पोलिसांच्या नाकावर टिच्चून रिक्षा लांबवली! पोलीस ठाण्यासमोरील घटना; चोरट्यांचा शोध लावण्याचे आव्हान


नायक वृत्तसेवा, संगमनेर
संगमनेर शहरात चोरट्यांचा उच्छाद सुरुच असून आतातर चोरट्यांनी चक्क पोलीस ठाण्यासमोरच हात मारण्याची हिंमत दाखवली आहे. या प्रकरणात गेल्या काही दिवसांपासून धुळखात पडून असलेली 30 हजार रुपयांची प्रवाशी रिक्षा चोरीला गेली आहे. विशेष म्हणजे सदरची रिक्षा बंद अवस्थेत असूनही चोरट्यांनी चक्क तिची ढकलगाडी करीत ती पोलीस ठाण्यासमोरुन लांबवली. यावरुन पोलिसांचा चोरट्यांवर कोणताही धाक नसल्याचे पुन्हा एकदा सिद्ध झाले आहे. शहरात चोर्‍या, घरफोड्या, दुचाकी व दागिने लांबविण्याचे प्रकार जोमात सुरु असताना आता चोरट्यांनी थेट पोलिसांनाच आव्हान देणारी कृती केल्याने पोलीस या घटनेला किती गांभीर्याने घेतात आणि आपली फाटलेली लक्तरे शिवतात याकडे संगमनेरकरांचे लक्ष लागले आहे.

याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार पोलीस ठाण्याच्या अगदी समोरच असलेल्या भाजप कार्यालयाजवळ राहणार्‍या संतोष भास्करराव नवले यांनी याबाबत फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार सदरची घटना गुरुवार (ता.15) ते शुक्रवार (ता.16) या दरम्यानच्या रात्रीत घडली. फिर्यादी नवले यांनी 1996 सालची एक प्रवाशी रिक्षा (क्र.एम.एच.15/ए.4019) घेतली होती. मात्र गेल्या काही महिन्यांपासून ती नादुरुस्त झाल्याने त्यांनी आपल्या घरासमोरच ती उभी करुन ठेवली होती. चोरट्यांनी याच संधीचा फायदा घेत वरील कालावधीत ती लांबवली.

सदरील रिक्षा बंद स्थितीत असल्याने चोरट्यांनी रिक्षाची ढकलगाडी करीत फिर्यादीच्या घरापासून व पोलीस ठाण्यासमोरुन ती लोटीत नेली. त्यानंतर त्यांनी ती सुरु केली की अन्य वाहनाच्या साहाय्याने ओढून नेली याबाबत नेमकी माहिती उपलब्ध नाही. मात्र सदरची गोष्ट शुक्रवारी सकाळी लक्षात आल्यानंतर रिक्षाचे मालक नवले यांनी आसपास सर्वत्र शोध घेतला मात्र ती आढळून न आल्याने मध्यरात्रीच्या सुमारास शहर पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील तपास पोलीस नाईक सोनवणे यांच्याकडे सोपविला आहे.

Visits: 9 Today: 1 Total: 115675

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *