नेवासाफाटा येथे ‘श्वास’ हॉस्पिटलच्यावतीने कोविड सेंटर सुरू
नायक वृत्तसेवा, नेवासा
नेवासाफाटा येथे श्वास हॉस्पिटलच्यावतीने मक्तापूर रस्त्यावर असलेल्या जुन्या माऊली हॉस्पिटलच्या जागेत नेवासा तालुक्यातील लोकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने कोविड सेंटर सुरू करण्यात आले आहे. येथे शासकीय दरापेक्षा कमी दरात कोविडच्या रुग्णांना सेवा देणार असल्याची माहिती हृदयरोग तज्ज्ञ डॉ.अविनाश काळे यांनी दिली आहे.
या कोविड सेंटरमध्ये पन्नास बेडची सुविधा असून तत्पर सेवा देण्यासाठी तज्ज्ञ डॉक्टरांसह आरोग्य कर्मचार्यांची यंत्रणा उभारण्यात आली आहे. अत्यावश्यक रुग्णांसाठी रुग्णवाहिकाही उपलब्ध करण्यात आली आहे. सहा व्हेंटिलेटर, आयसीयूयुक्त 12 बेडची तर ऑक्सिजनयुक्त 40 बेडची व्यवस्था करण्यात आली आहे. तालुक्याच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या नेवासाफाटा येथे कोविड रुग्णालयासाठी श्वास हॉस्पिटलने पुढाकार घेतल्याने नागरिकांची इतर ठिकाणी होणारी परवड दूर होणार असून अहमदनगर जिल्ह्यात ग्रामीण भागातील एकमेव सुसज्ज हे सेंटर असल्याचे डॉ.अविनाश काळे यांनी सांगितले आहे.