कोतुळच्या आदिवासी सेवा सोसायटीत साठ लाखांचा अपहार? तिघा कर्मचार्‍यांनी संगनमताने मारला डल्ला; लेखा परिक्षणातून चोरीचे पितळ उघड..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संस्थेतील शिल्लक रक्कम हातावर दाखवून तिघा कर्मचार्‍यांनी मिळून संस्थेलाच चुना लावल्याचा धक्कादायक प्रकार अकोले तालुक्यातून समोर आला आहे. कोतुळमधील आदिवासी विविध कार्यकारी सेवा सोसायटीच्या लेखा परिक्षणादरम्यान 39 लाख 85 हजार रुपये हातावर शिल्लक दाखवण्यात आल्याचे समोर आले. त्यामुळे लेखा परिक्षकांनी संस्थेच्या चेअरमनशी पत्रव्यवहार करुन सदरील रक्कम मोजणीसाठी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यावर कारवाई करताना अध्यक्षांनी संस्थेच्या सचिवासह दोघा लिपिकांना प्रत्येकी 13 लाख रुपये भरण्याचे तोंडी आदेश दिले होते. दिलेल्या मुदतीपर्यंत दोघांनी ठरवून दिलेली प्रत्येकी 13 लाखांची तर, एकाने केवळ एक लाख अशी एकूण 27 लाखांची रक्कम परतही केली. मात्र साडेसहाशे शेतकरी सभासद असलेल्या या संस्थेच्या सुमारे सव्वाशे सभासदांनी व्याजासह ही रक्कम 60 लाखांहून अधिक असल्याचा दावा करीत संस्थेच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाची चौकशी करुन अपहार झालेली संपूर्ण रक्कम व्याजासह वसुल करण्याची मागणी केली आहे. या घटनेने सहकारी सोसायट्यांमधील ‘हातावरील शिल्लक’ चर्चेत आली असून सहकार विभागाने अशाप्रकारे परस्पर पैशांचा गैरवापर करणार्‍या संस्थांवर कारवाईची करण्याची मागणी होवू लागली आहे.


कोतुळच्या आदिवासी विविध कार्यकारी सहकारी सेवा सोसायटीचे लेखा परिक्षण सुरु असताना संस्थेचे सचिव दादाभाऊ रामभाऊ साबळे, लिपिक दीपक शरद परशुरामी व रोहिदास लक्ष्मण जगताप यांच्याकडे संस्थेची 39 लाख 85 हजार रुपयांची रक्कम हातावर दाखवण्यात आल्याचे समोर आले. त्याबाबत लेखा परिक्षकांनी संस्थेचे चेअरमन व संचालकांशी ऑगस्टमध्ये वारंवार पत्रव्यवहार करुन सदरील हातावर असलेली रक्कम प्रत्यक्ष मोजण्यासाठी त्यांच्या समोर उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. त्यावर चेअरमनसह काही संचालकांनी आठ दिवसांची मुदत मागितली असता अशाप्रकारची मुदतवाढ देण्याचा अधिकार आपणास नसल्याचे व ठरवून दिलेल्या मुदतीतच लेखा परिक्षणाचे काम आटोपण्याचे बंधन असल्याचे सांगत त्यांनी संबंधितांना लेखी म्हणणे सादर करण्यास सांगितले.


त्यावेळी संस्थेच्या चेअरमन यांनी सचिवासह दोघा लिपिकांना 20 ऑगस्टपर्यंत प्रत्येकी 13 लाखांची रक्कम भरण्याचे तोंडी आदेश दिले. मात्र प्रत्यक्षात ठरवून दिलेल्या तारखेपर्यंत दादाभाऊ साबळे व दीपक परशुरामी यांनीच आपल्या हातावरील 13 लाखांची रक्कम भरली. रोहिदास जगताप यांनी मात्र फक्त एक लाख दहा हजार रुपये परत केल्याने हातावर दाखवण्यात आलेल्या 39 लाख 85 हजार रुपयांमधील केवळ 27 लाख 10 हजार रुपयांचा भरणा झाला उर्वरीत रक्कम 31 ऑगस्टअखेर जमा करण्यात आली नसल्याचेही लेखा परिक्षकांनी आपल्या अहवालात नमूद केले आहे. या दरम्यान लिपिक रोहिदास जगताप यांचा वडगावपान जवळ अपघात होवून ते अत्यवस्थ अवस्थेत असल्याने त्यांच्याकडून उर्वरीत रकमेचा भरणा झाला नसल्याचेही अहवालात नमूद आहे.


मात्र हाच धागा पकडून संस्थेच्या साडेसहाशे शेतकरी सभासदांमधील सव्वाशेहून अधिकजणांनी राज्याच्या सहकार मंत्र्यांसह सहकार आयुक्त व जिल्हा उपनिबंधकांना लेखी तक्रार पाठवली असून हा संपूर्ण अपहार व्याजासह 60 लाखांहून अधिक असल्याचे व या शिवाय अन्य मार्गाने संस्थेच्या काही संचालकांच्या संमतीने अपहार झाल्याचा संशय वर्तवण्यात आला असून संस्थेच्या गेल्या पाच वर्षांच्या कामकाजाची सखोल चौकशी करुन अपहार झालेली संपूर्ण रक्कम व्याजासह वसुल करण्याची मागणी करण्यात आली आहे. त्यावरुन कोतुळची सेवा सोसायटी आता जिल्ह्याच्या चर्चेत आली असून संस्थेच्या सखोल लेखा परिक्षणातून आणखी काय बाहेर येते याबाबत कोतुळमध्ये उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.


शेतकर्‍यांना शासनाकडून मिळणार्‍या विविध योजना, जिल्हा बँकेच्या माध्यमातून कर्ज पुरवठा, त्याची वसुली अशी कर्तव्य असलेल्या तालुक्यातील अनेक सेवा सोसायट्यांची वार्षिक उलाढाल कोट्यवधी रुपयांमध्ये असते. अनेक प्रसंगात बँकेच्या कर्जापोटी शेतकर्‍यांकडून सोसायटीकडे जमा झालेला हप्ता कर्मचारी थेट कर्ज खात्यात न भरता संबंधिताला सोसायटीची पावती देवून आपल्या हाताखाली ठेवतात. त्या पैशांचा बिनव्याजी वापर स्वतःच्या खासगी फायद्यासाठी सर्रासपणे केला जातो. कोतुळच्या सेवा सोसायटीत अशाप्रकारच्या हाताखालील 39 लाख 85 हजार रुपयांचा अपहार झाल्याचे समोर आले असून गेल्या मोठ्या कालावधीपासून सुरु असलेल्या या अफरातफरीत केवळ मुद्दल रकमेचाच भरणा झाला असून व्याजासह ही रक्कम 60 लाखांहून अधिक असल्याचा दावा करीत ती रक्कम वसुल करण्याची मागणी सभासदांनी केली आहे. सहकार खाते त्याला किती गांभीर्याने घेतात हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरणार आहे. मात्र या प्रकरणाने सहकारी सोसायट्यांमधील हातावरची रक्कम चांगलीच चर्चेत आली आहे.

Visits: 296 Today: 5 Total: 1098927

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *