पशुसंवर्धन करून दुधाला आधारभूत किंमत द्या! क्रांतीसेनेचे विविध मागण्यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन

नायक वृत्तसेवा, राहुरी
शेतकर्‍यांची व पशुपालकांची आर्थिक चक्रव्यूहातून सुटका करण्यासाठी पशुसंवर्धन करुन दुधाला आधारभूत किंमत देण्यासह विविध मागण्यांचे निवेदन अखिल भारतीय क्रांतीसेनेने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना ई-मेलद्वारे सादर केले आहे.

सदर निवेदनात नमूद केले आहे की, आज राज्यातील शेतकर्‍यांना मिळत असलेल्या दूध दरामुळे दूध उत्पादित करण्याचा खर्चही भागत नाही. तरी मंत्रालयात झालेल्या बैठकीत काही संघटनांनी ऊसाप्रमाणे दुधासाठी किमान आधारभूत किंमत 25 रुपयांची मागणी केली आहे. परंतु शेतकर्‍यांना दूध उत्पादन करण्यासाठी येणारा खर्च लक्षात घेता किमान आधारभूत दर मिळण्यासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पशुसंवर्धन करून शेतकर्‍यांच्या दूध दराला किमान आधारभूत दर द्यावा.

तसेच गेल्या दोन वर्षांपासून शेतकरी बाजारभावामुळे मेटाकुटीला आलेला आहे. शेतामाल कवडीमोल भावाने विक्री होत आहे. कुठलेही सरकार सत्तेत आले तरी शेतकर्‍यांना न्याय मिळत नाही. परंतु त्यांच्या प्रश्नांचे राजकारणापुरते भांडवल केले जाते. शेतकर्‍यांच्या कुठल्याही पिकाला उत्पादन खर्चावर आधारित योग्य हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी नेहमीच आर्थिक अडचणी अडकलेला असतो. या कारणास्तव शेतकरी कृषीपंप वीजबिल भरु शकत नाही. अथवा स्वतःच्या आरोग्यासाठी खर्च करण्यास असमर्थ ठरतो. कोरोना व इतर मोठ्या आजारात पैशांअभावी उपचार न मिळाल्याने अनेक शेतकर्‍यांची घरे उद्ध्वस्त झाली आहेत. त्याचबरोबर शेतकर्‍यांच्या जिवाशी निगडित असलेले प्रश्नही तातडीने सोडवावेत.

आपण शेतकर्‍यांचे कैवारी असून, आपल्याला शेतकर्‍यांच्या प्रश्नांची जाण आहे. तरी या चक्रव्यूहातून शेतकर्‍यांची सुटका करण्यासाठी आपण पुढाकार घेत वरील मागण्यांचा सहानूभुतीपूर्वक विचार करून तातडीने सोडवाव्यात अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे, पश्चिम महाराष्ट्र उपाध्यक्ष गोरक्षनाथ माळवदे, शिक्षक प्रदेशाध्यक्ष भागचंद औताडे, पुणे विभाग प्रमुख जगताप, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष रंगनाथ माने, प्रसिद्ध प्रमुख बाबासाहेब चेडे, कार्याध्यक्ष संदीप ओहोळ,संघटक जालिंदर शेंडगे, अहमदनगर जिल्हाध्यक्ष सुभाष दरेकर, नवनाथ ढगे, युवक जिल्हाध्यक्ष युवराज सातपुते, शब्बीर शेख, बाळासाहेब भोर, राहुरी तालुकाध्यक्ष संदीप उंडे, शेखर पवार, अक्षय मांडगे, सोमनाथ वने, भाऊसाहेब पवार आदिंनी केली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *