संगमनेरचे कृषी अधिकारी ‘सचिन वाझे’च्या भूमिकेत? दोन वर्षांपासून कृषी केंद्रांकडून सक्तीची वसुली; मात्र तक्रारी करुनही कारवाई नाही..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
महिन्याकाठी शंभर कोटी रुपयांच्या वसुलीवरुन राज्यात राजकीय रणकंद माजलेला असतंना आता संगमनेरातूनही अत्यंत धक्कादायक वृत्त समोर आले आहे. मुंबईत ज्याप्रमाणे वसुलीसाठी पोलीस दलातील अधिकार्‍यांचा वापर झाल्याचे आरोप आहेत, तसेच आरोप आता संगमनेरातूनही होवू लागले असून येथील तालुका कृषी अधिकारीच सचिन वाझेची भूमिका बजावित असल्याचा गंभीर आरोप तालुक्यातील सुमारे सहाशेहून अधिक कृषी सेवा केंद्र चालकांनी केला आहे. गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातील सर्वच कृषी सेवा केंद्र चालकांना नागवणार्‍या या अधिकार्‍याविरोधात असंख्य तक्रारी करुनही त्यांच्यावर कोणतीच कारवाई होत नसल्याने आश्चर्यासह त्यांना नेमके पाठबळ तरी कोणाचे आहे अशी चर्चाही यानिमित्ताने सुरु आहे. विशेष म्हणजे सोशल माध्यमातील काही व्हिडिओंमधून काही दिवसांपूर्वीच चर्चेत राहिलेल्या कृषीमंत्री दादा भुसे यांच्याकडेही याबाबत तक्रार केली गेली, मात्र आजवर त्याचाही परिणाम शून्यच असल्याने या प्रकरणातील संशय अधिक वाढला आहे.

अहमदनगर जिल्ह्यात क्षेत्रफळाच्या बाबतीत दुसर्‍या स्थानावर असलेल्या संगमनेर तालुक्यातून वाहणार्‍या मुळा व प्रवरा या नद्यांमुळे तालुक्यातील मोठ्या भागात बागायती क्षेत्र फुलले आहे. लोकसंख्येच्या बाबतीतही तालुका जिल्ह्यात आघाडीवर असल्याने येथील बाजारपेठ समृद्ध झाली आहे. तालुक्यात अन्य व्यवसायांसह कृषी विषयक साहित्यासह बी-बियाणे, खते व औषधांची सुमारे सहाशेहून अधिक दुकानेही आहेत. त्यामुळे तालुक्यात कृषी अधीक्षकांसह तालुका कृषी अधिकारीही कार्यरत आहेत. या दोन्ही वरीष्ठ अधिकार्‍यांच्या माध्यमातून तालुक्यातील कृषी साहित्य विक्रेत्यांकडून शेतकर्‍यांची पिळवणूक होणार नाही, त्यांना चुकीच्या बी-बियाणांचा अथवा औषधांचा पुरवठा होणार नाही, जास्तीचे दर आकारले जाणार नाहीत यावर नियंत्रण ठेवण्याचे काम हा विभाग करीत असतो. मात्र गेल्या दोन वर्षांपासून या विभागातील एक अधिकारी चक्क कृषी सेवा केंद्रांचीच आर्थिक पिळवणूक करीत असल्याचा गंभीर विषय समोर आला आहे.

सुमारे दोन वर्षांपूर्वी तालुका कृषी अधिकारी म्हणून प्रशांत शेंडे यांची संगमनेरात नियुक्तीझाली. तेव्हापासूनच ते हात धुवून मागे लागल्याचा आरोप तालुक्यातील सुमारे सहाशेहून अधिक कृषी सेवा केंद्राच्या संचालकांनी तक्रार अर्जाद्वारे केला आहे. संबंधित कृषी अधिकारी केंद्र तपासणीच्या नावाखाली दररोज दुकानांना भेटी देवून तपासणीचा ‘बहाणा’ करतात. दुकानातील खतांचे व औषधे नमुने तपासीसाठी म्हणून ताब्यात घेतात. आवक-जावक व साठा नोंदवह्यांच्या वारंवार तपासण्या करण्याचा फार्स राबवतात. पीजीआर विक्रीबाबत कधीही दुकानात येवून प्रश्नांचा भडीमार करतात आणि पाच ते दहा हजार रुपयांची मागणी करतात, विशेष म्हणजे जोपर्यंत कृषी केंद्र चालक त्यांना पैसे देत नाही तोपर्यंत म्हणजे पाच ते सहा तास ते एकाच दुकानात ठाण मांडून बसतात असा गंभीर आरोप कृषी विक्रेता असोसिएशनने आपल्या तक्रारीत केला आहे.

वारंवार कृषी सेवा केंद्र चालकांना कारवाईचा दम भरला जातो, नवीन परवाना असो अथवा परवान्याचे नूतनीकरण असो त्यासाठी प्रत्येकी तीन हजार रुपये. दुकानाचे छायाचित्र काढण्यासाठी एक हजार रुपये. केंद्राच्या साठा नोंदवहीवर विभागाचे शिक्के मारण्यासाठी प्रत्येक नोंदवहीला प्रत्येकी तीन हजार रुपये याप्रमाणे त्यांनी आपले दरपत्रकच निश्चितच केले आहे, त्यानुसार पैसे मिळाल्याशिवाय त्यांच्याकडून कोणतेही काम केले जात नाही. विशेष म्हणजे या महाशयांनी कृषी केंद्रांना पुरवठा करणार्‍या काही कंपन्यांच्या प्रतिनिधींकडूनही पैशांची मागणी केल्याने अनेक कंपन्या संगमनेरात मालाचा पुरवठा करण्यास नकार देत असल्याची बाबही असोसिएशनच्या तक्रारीतून समोर आली आहे.

अतिशय गंभीर आणि धक्कादायक असलेल्या या प्रकाराबाबत संगमनेर तालुक्यातील सहाशेच्या वर असलेल्या कृषी सेवा केंद्राच्या संघटनेने संगमनेरचे उपविभागीय कृषी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, विभागीय कृषी सहसंचालक (पुणे), निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक (पुणे) व राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे या सगळ्यांकडे गेल्या तीन महिन्यांपूर्वी लेखी तक्रार केली. विशेष म्हणजे या तक्रार अर्जावर केवळ असोसिएशनच्या पदाधिकार्‍यांच्याच नव्हेतर तालुक्यातील बहुतेक कृषी सेवा केंद्र चालकांच्या शिक्क्यानिशी स्वाक्षर्‍या आहेत. मात्र आजवर या अधिकार्‍यावर कोणतीही कारवाई झाली नाही. सदरचा तक्रार अर्ज प्राप्त झाल्यानंतर दैनिक नायकने तालुका कृषी अधिकारी प्रशांत शेंडे यांच्याशी संपर्क साधला असता त्यांना या विषयाचे कोणतेही सोयरसुतक नसल्याचे त्यांच्या बोलण्यातून दिसून आले. यावरुन गेल्या दोन वर्षांपासून ते करीत असलेली सक्तीची वसुली त्यांच्यासाठी की अन्य कोणासाठी? मुंबईत सचिन वाझे आणि संगमनेरात प्रशांत शेंडे असे सूत्र तर नाही ना? अशी शंकाही कृषी केंद्र चालकांमधून वर्तविण्यास सुरुवात झाली आहे.


संगमनेर तालुक्यातील तब्बल सहाशे कृषी केंद्र चालकांना नागवणारे कृषी अधिकारी गेल्या दोन वर्षांपासून तालुक्यातून बिनधास्त माया गोळा करीत असल्याचा गंभीर आरोप असलेला तक्रार अर्ज राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे यांच्यापासून उपविभागीय कृषी अधिकारी (संगमनेर), जिल्हा कृषी अधिकारी (अहमदनगर), विभागीय कृषी सहसंचालक (पुणे) व निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक (पुणे) या सर्वांकडे तीन महिन्यांपूर्वीच पाठविण्यात आला. मात्र त्याचा कोणताही परिणाम तालुका कृषी अधिकार्‍यांच्या ‘वसुली’वर झालेला नाही, त्यामुळे त्यांच्याकडून सुरु असलेली सक्तीची वसुली त्यांच्यासाठी की अन्य कोणासाठी अशी शंका यातून निर्माण झाली आहे.

Visits: 277 Today: 3 Total: 1114078

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *