ग्राहकांच्या विश्वासातून व्यवसायाचा विस्तार म्हणजे उद्योजकता ः सीए. सोमाणी संगमनेर महाविद्यालयात एकदिवसीय उद्योजकता विकास कार्यशाळा


नायक वृत्तसेवा, संगमनेर
लोकांच्या दैनंदिन गरजांचे सूक्ष्म निरीक्षण करून व्यवसायाची निवड करणे आणि ग्राहकांच्या संतुष्टी/समाधानावर भर दिल्यास व्यवसायाचा विस्तार सहज करता येतो आणि हीच खरी उद्योजकता असते, असे प्रतिपादन संगमनेर शहरातील प्रथितयश उद्योजक सीए. डॉ. कैलास सोमाणी यांनी संगमनेर महाविद्यालयात उद्योजकता विषयक कार्यशाळेत केले.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ पुणे अंतर्गत विद्यार्थी विकास मंडळ व वाणिज्य विभाग व संशोधन केंद्र संगमनेर नगरपालिका कला, दा. ज. मालपाणी वाणिज्य व ब. ना. सारडा विज्ञान महाविद्यालय (स्वायत्त) संगमनेर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एकदिवसीय उद्योजकता विकास या कार्यशाळेच्या उद्घाटन प्रसंगी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते उपस्थित होते. या कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अरुण गायकवाड, शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप चोथवे आणि महाविद्यालयाचे विद्यार्थी विकास अधिकारी प्रा. डॉ. दीपक गफले, कार्यशाळा समन्वयक प्रा. ललिता मालुसरे आदी मान्यवर उपस्थित होते.

एक यशस्वी उद्योजक होण्यासाठी सर्वप्रथम उद्योजकीय मानसिकता बाळगणे गरजेचे आहे. उत्तम शेती, मध्यम व्यापार आणि कनिष्ठ नोकरी या पारंपरिक लोकवचनाचा संदर्भ देत प्रत्येक क्षेत्रामध्ये सूक्ष्म निरीक्षण करून संधींचा शोध घेता येणे ही उद्योजकतेची खरी सुरुवात असते. उद्योजकतेमध्ये नाविन्यता खूप महत्त्वाची असते. उद्योजक व उद्योजकता या दोघांनाही जिवंत ठेवण्याचे काम नाविन्यता करते. शेती, व्यापार, नोकरी या सर्वांना हा नियम लागू होतो. मोठी मोठी स्वप्ने जरूर पाहावी. पण संभाव्य धोके ओळखून वेळीच उपाय योजण्याचे कौशल्ये सुद्धा अंगी असू द्यावे असे मत त्यांनी कार्यशाळेच्या उद्घाटन सत्रात व्यक्त केले. विविध उद्योजक व त्यांच्या यशोगाथा त्यांनी पॉवर पॉईंट प्रेझेन्टेशनद्वारे विद्यार्थ्यांना समजावल्या.

कोणताही नवा उद्योग स्वप्न पाहिल्याशिवाय उभा राहत नाही. मोठी स्वप्ने पाहा, आत्मविश्वास ठेवा, जोखीम पत्करा तरच उद्योजक व्हाल. थोडक्यात उद्योजकता म्हणजे ग्राहकांच्या समस्या ओळखून त्या समस्येवर समाधान शोधणे होय असे मत शिक्षण प्रसारक संस्थेच्या व्यवस्थापन समितीचे सदस्य संदीप चोथवे यांनी कार्यशाळेच्या दुसर्‍या सत्रात व्यक्त केले. सदर एकदिवसीय कार्यशाळेसाठी संगमनेर महाविद्यालयातील विद्यार्थी तसेच कोपरगाव, राजापूर, अकोले येथील महाविद्यालयांतून 150 हून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवला. या कार्यशाळेचे प्रास्ताविक वाणिज्य विभागाच्या पदव्युत्तर विभागाच्या प्रमुख प्रा. ललिता मालुसरे यांनी केले. विद्यार्थी विकास मंडळाची सर्वांगीण विकासाची भूमिका त्यांनी यावेळी स्पष्ट केली. प्रमुख पाहुण्यांचा परिचय विभागातील प्रा. सीएमए. संदीप वडघुले यांनी करून दिला तर ऋणनिर्देश प्रा. श्रेयस कदरकर यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. गौरी मोरे यांनी केले. कार्यशाळेच्या यशस्वी आयोजनासाठी वाणिज्य विभागातील सर्व सहकारी प्राध्यापकांनी व विद्यार्थ्यांनी मोलाचे योगदान दिले.

Visits: 11 Today: 1 Total: 119075

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *