‘मोक्षरथा’चे नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या हस्ते लोकार्पण जैन यूथ फेडरेशन आणि कुसुम सुमतीलाल भंडारी यांचे सहकार्य

नायक वृत्तसेवा, संगमनेर
शहरातील जैन यूथ फेडरेशन आणिकुसुम सुमतीलाल भंडारी यांच्या प्रेरणेने नुकतेच ‘मोक्षरथा’चे नगराध्यक्षा दुर्गा तांबे यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले आहे.

कोविडचे नियम पाळून संगमनेर शहरातील सुयोग सोसायटी येथील जैन निवास स्थानकात आयोजित छोटेखानी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संतोष पारख हे होते. तर व्यासपीठावर आनंदऋषी पतसंस्थेचे अध्यक्ष सुमतीलाल भंडारी, श्रीगोपाल पडतानी, राजेंद्र वाकचौरे, पालिकेच्या आरोग्य विभागाच्या सभापती मनीषा भळगट, दिलीप पारख, कागल कोठारी आदी उपस्थित होते.

जैन यूथ फेडरेशनचे संस्थापक भूपेश भळगट यांनी प्रास्ताविक करुन फेडरेशनच्या सामाजिक कार्याची आणि उपक्रमांची माहिती दिली. तसेच मोक्षरथ निर्माण करण्यामागची भूमिका विशद करुन मदत करणार्‍यांचे आभार मानले. या रथासाठी कुसुम सुमतीलाल भंडारी आणि परिवाराने 2 लाख 51 हजार रुपयांची देणगी दिल्याबद्दल नगराध्यक्षा तांबे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. तर मोक्षरथाच्या चालकाचा संपूर्ण वर्षभराचा खर्च उचलल्याने ज्ञानदेव पारख यांचाही सत्कार करण्यात आला.

सद्यस्थितीत शहरात दोनच वैकुंठरथ उपलब्ध आहेत. त्यात कोरोना संकटात या रथाचे महत्त्व अधोरेखित झाल्याने आणखी एक रथ उपलब्ध होण्याच्या दृष्टीने जैन यूथ फेडरेशनने निर्णय घेतला आणि प्रत्यक्षात साकार केला. शेवटी सर्वच रथांना एका जागेवर ठेवण्यासाठी पालिकेने जागा उपलब्ध करुन देण्याची श्रीगोपाल पडतानी यांनी मागणी केल्यावर नगराध्यक्षा तांबे यांनी लवकरच जागा उपलब्ध करुन देणार असल्याचे सांगत जैन यूथ फेडरेशनचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी जैन यूथ फेडरेशनचे अध्यक्ष आनंद बोगावत, सुयोग गांधी, कांतीलाल गांधी, धर्मेंद्र पिपाडा आदिंनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन सुनील सातपुते यांनी केले.

Visits: 16 Today: 1 Total: 114843

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *