लोकांचा विरोध असूनही पदे दिली हे विसरलात का? माजी आमदार वैभव पिचडांकडून साथ सोडलेल्यांवर जोरदार निशाणा
नायक वृत्तसेवा, अकोले
जिल्हा बँकेचे माजी अध्यक्ष तथा विद्यमान संचालक सीताराम गायकर यांच्यासह अगस्तिच्या अकरा संचालकांनी नुकताच राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. त्यानंतर तालुक्यातील राजकीय वातावरण अक्षरशः ढवळून निघाले आहे. समाज माध्यमांसह संधी मिळेल तेथे टीकेच्या फैरी झडत आहे. माजी आमदार वैभव पिचड यांनीही साथ सोडलेल्यांवर कठोर शब्दांत शरसंधान साधले आहे. लोकांचा विरोध असूनही त्यांना पदे दिली, ही आमची चूकच झाली का? असा सवाल करीत सीताराम गायकर व बाजार समितीचे सभापती पर्बत नाईकवाडी यांचा नामोल्लेख करीत टीका केली.
अकोले तालुक्यातील विकासकामांच्या उद्घाटनप्रसंगी माजी आमदार पिचड बोलत होते. यावेळी साथ सोडून गेलेल्यांचा खरपूस समाचार घेताना ते म्हणाले, त्यांनी कधीही समाजहिताचे काम केले नाही. फक्त स्वतःची घरे भरण्यासाठीच राजकारण केले. यातून स्वतःचे उद्योग व व्यवसाय वाढविले. लाभाचे पद दिले तरच हे खूष अशी त्यांची ओळख आहे. मनाप्रमाणे पद मिळाले नाही, तर हे कुणाचेच नाहीत. त्यामुळे त्यांनी आम्हांला पक्षनिष्ठा शिकवू नये, असा टोला लगावला.
तालुक्यातील विविध प्रश्न मार्गी लावण्यासाठी माजी मंत्री मधुकर पिचड यांनीच प्रयत्न केले. सध्या सुरू असलेली विकासकामेही माझ्या काळात मंजूर झालेली आहेत. विद्यमान आमदारांनी कामे मंजूर करून आणावीत मग त्यावर बोलावे. त्यांना अर्थसंकल्पात साधा तालुक्यातील विकासकामांना निधीही आणता आला नाही, असा टोलाही आमदारांना लगावला. सूत्रसंचालन माजी पंचायत समिती सदस्य अरुण शेळके यांनी करुन आभार मानले.
आम्ही तुमच्यासोबतच..
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेशावेळी अनेकांची नावे यादीत होती. त्यातील काही जणांनी नुकतीच माजी मंत्री मधुकर पिचड यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली आहे. त्यावेळी आम्ही तुमच्यासोबतच आहोत. आम्हांला पक्ष महत्त्वाचा नसून, तुम्ही महत्त्वाचे आहात. तुम्हीच आमचा पक्ष आहात, असे त्यांनी सांगितले.