चक्क डॉक्टरनेच पत्नीवर केली काळी जादू! राहुरी पोलिसांत सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

नायक वृत्तसेवा, राहुरी
सासरच्या मंडळींनी छळ करून, माहेरी निघून जाण्यासाठी आपल्यावर मांत्रिकाद्वारे काळ्या जादूचे प्रयोग केल्याची तक्रार नवविवाहित तरुणीने राहुरी पोलीस ठाण्यात दिली. त्यावरून मांत्रिक व डॉक्टर असलेल्या पतीसह सहा जणांविरुद्ध अनिष्ट, अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला.

डॉ.विकास विश्वनाथ लवांडे (पती), विश्वनाथ रखमाजी लवांडे (सासरे), पूनम विश्वनाथ लवांडे (नणंद, तिघेही रा.कारेगाव, ता.श्रीरामपूर), किशोर सीताराम दौंड (मामेसासरे), प्रमिला किशोर दौंड (मामेसासू, दोघेही रा.मातापूर, ता.श्रीरामपूर) व जादूटोणा करणारा एक मांत्रिक (नाव समजले नाही) अशी आरोपींची नावे आहेत.

अश्विनी विकास लवांडे (हल्ली रा.येवले आखाडा) यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, डॉ.विकास लवांडे यांच्याशी 12 फेब्रुवारी, 2020 रोजी विवाह झाला. कारेगाव येथे सासरी नांदत असताना सासूचे अचानक ब्रेन हॅमरेजने निधन झाले. त्यामुळे अपशकुनी, पांढर्‍या पायाची असल्याचा आरोप करून सासरच्या मंडळींनी छळ सुरू केला. एका मांत्रिकाला बोलावून माझ्यावर काळ्या जादूचे प्रयोग केले. डोक्यावर लिंबू कापून, डोक्याचे केस उपटून, अंगावरील कपडे कापून ते काळ्या बाहुलीला चिकटवणे, अमावस्येच्या रात्री अकरानंतर राखेचे गोल रिंगण करून त्यात बसवून मंत्रोच्चार करणे, असे अघोरी प्रकार करण्यात आले. मांत्रिकाद्वारे उपचार केले नाहीत तर घरात वाईट प्रकार घडतील, अशी धमकी देण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी वडिलांनी माझ्याकडे काळी बाहुली, लिंबू व ताविज, अशा वस्तू पाहिल्यावर त्यांना सर्व प्रकार सांगितला. त्यांनी अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे पदाधिकारी महेश धनवटे (रा.राहुरी) यांना माहिती दिली, असे फिर्यादीत म्हटले आहे. दरम्यान, राहुरी पोलीस ठाण्यात जादूटोणा प्रतिबंधक कायद्यान्वये पहिलाच गुन्हा दाखल झाल्याने कारवाईकडे सर्वांचे लक्ष लागले असून सर्व आरोपी पसार आहेत.

Visits: 82 Today: 1 Total: 1115035

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *