिवस आलेले असताना दुसरीकडे कोविड संक्रमणाच्या कारणाने लांबलेल्या बदल्यांचा बोनसही त्यांच्या पदरी पडला. या काळात झालेल्या निवडणुकांमधील गैरप्रकारही चांगलेच चर्चेत आले होते. चोर्या, घरफोड्या, खून, हाणामार्या असे प्रकार तर सुरळीतच, पण त्याचा या पोलीस ठाण्याशी जणू संबंधच नाही अशीही एकवेळ स्थिती होती.
पोलीस निरीक्षक पाटील यांच्या बदलीनंतर त्यांच्या जागी हंगामी पोलीस निरीक्षक म्हणून संतोष खेडकर यांनी पदभार स्वीकारला. पूर्वाश्रमीचे लष्करी अधिकारी असल्याने सुरुवातीला काही धडाकेबाज कारवाया करीत त्यांनी आपला हंगामी काळ गाजवून जनतेला आपलेसं केलं. सामान्य बदल्यांच्या वेळीही नागरिकांनी खेडकरांना कायम करण्याची मागणी केली. आमची बांधिलकीही जनहिताशी असल्याने आम्हीही ती लावून धरली आणि परिणाम पोलीस निरीक्षक संतोष खेडकर यांना घारगावमध्ये कायम करण्यात आले. मात्र नागरिकांचा हा निर्णय किती चूक होता हे साहेबांनी काही दिवसांतच दाखवायला सुरुवात केली.
घारगाव पोलीस ठाण्याच्या हद्दित अंमली पदार्थांसह जुगार, वेश्या व्यवसाय मोठ्या प्रमाणात फोफावला आहे. महामार्गावरील अपवाद वगळता जवळपास ढाब्यांवर राजरोसपणे अवैध दारु विक्रीही जोमात सुरु आहे. या सगळ्या गोष्टींना घारगाव पोलिसांचे आशीर्वाद असल्याचे वेगळे सांगायला नको. मध्यंतरी रात्रीच्या वेळी एका ढाब्यावर या महाशयांची हमरीतुमरी झाली होती. त्यावेळी त्यांनी ढाब्यावरील गरीब कामगारांना काठीने मारहाण केल्याचीही चर्चा सुरु आहे. चोर्या, घरफोड्या अशा घटना तर नित्यक्रमाने घडतच आहेत. पण पोलिसांकडून गेल्या अनेक वर्षांपासून एकही दिलासादायक बातमी कानावर आलेली नाही. घरे फुटली, देवळं लुटली पण चोरटे काही धरता आले नाही. ते गेले आणि हे आले, पण परिस्थिती होती त्याही पेक्षा अधिक खालावली.
चार महिन्यांपूर्वी २२ एप्रिल रोजी बोटा शिवारातील वडदरा (केळेवाडी) येथील उत्तम बाळाजी कुर्हाडे (वय ६३) यांचा त्यांच्या घराच्या पडवीत धारदार शस्त्राने वार करुन खून झाला होता. ही घटना घडून चार महिन्यांचा कालावधी लोटला आहे, पण घारगाव पोलिसांना अद्यापही आरोपींचा मागमूस काढता आलेला नाही. रोज चोरीच्या घटना होवून त्याचा आक्रोश करीत बायाबापडी आज-उद्यात तपास लागून आपला ऐवज मिळेल अशी आशा बांधून येतात आणि येथील बेधुंद कारभार पाहुन बोटं मोडीतच बाहेर पडतात अशी आजच्या घारगाव पोलीस ठाण्याची अवस्था झाली आहे.
पोलीस निरीक्षक खेडकर यांना कायद्याचेही सखोल ज्ञान नसल्याचे बोलले जाते. अनेक प्रकरणांमध्ये एकतर त्यांना गांभीर्य कळत नाही किंवा त्यांचे गांभीर्य इतरांना उमजत नाही अशी स्थिती आहे. अशा सगळ्या गोष्टींमुळे घारगाव पोलीस ठाण्याची अक्षरशः रया गेली असून पोलीस ठाण्यात आलेल्या माणसाकडे ‘याचक’ म्हणून नव्हेतर ‘बकरा’ म्हणून बघण्याची मनोवृत्ती बळावली आहे. त्यातून भ्रष्टाचाराने अक्षरशः परिसीमा ओलांडली असून घारगाव पोलीस ठाण्याच्या इतिहासात यावर्षी पहिल्यांदाच वेगवेगळ्या गावांमधील वार्षिक यात्रा-जत्रांची परवानगी मिळवण्यासाठी ग्रामस्थ कमिट्यांना ‘चिरीमिरी’ द्यावी लागल्याचेही गावागावांतून बोलले जात आहे. भ्रष्टाचाराचा हा कळस पाहून लोकांमध्ये वावरणं लज्जास्पद वाटणारे काही कर्मचारी रजेवर गेल्याचीही चर्चा आहे. पोलीस अधीक्षक राकेश ओला या गंभीर विषयाकडे किती गांभीर्याने पाहतात हे पाहणं आता औत्सुयाचे ठरणार आहे.
पोलीस प्रमुख राकेश ओला यापूर्वी जिल्ह्यात सेवा बजावलेले अधिकारी आहेत. जिल्ह्याच्या इतिहास आणि भूगोलासह येथील गुन्हेगारी वलयाचाही त्यांचा चांगला अभ्यास आहे. प्रशासनावर पकड असलेला अधिकारी म्हणूनही त्यांच्याकडे बघितले जाते. असे असतानाही गेल्या मोठ्या कालावधीपासून अतिशय महत्त्वाच्या पोलीस ठाण्यांमध्ये गणना होणार्या घारगावकडे झालेले त्यांचे दुर्लक्ष आश्चर्यजनक आहे. विशेष म्हणजे मुख्यालयात अनेक चांगले आणि धडाकेबाज अधिकारी उपलब्ध असतानाही घारगावला सक्षम पोलीस निरीक्षक मिळत नसल्याने नागरिकही पोलीस अधीक्षकांच्या भूमिकेबाबत साशंकीत झाले आहेत.
‘सद्रक्षणाय-खलनिग्रहणाय’ असं ब्रीद असलेल्या महाराष्ट्र पोलीस दलाला मोठा वारसा आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी प्राणाचीही पर्वा न करणार्या असंख्य पोलीस जवानांनी पोलीस दलासाठी सर्वोच्च बलिदान दिले आहे. घारगाव पोलीस ठाण्याकडून मात्र वारंवार या प्रतिमेलाच तडे देण्याचे काम सुरु आहे. संगमनेरच्या उपविभागीय अधिकार्यांकडेही याबाबत तक्रारी झाल्याची माहिती मिळते, पण त्यानंतरही कोणतीच कारवाई नसल्याने सर्वकाही आलबेल असल्याची सद्यस्थिती आहे.