सावरगाव पाट येथे येतेय कास पठाराची अनुभूती! प्रयोगशील शेतकरी संदीप नेहेंनी फुलविला शेवंतीचा मळा..
महेश पगारे, अकोले
अकोले तालुक्यातील सावरगाव पाट येथील प्रयोगशील युवा शेतकरी संदीप नेहे यांनी शेवंतीसह झेंडूचा मळा फुलविला आहे. शेवंतीच्या भाग्यश्री (सफेद), पर्पल व ब्रॉन्झ या जातींची तर झेंडूच्या कलकत्ता जातीची एकूण चार एकरावर लागवड केलेली असून हा मळा आता कास पठाराचीच अनुभूती देत आहे.
शेतकरी संदीप नेहे सतत नवनवीन प्रयोग करत असतात. यापूर्वी त्यांनी शेडनेटमध्ये ढोबळी मिरचीच्या हिरव्या व रंगीत वाणांची लागवड केली होती. यात त्यांना चांगले यश मिळाले होते. त्यांचा हा प्रयोग इतर शेतकर्यांनीही राबविला. त्यांनाही त्यात यश मिळाले. याची दखल घेत राज्य शासनाने त्यांना आदर्श शेतकरी पुरस्कारानेही सन्मानित केले आहे. त्यांना सतत नवीन करण्याची उर्मी असल्याने शेवंती व झेंडू लावण्याचा निर्णय घेतला. त्यानुसार फेब्रुवारी व एप्रिलमध्ये शेवंतीची तर जून महिन्यात झेंडूची लागवड केली. शेवंतीसाठी एकरी 1 लाख रुपयांच्या आसपास खर्च केला. सध्या काढणी सुरू असून किलोला 50 अथवा अधिकचा दर मिळत आहे. हा तोडणीचा हंगाम साधारण तीन ते चार महिने चालतो. यातून सात ते आठ लाख रुपयांचे उत्पन्न मिळण्याची अपेक्षा आहे.
सध्या कोविड संकट निवळल्याने सर्वच देवालये व कार्यक्रम जोरात सुरू आहेत. त्यामुळे मोठ्या प्रमाणात फुलांचा वापर होत असल्याने बाजारपेठेतही फुलांना चांगली मागणी आहे. विशेष म्हणजे शेतकरी नेहे यांची ब्रॉन्झ शेवंतीची फुले तर परदेशात गेली आहे. केवळ राज्य, देश नव्हे तर परदेशातही मराठमोठ्या शेतकर्याने शेवंती फुलांच्या माध्यमातून डंका वाजविला आहे. यामुळे इतर शेतकर्यांसाठी ते आदर्श ठरत आहे.
शेतकर्यांचा भाजीपाला पिके करण्यावर जास्त भर असतो. परंतु, या पिकांबरोबर फुलशेती केली तर नक्कीच शाश्वत उत्पन्नाची दारे खुली होतात. त्यासाठी आत्मविश्वास, कष्ट व संयमाची गरज आहे.
– संदीप नेहे (प्रयोगशील शेतकरी)