जिल्ह्याची कोविड रुग्णसंख्या आज पुन्हा खालावली! संगमनेर शहरातील संक्रमणात वाढ; एकूण रुग्णसंख्या मात्र नियंत्रणात..

नायक वृत्तसेवा, संगमनेर
गेल्या तीन आठवड्यांपासून दररोज समोर येणार्‍या जिल्ह्यातील कोविड बाधितांच्या संख्येत चढ-उतार अनुभवण्यास मिळत आहे. एखाद्या दिवशी खालावलेल्या रुग्णसंख्येचा दिलासा तर दुसर्‍याच दिवशी उंचावलेल्या संख्येचा धक्का अशा विचित्र स्थितीत जिल्ह्याच्या रुग्णसंख्या आज चारशेहून खाली आली. आजच्या अहवालातून संगमनेर तालुक्यालाही काहीसा दिलासा मिळाला असून रुग्णसंख्या नियंत्रणात आहे, मात्र शहरातील रुग्णांच्या संख्येत मात्र आज वाढ झाली आहे. आज तालुक्यातील 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले असून त्यात राहाता तालुक्यातील एकाचा समावेश आहे. त्यामुळे तालुका आता 22 हजार 819 रुग्णसंख्येवर पोहोचला आहे.

राज्यभरासह जिल्ह्यातील कोविड संक्रमणाच्या दुसर्‍या लाटेचा प्रभाव जवळपास ओसरला आहे. मात्र त्याचवेळी डेल्टा प्लस या नव्या विषाणूचा धोकाही राज्यासमोर उभा राहीला आहे. अशा स्थितीत जिल्ह्यातील प्रादुर्भावात पुन्हा वाढ होवू नये यासाठी जिल्हा यंत्रणेकडून विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत. राज्य सरकारकडून सध्या देण्यात आलेल्या सवलतींचा फेरविचार सुरु असून येत्या दोन दिवसांत त्या अनुषंगाने निर्णय होण्याचीही शक्यता आहे. त्याचवेळी जिल्ह्यातील दररोजची रुग्णसंख्या मात्र टिकून असल्याने व जिल्ह्यात रुग्ण समोर येण्याची दैनिक सरासरीही 638 रुग्ण प्रतिदिवस असल्याने अहमदनगर जिल्ह्याच्या चिंताही कायम आहेत. पुढील काळात संक्रमणाची गती अशीच राहील्यास जिल्ह्याला पुन्हा एकदा निर्बंधांचा सामना करावा लागण्याचीही शक्यता यातून निर्माण झाली आहे.

आज जिल्ह्याच्या एकूण रुग्णसंख्येसह संगमनेर तालुक्याची रुग्णसंख्याही काही प्रमाणात खालावली. आज शासकीय प्रयोगशाळेचे सहा, खासगी प्रयोगशाळेचे 13 व रॅपिड अँटीजेन चाचणीद्वारा समोर आलेल्या अकरा अहवालांतून संगमनेर शहरातील नऊ जणांसह ग्रामीणभागातील 20 व राहाता तालुक्यातील एक अशा एकूण 30 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात शहरातील मालदाड रोडवरील 35 वर्षीय तरुण व 29 वर्षीय महिलेसह संगमनेर असा पत्ता नोंदविलेल्या 61 वर्षीय ज्येष्ठ नागरिकासह 46 वर्षीय इसम, 48, 45, 41 व 35 वर्षीय महिला आणि 19 वर्षीय तरुणीला कोविडची लागण झाल्याचे समोर आले आहे.

त्यासोबतच ग्रामीणभागातील 15 गावे व वाड्या-वस्त्यातील 20 जणांनाही संक्रमण झाले असून त्यात खांबे येथील 31 वर्षीय महिला, धांदरफळ येथील 40 वर्षीय महिला, सावरगाव तळ येथील 30 वर्षीय तरुण, कनोली येथील 46 वर्षीय इसमासह 10 वर्षीय मुलगा, गुंजाळवाडी शिवारातील गोल्डन सिटीतील एक वर्षीय बालक, कोकणगाव येथील 50 वर्षीय इसमासह 25 वर्षीय तरुण, खरशिंदे येथील 55 वर्षीय इसम, घुलेवाडीतील 38 वर्षीय महिलेसह 26 व 20 वर्षीय तरुण, मनोलीतील 37 वर्षीय तरुण, झोळे येथील 28 वर्षीय तरुण, वरवंडी येथील 28 वर्षीय तरुण, कोंची येथील 55 वर्षीय इसम, आंबी खालसा येथील 48 वर्षीय इसमासह 16 वर्षीय मुलगा, वनकुटे येथील 15 वर्षीय मुलगी व अंभोरे येथील 65 वर्षीय महिला. तसेच राहाता तालुक्यातील पिंपरी निर्मळ येथील 38 वर्षीय महिला बाधित झाल्या आहेत.

गेल्या आठ दिवसांत आज तिसर्‍यांदा जिल्ह्याची रुग्णसंख्या चारशेहून खाली आली. आज शासकीय प्रयोगशाळेच्या 18, खासगी प्रयोगशाळेच्या 138 व रॅपिड अँटीजेनच्या 218 अहवालातून जिल्ह्यातील 374 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले. त्यात पारनेर 55, पाथर्डी 31, संगमनेर, शेवगाव व श्रीगोंदा प्रत्येकी 30, राहुरी 28, जामखेड 27, कर्जत 25, नगर ग्रामीण 24, नेवासा 22, कोपरगाव 20, राहाता 14, श्रीरामपूर 13, अकोले नऊ, अहमदनगर महापालिका क्षेत्र व इतर जिल्ह्यातील प्रत्येकी आठ रुग्णांचा त्यात समावेश आहे. आजच्या रुग्णवाढीने जिल्ह्याची एकूण रुग्णसंख्या आता 2 लाख 78 हजार 79 झाली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *