कोरोना काळात जिवाची बाजी लावणाराच खरा ‘कोरोना योद्धा’ ः देशमुख पिंपरणे ग्रामपंचायतच्यावतीने कोरोना योद्धा पुरस्काराचे वितरण
नायक वृत्तसेवा, संगमनेर
कोरोना म्हणजे एक जैविक युद्ध आहे. ज्या व्यक्ती या युद्धात उतरल्या त्या सर्व खर्या कोरोना योद्ध्या आहेत. या संकटात घरादाराची, मुलांची काळजी न करता, एवढेच नाही तर स्वतःच्या जिवाची कोणतीही पर्वा न करता नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याची जबाबदारी घेऊन पिंपरणे गाव कोरोना मुक्तीकडे नेले. या काळात काहींना आपला जीवही गमवावा लागला. तरी देखील हे योद्धे लढत राहिले. त्यामुळे खर्या अर्थाने तेच खरे ‘कोरोना योद्धे’ असल्याचे गौरवोद्गार महानंद तथा राजहंस दूध संस्थेचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी काढले.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जयंतीचे औचित्य साधून पिंपरणे ग्रामपंचायतच्यावतीने कोरोना योद्धा पुरस्कार वितरणाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुधाकर रोहोम हे होते तर जिल्हा परिषद सदस्या शांताबाई खैरे, सरपंच शैला साळवे, उपसरपंच अजित देशमुख, दादासाहेब देशमुख, अण्णासाहेब राहिंज, गगनगिरी विद्यालयाचे प्राचार्य मुकुंद डांगे, जिल्हा परिषद शाळेचे मुख्याध्यापक संजय बोरसे, शिवराम वाकचौरे, गंगाराम वाकचौरे, अरुण देशमुख, राजेंद्र देशमुख, भागवत ठोंबरे, तलाठी प्रशांत हासे, ग्रामसेवक संजय कोल्हे, पोलीस पाटील विनोद साळवे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉक्टर्स, शिक्षक, आशा सेविका, सामाजिक कार्यकर्ते, पत्रकार, ग्रामपंचायत कर्मचारी, तलाठी, पोलीस पाटील, ग्रामसेवक, सफाई कर्मचारी यांना कोरोना योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
कोरोना हा अदृश्य शत्रू आहे. त्याच्या विरोधात सर्वांनी एकजुटीने लढल्याने दुसरी लाट आपण रोखू शकलो. संगमनेर तालुक्यात महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या नेतृत्वाखाली प्रशासनाने अत्यंत चांगले काम केले आहे. गावनिहाय स्थापन झालेल्या आरोग्य दक्षता समितीने घेतलेला पुढाकारही कौतुकास्पद ठरला आहे. आगामी तिसर्या लाटेच्या पार्श्वभूमीवरही सर्वांनी काळजी घेणे अत्यंत गरजेची आहे. कोरोना अजून संपलेला नसून सर्वांनी शासकीय नियमांचे पालन करावे असे आवाहन अध्यक्ष देशमुख यांनी केले. प्रास्ताविक मंजाबापू साळवे यांनी केले तर सूत्रसंचालन नीलेश बागुल यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी ग्रामपंचायत सदस्य संजय बागुल, अरुण राहिंज, उत्तम भालेराव, दादाभाऊ गायकवाड, शोभा ठोंबरे, अर्चना खंडागळे, सुवर्णा काळे, सुमन ठोंबरे, कुंदा राहिंज, कर्मचारी नितीन बागुल, सुरेश साळवे, प्रदीप मांडे यांनी परिश्रम घेतले.