हिंदू समाजावरील वाढत्या अत्याचाराचा मंगळवारी संगमनेरात आक्रोश! तालुका बंदसह ‘भगवा मोर्चा’ही निघणार; तालुक्याच्या ग्रामीण भागातूनही शेकडोंची उपस्थिती..


नायक वृत्तसेवा, संगमनेर
मागील काही दिवसांपासून देशासह राज्यातील विविध ठिकाणी हिंदू समाजाच्या धार्मिक उत्सवांच्या शोभायात्रांवर झालेले हल्ले, गेल्या रविवारी जोर्वेनाका परिसरात सशस्त्र जमावाचा आठजणांवरील जीवघेणा हल्ला, राज्यात लव्ह जिहादच्या वाढत्या घटना आणि दिल्लीतील अल्पवयीन सोळा वर्षीय मुलीची भररस्त्यात अत्यंत संतापजनक प्रकारे झालेली हत्या या सर्वांच्या पार्श्‍वभूमीवर संगमनेरातील हिंदुत्त्ववादी संघटना एकवटल्या असून त्यांच्याद्वारे येत्या मंगळवारी (ता.6) संगमनेर तालुका बंदची हाक देण्यासह सकल हिंदू समाजाचा सहभाग असलेल्या ‘भगवा मोर्चा’ काढला जाणार आहे. देशभरात दररोज घडणार्‍या अशा घटना रोखण्यासाठी संघटीतपणे त्याचा प्रतिकार आणि त्यासाठी कठोर कायद्याची आणि त्याच्या अंमलबजावणीची गरज या प्रमुख मागण्या मंगळवारच्या मोर्चाच्या माध्यमातून केल्या जाणार आहेत.


महिनाभरापूर्वी देशभरात प्रदर्शित झालेल्या ‘द केरला स्टोरी’ या चित्रपटाने हिंदू समाजाच्या मनात खद्खद् निर्माण झालेली असतांना मंचर (पुणे), मुंबई, दिल्ली, कानपूर व रांची येथून ‘लव्ह जिहाद’च्या अशाच घटना समोर आल्याने आणि त्यातच रविवारी (ता.28) अगदीच किरकोळ कारणावरुन जोर्वे येथील शेतकर्‍यांच्या आठ मुलांना संगमनेरातील जोर्वेनाका परिसरात सुमारे दीडशे ते दोनशेच्या सशस्त्र जमावाने हल्ला करीत जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केल्याने यासर्व घटनांचा रोष आता उसळून बाहेर पडू लागला आहे. त्यातच दिल्लीतील अत्यंत क्रूरपणे घडलेल्या अल्पवयीन मुलीच्या निर्घून खुनाच्या घटनेचे व्हिडिओ विविध माध्यमांसह सोशल माध्यमातही मोठ्या प्रमाणात व्हायरल झाल्याने देशभरात संतापाचे वातावरण तयार झाले आहे.


त्या पार्श्‍वभूमीवर विश्‍व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, शिवसेना (शिंदे गट व ठाकरे गट), महाराष्ट्र नवनिर्माण सेना, एकलव्य संघटना या हिंदुत्त्ववादी संघटनांसह विविध राजकीय पक्ष, संस्था, गणेश मंडळे व संघटनांच्या सहभागातून मंगळवारी सकाळी 9 वाजता लालबहाद्दूर शास्त्री चौक येथून ‘भगवा मोर्चा’ काढला जाणार आहे. तेथून बाजारपेठ मार्गे सय्यदबाबा चौक, मेनरोड, चावडीवरुन छत्रपती शिवाजी महाराज स्मारक ते बसस्थानक चौक या मार्गावरुन निघणार्‍या या मोर्चाचा नवीन नगर रस्त्यावरील प्रशासकीय भवनासमोर समारोप होणार आहे. या मोर्चात सकल हिंदू समाजाला सहभागी होता यावे यासाठी आणि रविवारी जोर्वे नाक्यावरील घटनेत जखमी झालेल्या तरुणांना पाठबळ देण्यासाठी संगमनेर तालुका बंदची हाक देण्यात आली आहे.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या 350 व्या शिवराज्याभिषेक दिनाच्या दिवशी निघणार्‍या या मोर्चात संगमनेर शहरातील विविध समाजातील महिला-पुरुष, तरुण-तरुणींसह जवळपास साठ ते सत्तर गावांमधून मोठ्या संख्येने नागरिक सहभागी होणार आहेत. याशिवाय मंगळवारी संगमनेरकरांनी सर्व छोट्या-मोठ्या आस्थापना बंद ठेवून आपल्या दुकान व कार्यालयातील कर्मचार्‍यांनाही या मोर्चात सहभागी करण्याचे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे. त्यासाठी विविध संघटनांच्या प्रमुखांचा सहभाग असलेली समन्वय समितीही स्थापन करण्यात आली असून त्या माध्यमातून जनजागृती व संपर्क अभियानही सुरु करण्यात आले आहे.


यासंदर्भात सकल हिंदू समाजाच्यावतीने शहर पोलिसांना परवानगीचा अर्जही देण्यात आला असून त्यात जोर्वे येथील आठ तरुणांना मारहाण करण्याची घटना जिहादी मानसिकतेमधूनच झाल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. गेल्या काही कालावधीपासून शहर व तालुक्याच्या विविध भागात धर्मांध मानसिकतेतून अशा घटनांसह महिला व मुलींच्या छेडछाडीचे प्रकार, हिंदू सणांच्या निमित्ताने वारंवार हल्ले व अडथळे आणण्याचे प्रकार, लव्ह जिहादच्या वाढत्या घटना या सर्वांना विरोध करण्यासाठी आणि त्या रोखण्यासाठी सदरील मोर्चाचे व संगमनेर तालुका बंदचे आयोजन करण्यात आल्याचे पोलिसांना देण्यात आलेल्या अर्जात नमूद करण्सात आले आहे.


या पार्श्‍वभूमीवर पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे, तहसीलदार धिरज मांजरे, मुख्याधिकारी राहुल वाघ, पोलीस निरीक्षक भगवान मथुरे आदी अधिकार्‍यांनी आज सकल हिंदू समाजाच्या बॅनरखाली एकवटलेल्या विविध संस्था व संघटनांच्या पदाधिकार्‍यांशी चर्चा केली. यावेळी पोलिसांनी मोर्चाचे स्वरुप, मार्ग, उन्हाची वेळ, पाणी व सावलीबाबत उपाययोजना आणि ग्रामीणभागातून शहरात येणार्‍या मोर्चेकर्‍यांच्या वाहनांचे तळ आदींबाबत माहिती करवून घेत आवश्यक त्या सूचनाही करण्यात आल्या आहेत. मोर्चेकर्‍यांना उन्हाचा त्रास होणार नाही यासाठी मोर्चा मार्गावर असलेली विविध गणेश मंडळे आपापल्या परिसरात सावलीची व पाणी, सरबताची व्यव्यस्था करणार असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.


याशिवाय मोर्चाचा समारोप होताना माध्यन्नाचे ऊन्ह असेल त्या पार्श्‍वभूमीवर प्रशासकीय भवनासमोरील रस्त्यावर सोमवारी रात्री मांडव घालण्याची परवानगीही मागण्यात आली असून त्याबाबत सकारात्मक निर्णय घेण्याचे आश्‍वासन प्रशासनाकडून देण्यात आले आहे. मोर्चा मार्गावर अन्य वाहनांचा शिरकाव होणार नाही अशी सूचना समोर आल्यानंतर पोलिसांकडून गणेश विसर्जन मिरवणुकीच्या धर्तीवर मोर्चा मार्गाला जोडणारे पोटरस्ते तात्पूरते बंद करण्याचाही विचार असल्याचे पोलीस उपअधीक्षक सोमनाथ वाघचौरे यांनी सांगितले. यावेळी पोलिसांकडून खबरदारी म्हणून अशा आंदोलनाच्या वेळी बजावल्या जाणार्‍या सीआरपीसी 149 प्रमाणेच्या नोटीसांवरही चर्चा झाली, तो कामकाजाचा आणि शांतता सुव्यवस्था कायम ठेवण्याचा भाग असल्याचे सांगत त्यावर अधिक बोलण्याचे अधिकार्‍यांनी टाळल्याचेही दिसून आले. एकंदरीत मंगळवारी संगमनेरातून ‘सकल हिंदू समाज’ या बॅनरखाली पहिल्यांदाच हिंदू समाज आपला ‘आक्रोश’ व्यक्त करणार असून त्याचे प्रतिध्वनी राज्यभर उमटण्याची शक्यता आहे. संगमनेरकरांनी मंगळवारी आपले व्यवहार पूर्णतः बंद ठेवून मोर्चात सहभागी व्हावे असे आवाहनही करण्यात आले आहे.

सार्वजनिक सण-उत्सव व आंदोलनाच्या पार्श्‍वभूमीवर पोलीस प्रशासनाकडून सीआरपीसीच्या 149 अंतर्गत नोटीसा बजावून आयोजकांवर दबाव टाकला जातो. अशा आंदोलनातून शांतता व सुव्यस्थेला बाधा निर्माण होण्याची अधिक शक्यता असल्याने अशा नोटीसा बजावून काही प्रसंगात संशय असलेल्यांना तात्पूरते स्थानबद्ध अथवा अटक करण्याचेही प्रकार यापूर्वी समोर आले आहेत. त्या अनुषंगाने पोलीस प्रशासनाने संगमनेरात असा प्रयोग करण्याचा प्रयत्न करु नये अशा सूचनाही या बैठकीतून मांडण्यात आल्या. त्यावर नोटीसा बजावणे हा कामकाजाचा भाग असल्याचे सांगण्यात आले आहे.

Visits: 148 Today: 1 Total: 1104896

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *