जिल्ह्यातील सर्व व्यवहारांना दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्याची परवानगी? अत्यावश्यक वगळता उर्वरित सर्व व्यवसाय शनिवार व रविवार राहणार बंद..
नायक वृत्तसेवा, संगमनेर
राज्यावर डेल्टा प्लस व्हायरसचे संकट घोंगावू लागल्याने राज्य सरकारने सावधानतेची पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून यापूर्वी राज्याच्या टास्क फोर्सने तयार केलेल्या कोविड संक्रमणाच्या पाचस्तरांंपैकी एक ते तीन या स्तरावर असलेल्या राज्यातील सर्व जिल्ह्यांना आता तिसर्या श्रेणीचे नियम लागू होणार आहेत. त्यानुसार जिल्ह्यातील अत्यावश्यक व इतर सर्व दुकानांसाठी दुपारी चार वाजेपर्यंतची वेळ निश्चित करण्यात आली आहे. सायंकाळी 5 नंतर जिल्ह्यात संचारबंदी कलम लागू होणार आहे. त्यासोबतच यापुढे विवाह सोहळ्यांना अधिकतम पन्नास तर अंत्यविधीसारख्या कार्यक्रमांना केवळ वीस जणांच्या उपस्थितीचा नियम पाळावा लागणार आहे. राज्य सरकारच्या निर्णयानुसार पुन्हा एकदा पोलिसांना अधिकार प्राप्त झाल्याने प्रत्येक नागरिकाला नियमांचे सक्तीने पालन करावे लागणार आहे.
एकीकडे राज्यासह जिल्ह्यातील रुग्णसंख्या खालावण्यासह उपचाराधीन रुग्णांची संख्याही मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने गेल्या 4 जून पासून राज्यातील बहुतेक जिल्ह्यांना श्रेणीनिहाय सवलती देण्यात आल्या होत्या. त्यासाठी राज्याच्या टास्क फोर्सने पॉझिटिव्ह येण्याचा सरासरी वेग व उपलब्ध ऑक्सिजन खाटांची संख्या यानुसार वर्गवारी करुन राज्यातील सर्व जिल्ह्यांची पाच श्रेण्यांमध्ये विभागणी केली होती. त्यानुसार जिल्ह्यांना अनलॉकच्या सवलती देण्यात आल्या होत्या. अहमदनगर जिल्ह्याचा समावेश पहिल्या श्रेणीत झाल्याने जिल्ह्यातील सर्व निर्बंध मागे घेण्यासह जिल्हाधिकार्यांनी बजावलेले संचार बंदीचे कलम 144 ही मागे घेण्यात आले होते. मात्र राज्यावर आता डेल्टा प्लस व्हायरसचे संकट घोंगावू लागल्याने राज्य शासनाने सावधानतेचे उपाय योजण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच भाग म्हणून राज्यात चौथ्या आणि पाचव्या श्रेणीतील जिल्ह्यांना वगळून 1 ते 3 या श्रेणीत असलेल्या सर्व जिल्ह्यांना आता तिसर्या श्रेणीचे नियम लागू होणार आहेत.
तिसर्या श्रेणीतील नियमांंनुसार आठवड्यातील सर्व दिवसांसाठी संचारबंदीचे कलम 144 लागू करण्यात येणार आहे. या कलमान्वये सायंकाळी पाच वाजल्यानंतर सामान्य माणसांच्या हालचालींवर बंधने घालण्यात आली आहेत. अतिआवश्यक वैद्यकीय कारण असेल व त्यासंबंधी सर्व कागदपत्रे जवळ असतील तरच अशा व्यक्तींना सायंकाळी 5 नंतर संचार करता येणार आहे. दररोज सायंकाळी पाच वाजेपासून ते दुसर्या दिवशी पहाटे पाच वाजेपर्यंत जिल्ह्यात संचारबंदीचे कलम लागू राहील. यासोबतच अत्यावश्यकसह इतर सर्व व्यवसायांना दररोज दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र अत्यावश्यक वगळता इतर सर्व व्यवसायांना आठवड्याच्या शेवटच्या दोन दिवस, म्हणजे शनिवार व रविवार पूर्णतः बंद ठेवावे लागेल.
मॉल्स, चित्रपटगृहे व नाट्यगृहे बंद ठेवण्यात येणार आहेत. तसेच हॉटेल व रेस्टॉरंट यांना सोमवार ते शुक्रवार दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवता येईल. त्यानंतर फक्त पार्सल सेवा सुरु ठेवण्याची परवानगी असणार आहे. सार्वजनिक फिरण्याची ठिकाणे, खुली मैदाने अशा ठिकाणी फिरण्यास व सायकलिंग करण्यास पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत परवानगी असेल. खासगी कार्यालयांमधील कामकाज आठवड्यातील कामकाजाच्या दिनी दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेने सुरू ठेवता येतील. सांस्कृतिक व मनोरंजनपर कार्यक्रमांसाठी दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेच्या नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबतच यापुढे विवाह सोहळ्यासाठी पन्नासपेक्षा जास्त लोकांची उपस्थिती आढळल्यास दंडात्मक कारवाई होणार आहे. अंत्यविधीसाठीही अधिकतम वीस जणांची उपस्थिती निश्चित करण्यात आली आहे.
स्थानिक सहकारी संस्थांंच्या बैठका व निवडणुका 50 टक्के क्षमता व कोविड नियमांना अनुसरून पार पाडता येतील. सध्या सुरु असलेल्या बांधकामांनाही दुपारी चार वाजेपर्यंत सुरु ठेवण्यास परवानगी असेल. मात्र कामावर असलेले सर्व मजूर सायंकाळी पाच वाजेच्या पूर्वी घरी पोहोचणारे असावेत. कृषी विषयक सेवा देणार्या सर्व प्रकारच्या दुकानांना आठवड्यातील सर्व दिवस दुपारी चार वाजेपर्यंत सुरू ठेवता येईल. व्यायाम शाळा, स्पा सेंटर, सलून, ब्युटी पार्लर इत्यादी व्यवसायही दुपारी चार वाजेपर्यंत 50 टक्के क्षमतेच्या नियमानुसार सुरू राहतील. सार्वजनिक वाहतूक व्यवस्था व कार्गो वाहतूक सुरळीत राहील. खासगी प्रवास करण्यासही बंधने असणार नाहीत. मात्र पाचव्या स्तरावरील जिल्ह्यात प्रवेश करण्यासाठी ई-पास असण्याचे बंधन घालण्यात आले आहे. याशिवाय कारखाने व उद्योगक्षेत्राला 50 टक्के क्षमतेसह कोविड नियमांचे यापूर्वीचे आदेश पाळून आपले उत्पादन करण्यास परवानगी देण्यात आली आहे. कोविड संक्रमणाच्या तिसर्या श्रेणीत असलेल्या जिल्ह्यांना आत्तापर्यंत लागू असलेला हा नियम आता राज्यातील एक ते तीन या श्रेणीत असलेल्या सर्व जिल्ह्यांना येत्या सोमवारपासून लागू होण्याची शक्यता आहे.
राज्य सरकारने गेल्या 4 जून रोजी जारी केलेल्या आदेशानुसार तिसर्या श्रेणीत असलेल्या जिल्ह्यांना वरीलप्रमाणे बंधने घातली आहेत. मात्र याबाबत प्रत्येक जिल्ह्याचे जिल्हाधिकारी स्वतंत्र आदेश काढून अधिक स्पष्टता देणार आहेत. अहमदनगरच्या जिल्हाधिकार्यांनी अद्यापपर्यंत या बाबतीतले आदेश जारी केलेले नाहीत. मात्र राज्य सरकारच्या नियमानुसार उद्या सायंकाळपर्यंत याबाबतचे आदेश काढण्यात येऊन सोमवारपासून जिल्ह्यात वरील प्रमाणे नियमांची अंमलबजावणी होणार आहे.