राहुरीच्या पोलीस निरीक्षकांविरोधात शुक्रवारी ‘वंचित’चा आक्रोश मोर्चा दलित कुटुंबावर अत्याचार करणार्‍या नेत्याला पाठिशी घातल्याचा आरोप

नायक वृत्तसेवा, राहुरी
तालुक्यातील खडांबे येथील दलित कुटुंबियावर झालेल्या अन्यायाच्या विरोधात व आरोपींना पाठिशी घालणार्‍या पोलीस अधिकार्‍यास निलंबित करावे. या मागणीसाठी शुक्रवारी (ता.25) राहुरी पोलीस ठाण्यावर वंचित बहुजन आघाडीच्यावतीने आक्रोश मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे.

याबाबत दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, तालुक्यातील खडांबे येथील बाळासाहेब लटके या राजकीय पुढार्‍याकडून दलित कुटुंबावर अमानुषपणे अत्याचार झालेला आहे. वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते प्रत्यक्षात या कुटुंबाला भेट देण्यासाठी त्यांच्या घरी गेले. तिथे गेल्यावर कुटुंबातील व्यक्तींनी घडलेली घटना कार्यकर्त्यांना सांगितली. लटके हे राष्ट्रवादी पक्षाचे पंचायत समिती सदस्य आहेत. गावातील खाणीतून अमोल साळवे व त्याची काकू यांनी त्यांच्या घरच्या गाया पाणी पाजून आणल्या. ही गोष्ट लटके व त्यांच्या घरातील लोकांना समजल्यामुळे त्यांनी त्यादिवशी दुपारी येऊन आंतवन साळवे, अमोल साळवे व त्यांच्या दोन बहिणी त्यामधे एक मतिमंद असलेल्यांना जबर मारहाण केली. यातील एका मुलीची अवस्था गंभीर आहे. विशेष म्हणजे एवढी मोठी घटना घडलेली असताना देखील राहुरी पोलीस निरीक्षकांनी या घटनेकडे राजकीय पुढार्‍याच्या दबावापोटी कानाडोळा करून आरोपींना पाठिशी घालण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

त्यानंतर आंतवन साळवे, त्यांची भावजय व लटके यांना पोलिसांनी पोलीस ठाण्यात बोलावले असता पोलीस निरीक्षक नंदुकमार दुधाळ यांनी साळवे या सेवानिवृत पोलीस अधिकार्‍याला अपमानित करून उलट त्यांच्यावरच खोटा विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. आणि त्यांच्यासमोर म्हणाले की, तुमच्यावर जर अ‍ॅट्रासिटी दाखल केली तर तुम्ही देखील त्यांच्यावर दरोड्याचा गुन्हा दाखल करा, अशी माहिती आंतवन साळवे, अमोल साळवे व त्याच्या बहिणींनी वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना दिली आहे. या घटनेला पंधरा दिवस होऊन देखील अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल केलेला नाही.

जोपर्यंत लटके व त्यांच्या कुटुंबातील मारहाण करणार्‍यांवर अ‍ॅट्रॉसिटीचा गुन्हा दाखल होऊन अटक करण्यात येत नाही व आरोपींना पाठिशी घालून कर्तव्यात कसूर केली म्हणून पोलीस निरीक्षक दुधाळ यांची खातेनिहाय चौकशी होऊन त्यांना निलंबित केले जात नाही; तोपर्यंत वंचित बहुजन आघाडी शांत बसणार नाही. येत्या शुक्रवारी कारवाई होण्यासाठी राहुरी पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती अनिल जाधव, पिंटू साळवे, बाबुराव मकासरे, रवींद्र गायकवाड, गोरख थोरात आदिंनी दिली आहे.

Visits: 3 Today: 1 Total: 23186

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *