संगमनेरच्या राजहंस दूध संघाला राष्ट्रीय पुरस्कार केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहांच्या हस्ते प्रदान

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जीवनात आर्थिक समृद्धी निर्माण करण्यात महत्त्वाचे योगदान देणार्‍या संगमनेर तालुका सहकारी दूध संघाला ई – मार्केटमध्ये सक्रीय सहभागाबद्दल नॅशनल को – ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाद्वारे राष्ट्रीय पातळीवर नुकताच पुरस्कार देऊन गौरविण्यात आले आहे.

गुजरातमधील गांधीनगर येथे नॅशनल को – ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडियाला 50 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल राष्ट्रीय न्यायवैद्यक विज्ञान विद्यापीठात केंद्रीय गृहमंत्री तथा सहकार मंत्री अमित शहा यांच्या हस्ते 2021 – 22 चा हा प्रतिष्ठेचा पुरस्कार शानदार कार्यक्रमात राजहंस दूध संघाला प्रदान करण्यात आला. यावेळी दूध संघाचे व महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख यांनी हा पुरस्कार स्वीकारला. याप्रसंगी केंद्रीय सहकार राज्यमंत्री बी. एल. वर्मा, गुजरात सरकारच्या सहकार विभागाचे जगदीश पांचाळ, रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे संचालक सतीश मराठे, एनडीडीबीचे अध्यक्ष मिनेश शहा, एनसीडीएफआयचे अध्यक्ष मंगलजीत राय, व्यवस्थापकीय संचालक के. सी. सुपेकर आदी उपस्थित होते.

नामदार बाळासाहेब थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली संगमनेर तालुका सहकारी दूध संघ हा मागील चार वर्षांपासून एनसीडीइएफआयशी (नॅशनल को – ऑपरेटिव्ह डेअरी फेडरेशन ऑफ इंडिया) संलग्न असून ई – मार्केटिंगचे काम करत आहे. एन. सी. डी. एफ. आय. शी देशभरातील सुमारे 223 जिल्हा दूध संघ संलग्न असून या सहकार चळवळीने भारताला खर्‍या अर्थाने स्वावलंबी बनवले आहे. या पुरस्काराबद्दल दूध संघाचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व संचालक, अधिकारी, कर्मचारी यांचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, आमदार डॉ. सुधीर तांबे, बाजीराव खेमनर, दुर्गा तांबे, माधव कानवडे, इंद्रजीत थोरात, महानंदचे अध्यक्ष रणजीतसिंह देशमुख, सत्यजीत तांबे, बाबासाहेब ओहोळ, अमित पंडित, लक्ष्मण कुटे, शंकर खेमनर, संपत डोंगरे, सुनंदा जोर्वेकर, विश्वास मुर्तडक, रामहरी कातोरे, हौशीराम सोनवणे, राजेंद्र गुंजाळ, राजेंद्र कडलग, दूध संघाचे उपाध्यक्ष राजेंद्र चकोर, डॉ. जयश्री थोरात यांनी अभिनंदन केले आहे.

सांघिक कामाचे यश ःदेशमुख
दुष्काळी तालुका ते प्रगतशील तालुका असा लौकिक निर्माण करण्यात दूध संघाचा मोठा वाटा आहे. दूध संघाने राज्याबाहेर सूरत, कर्नाटकमध्येही मोठी बाजारपेठ उपलब्ध केली आहे. दूध संघाच्या या सातत्यपूर्ण यशस्वी वाटचालीमध्ये मार्गदर्शक महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, दूध संघाचे उपाध्यक्ष, सर्व संचालक, अधिकारी व कर्मचारी या सर्वांचे योगदान असून हे सांघिक यश आहे.
– रणजीतसिंह देशमुख (अध्यक्ष-राजहंस दूध संघ)

Visits: 13 Today: 1 Total: 118998

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *